कोरोना व्हायरस : 'सौम्य, मध्यम तीव्रतेचे रुग्ण विनाचाचणी घरी जाऊ शकतील' #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

1. कोरोना व्हायरस: सौम्य, मध्यम तीव्रतेचे रुग्ण विनाचाचणी घरी

कोव्हिड-19 मधून बरे झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठवण्याबाबतचे नियम बदलून यात अधिक मोकळीक देण्याचा निर्णय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी घेतला आहे. त्यानुसार, अतिसौम्य-सौम्य आणि मध्यम तीव्रतेच्या रुग्णांमध्ये सलग तीन दिवस ताप नसेल तर नमुना चाचणी न करताही त्यांना घरी पाठवता येईल, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं.

पण गंभीर रुग्णांना सोडण्यापूर्वी नमुना चाचणी तसेच अन्य वैद्यकीय चाचणी करावी लागणार आहे.

सध्या देशात दररोज 95,000 टेस्ट करण्याची क्षमता आहे. यामध्ये वाढ करून रोज 1 लाख 20 हजार टेस्ट करण्यात येतील. गंभीर स्वरूपाच्या रुग्णांसाठी टेस्ट किट उपलब्ध होण्यासाठी फक्त गरज असेल तेव्हाच याचा वापर करण्याची सूचना देण्यात आली आहे. या धोरणात अतिसौम्य, सौम्य व मध्यम तीव्रतेच्या रुग्णांना विनाचाचणी घरी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही बातमी लोकसत्ताने दिली.

2. कर्जदार 411 कोटी बुडवून पळाले, स्टेट बँकेची सीबीआयकडे तक्रार

सहा बँकांची सुमारे 411 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केलेले 'राम देव इंटरनॅशनल'चे तीन संचालक देशाबाहेर पळून गेल्याची माहिती स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यांनी याप्रकरण सीबीआयकडे तक्रार दाखल केली आहे.

त्यानुसार संचालक नरेश कुमार, सुरेश कुमार आणि संगीता यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात बँकेचं 173 कोटी रुपयांचे नुकसान झालं आहे.

राम देव इंटरनॅशनल ही कंपनी पश्चिम आशिया आणि युरोपातील देशांत बासमती तांदूळ निर्यात करते. कर्नाल जिल्ह्यात त्यांच्या तीन राइस मिल, आठ निवड आणि प्रतवारीचे युनिट आहेत. सौदी अरेबिया आणि दुबईत कार्यालये आहेत, असे स्टेट बँकेने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे.

3. मुंबईतून उत्तर प्रदेशसाठी जाण्यासाठी 10 ट्रेन सुटणार

मुंबईतून उत्तर प्रदेशला 10 रेल्वेगाड्या जाणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ही बातमी झी 24 तासने दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा केली. मुंबईत काम करणाऱ्या उत्तर प्रदेशातील स्थलांतरीत मजुरांसाठी विशेष ट्रेन उपलब्ध करण्याची विनंती केली.

याला प्रतिसाद मिळाला देत पीयूष गोयल यांनी तात्काळ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संपर्क साधला आहे. मुंबईतून 10 विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहेत.

पण यासाठी लोकांना नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. ज्यांना परवानगी मिळाली त्यांनाच प्रवास करता येणार आहे. स्टेशनवरची गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. लोकांनी रेल्वे स्थानकांवर गर्दी करू नये, असं आवाहन शासनाने वारंवार केलं आहे.

4. फक्त ग्रीन झोनमधील शहरांमध्ये सुरू होणार विमान वाहतूक

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनपैकी फक्त ग्रीन झोनमधील शहरांमध्येच देशांतर्गत विमान वाहतूक सुरू होईल, असं विमान वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी स्पष्ट केलं आहे. ही बातमी लोकमतने प्रसिद्ध केली आहे.

17 मेनंतर देशांतर्गत विमान वाहतूक सुरू करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. त्यासाठी विमान कंपन्यांशी बोलणी सुरू आहे. सुरुवातीला टप्प्या टप्प्याने परवानगी देण्यात येईल. विमान उड्डाणाचं ठिकाण आणि उतरण्याचं ठिकाण ही दोन्ही ठिकाणं ग्रीन झोनमध्ये असली पाहिजेत, असं हरदीपसिंग पुरी यांनी सांगितलं.

5. सीआरपीएफच्या 62 जवानांना कोरोना व्हायरसची लागण, एकूण संख्या 234 वर

राजधानी दिल्लीत सीलमपूर आणि रोहिणी भागात तैनात असलेल्या 62 सीआरपीएफ जवानांना कोरोना व्हायरसची लागण झाली. त्यामुळे सीआरपीएफ पथकातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या आता 234 वर पोहोचली आहे.

याशिवाय, सीमा सुरक्षा दलातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत शनिवारी 35 ची भर पडली. यामध्ये 10 जवान दिल्लीत तर 25 जवान त्रिपुरामध्ये बंदोबस्तात होते. यामुळे बीएसएफमधील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 256 वर पोहोचला आहे. यात 2 जवानांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. ही बातमी टाईम्स ऑफ इंडियाने दिली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)