कोरोना रेल्वे सेवा : रेल्वे रद्द झालेल्या नाहीत- रेल्वे मंत्रालय

Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

30 सप्टेंबरपर्यंत रेल्वेगाड्या रद्द झालेल्या नसल्याचे स्पष्टीकरण रेल्वे मंत्रालयाने दिले आहे.

काही माध्यमांमध्ये सर्व सामान्य रेल्वेगाड्या 30 सप्टेंबर पर्यंत रद्द झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. ते चूक असल्याचे रेल्वे मंत्रालयाने एका ट्वीटद्वारे स्पष्ट केले आहे.

रेल्वेगाड्या रद्द होण्यासंदर्भात कोणतेही नवे परिपत्रक काढलेले नाही. सर्व विशेष गाड्या पूर्वीसारख्या सुरू राहातील असं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.

अशी केली होती रेल्वे सुरू करण्याची घोषणा-

12 मे पासून पॅसेंजर ट्रेन हळूहळू सुरू करण्यात येईल, अशी माहिती रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी दिली होती.

सुरुवातीला नवी दिल्लीतून काही स्पेशल ट्रेन्स धावतील देशातल्या 15 मुख्य शहरांपर्यंत प्रवास करतील आणि अडकलेल्या प्रवाशांची ने-आण करतील, असं गोयल यांनी ट्वीट करून म्हटलं होतं.

या 15 शहरांमध्ये दिब्रूगढ, आगरताळा, हावडा, पटना, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बंगळुरू, चेन्नई, थिरुवनंतपुरम, मडगाव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि जम्मू तावी यांचा समावेश असेल.

त्यानंतर टप्प्याटप्प्याने स्थलांतरित मजुरांसाठीच्या दररोज 300 श्रमिक स्पेशल ट्रेन्स आणि कोव्हिड केअर सेंटरसाठीचे 20 हजार डबे वगळून इतर उपलब्ध डब्यांनुसार नवीन मार्गांसाठी रेल्से सुरू केली जाईल.

11 मे रोजी दुपारी 4 वाजल्यापासून या ट्रेनसाठी बुकिंग सुरू होईल. रेल्वेचं तिकीट https://www.irctc.co.in/ या वेबसाईटवरच उपलब्ध असेल.

रेल्वे स्टेशन्सवरील काऊंटर तिकीट विक्रीसाठी बंदच राहतील, तिथं कोणतंही तिकीट मिळणार नाही.

प्रवास करताना काय करावं लागेल?

1.अधिकृत तिकीट असलेल्या प्रवाशांनाच रेल्वे गाडीत प्रवेश दिला जाईल.

2.प्रवाशांनी मास्क किंवा तोंडाला रुमाल बांधणं अनिवार्य असेल.

3.रेल्वे स्थानकावर मेडिकल तपासणी केली जाईल.

4.कोरोनाची लक्षणं नसलेल्या व्यक्तींनाचा प्रवासाची मुभा दिली जाईल.

5.या गाड्यांचं वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाईल.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)