You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना उपचारांसाठी 'गंगाजल' वापरण्याचा प्रस्ताव ICMR ने फेटाळला : #5मोठ्याबातम्या
विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर आज प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1) कोरोनासाठी 'गंगाजल' वापरण्याचा प्रस्ताव ICMR ने फेटाळला
कोरोनाशी लढण्यासाठी गंगाजल (गंगा नदीतील पाणी) चा वापर करणार नाही, असं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं (ICMR) स्पष्ट केलंय. केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयानं एका स्वयंसेवी संस्थेच्या प्रस्तावावर विचार करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, ICMR नं असं कोणतंही संशोधन करणार नसल्याचं सांगितलं. द प्रिंटनं ही बातमी दिलीय.
'अतुल्य गंगा' नावाच्या स्वयंसेवी संस्थेनं जलशक्ती मंत्रालयाकडे हा प्रस्ताव दिला होता. गंगाजलचा वापर कोरोनावर उपाय म्हणून होऊ शकतो, असं त्यांचं म्हणणं होतं. जलशक्ती मंत्रालयानं या प्रस्तावाच्या आधारे ICMR ला पत्र पाठवलं.
"गंगेच्या पाण्यात Bacteriophage हा Ninja Virus आहे. Bacteriophage हा इतर धोकादायक विषाणूंना मारून टाकतो," असं जलशक्ती मंत्रालयानं पत्रात म्हटलंय.
- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 3.0मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
ICMR नं या प्रस्तावाबाबत बैठकीत चर्चा केली. मात्र, त्या दृष्टीनं कुठलंही संशोधन केलं जाणार नाही, असंही स्पष्ट केलं. यावर संशोधन करून वेळ वाया घालवला जाणार नाही, असं ICMR च्या अधिकाऱ्यानं 'द प्रिंट'शी बोलताना सांगितलं.
2) 'न्यायव्यवस्था ताकदवान आणि श्रीमंतांसाठी वेगानं काम करते'
आपली न्यायव्यवस्था ताकदवान आणि श्रीमंत लोकांसाठी वेगानं काम करते, असं सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश दीपक गुप्ता म्हणाले. एनडीटीव्हीनं ही बातमी दिलीय.
न्या. दीपक गुप्ता बुधवारी निवृत्त झाले. यावेळी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांना निरोप देण्यात आला. याप्रसंगी न्या. गुप्ता यांनी छोटेखानी भाषण केलं.
ते म्हणाले, "जर कुणी श्रीमंत व्यक्ती गजाआड गेला, तर व्यवस्था वेगवान होते. मग कुठल्या गरिबानं आवाज उठवला, तर त्याचाही विचार व्हायला हवा. कुठल्याही स्थितीत व्यवस्थेच्या अखंडतेला पणाला लावलं जाऊ शकत नाही."
लोकांना जे अपेक्षित आहे, ते न्यायव्यवस्थेकडून मिळेल, अशी आशाही न्या. गुप्ता यांनी व्यक्त केली.
भारताची राज्यघटना हेच न्यायाधीशांसाठी 'पवित्र पुस्तक' असल्याचं त्यांनी म्हटलं.
3) दिल्लीत दारूसाठी ई-टोकन मिळणार
दारूची दुकनं उघडल्यानंतर झालेल्या गर्दीला नियंत्रित करणं अशक्य होऊन बसल्यानं दिल्ली सरकारनं आता यावर नामी उपाय शोधून काढलाय. तळीरामांना ई-टोकन दिलं जाणार आहे. हिंदुस्तान टाइम्सनं ही बातमी दिलीय.
तळीराम ऑनलाईन नोंदणी करून दिलेल्या वेळेला दुकानात जाऊन दारू खरेदी करू शकतात, अशी ही योजना आहे. दारूच्या दुकानांसमोर लागणाऱ्या रांगा आणि त्यामुळं सोशल डिस्टन्सिंगचा उडणारा फज्जा लक्षात घेऊन दिल्ली सरकारनं हे पाऊल उचललंय.
तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये केंद्र सरकारनं काही सवलतीही दिल्या होत्या. त्यात दारूच्या दुकानांचाही समावेश होता. मात्र, दिल्लीसह देशभरात दारूच्या दुकानांसमोर मोठा गोंधळ दिसून आला. अनेक ठिकणी दुकानं बंद करण्याची वेळ आली, तर अनेक ठिकाणी पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला.
4) पालघर हत्याकांडप्रकरणी पोलीस अधीक्षक सक्तीच्या रजेवर
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात चोर असल्याच्या संशयातून दोन साधू आणि त्यांच्या चालकाची जमावानं हत्या केली. या घटनेनं संपूर्ण देशभर खळबळ उडाली. शंभरहून अधिक आरोपींना अटकही करण्यात आली.
या घटनेला काही दिवस उलटल्यानंतर पालघरच्या पोलीस अधीक्षकांवर राज्याच्या गृहमंत्रालयानं कारवाई केलीय. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी (7 मे) पालघरमधील घटनास्थळला भेट दिली. त्यानंतर संध्याकाळी त्यांनी पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं.
अनिल देशमुख यांनी गडचिंचले गावात जाऊन स्थानिकांचं म्हणणं जाणून घेतलं. या हत्याकाडांतील सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याचं आश्वासन देशमुखांनी दिलं.
5) लॉकडाऊनमध्ये दगडी चाळीत अरुण गवळींच्या मुलीचं लग्न
गँगस्टर अरुण गवळी यांची मुलगी योगिता गवळी हिचं आज (8 मे) दगडी चाळीत लग्न होणार आहे. अभिनेता अक्षय वाघमारेसोबत योगिता विवाहबद्द होईल. लॉकडाऊनचे नियम पाळून हे लग्न पार पडणार आहे. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय.
फत्तेशिकस्त, बेधकडक, दोस्तीगिरी, बस स्टॉप अशा सिनेमांमध्ये अक्षय वाघमारेने काम केलंय.
या लग्नाला 15 ते 20 नातेवाईकच उपस्थित राहणार आहेत. अरुण गवळीही उपस्थित असतील.
अरुण गवळी सध्या पॅरोलवर बाहेर आहे.त लॉकाडऊनच्या आधी पॅरोलवर बाहेर पडल्यामुळे गवळी आता घरातच अडकले आहेत.
2007 साली अरुण गवळी यांना शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्यप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालीय.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)