You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना मालेगाव : दंगली, बाँबस्फोट आणि आता कोरोना हॉटस्पॉट बनलेल्या मालेगावची गोष्ट
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
मालेगाव कोरोना व्हायरसचं हॉटस्पॉट बनलंय. असा एकही दिवस जात नाही की तिथे नवे कोरोना पॉझिटिव्ह पेशंट्स सापडत नाहीत.
एकीकडे सुविधा अपुऱ्या असल्याचा स्थानिकांचा आरोप, दुसरीकडे लोकांकडून पोलिसांवर होणारे हल्ले आणि कर्तव्य बजावत असलेले पोलीस तसंच आरोग्य सेवकांना कोरोनाची होणारी लागण, अशा तिहेरी कात्रीत मालेगावचं कोरोना व्यवस्थापन सापडलं आहे. पण नाशिक जिल्ह्यातलं हे शहर चर्चेत यायची ही पहिलीच वेळ नाहीये.
वादग्रस्त मालेगावची गोष्ट
वेगवेगळ्या संघर्षांचं केंद्रबिंदू बनलेल्या मालेगावची गोष्ट सुरू होते 1857च्या स्वातंत्र्ययुद्धात. मोसम आणि गिरणा नदीच्या संगमावर वसलेल्या या शहराचं आधीचं नाव होतं माळीगाव.
अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात सरदार नारोशंकर राजेबहादूर यांनी मालेगावात किल्ला बांधायला घेतला आणि उपजीविकेच्या ओढीने ठिकठिकाणचे लोक इथे येऊन वसले. यात मुख्यत्वेकरून समावेश होता सुरत आणि उत्तर भारतातल्या विणकरांचा.
पण 1857च्या युद्धात जेव्हा भारतीय मुस्लीम शासकांचा पराभव झाला, तेव्हा ब्रिटिशांच्या भीतीने उत्तरेकडल्या राज्यांमधून मुस्लीम कामगारांचे लोंढे दक्षिणेकडे निघाले, त्यातले अनेक लोक मालेगावात स्थायिक झाले. 1864 साली वाराणसीमध्ये पडलेल्या भयानक दुष्काळात आणखी काही मुस्लीम विणकर जिवंत राहाण्यासाठी इथे निघून आले.
1948 मध्ये हैदराबादच्या मुक्तिसंग्रामा तर त्या भागातूनही अनेक मुस्लीम इथे आले. सूतकताई, कापड विणणे, रंगवणे अशी वेगवेगळी कामं सुरू झाली. इथून मालेगावची ओळख वस्त्रोद्यागाचं प्रमुख ठिकाण अशी तयार व्हायला सुरुवात झाली.
- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 3.0मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
दंगलींचं शहर
मात्र अशाही काही घटना घडल्या, ज्यामुळे मालेगावला 'दंगलींचं शहर' असं लेबल लागलं. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच इथे अनेक दंगली झाल्या. मालेगावमध्ये झालेल्या पहिल्या दंगलीची नोंद सापडते ती 1921 साली.
ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक निळू दामले हे त्यांच्या 'बाँबस्फोटानंतर मालेगाव' या पुस्तकात लिहितात : '1921 साली खिलाफतचं आंदोलन झालं तेव्हा दंगल झाली. खिलाफत चळवळ रद्द झाली म्हणून मुस्लिमांनी आंदोलन केलं होतं. खवळलेल्या जमावानं दोन पोलिसांना ठार केलं होतं.'
त्यानंतरही अनेक छोट्या-मोठ्या कारणांवरून इथे दंगली झाल्यात. मालेगावचा जवळून अभ्यास केलेल्या 'दिव्य मराठी' नाशिकच्या पत्रकार दिप्ती राऊत सांगतात की मालेगावात शेवटची दंगल झाली ती 2001 साली. "गेल्या 19 वर्षांत मालेगावमध्ये दंगल झालेली नाही. अगदी 2006 आणि 2008 बाँबस्फोटांनंतरही मालेगावमध्ये दंगल झाली नाही. गेल्या काही वर्षांत मालेगावकर या टोकाला पोहोचला आहे की आम्हाला विकास हवाय," त्या सांगतात.
हिंदू-मुस्लिमांना विभागणारी मोसम नदी
मालेगाव भारतातल्या काही मोजक्या शहरांपैकी असेल, जिथे मुस्लीम बहुसंख्य आहेत. पण इथली लोकसंख्या भौगोलिक आधारावरही विभागलेली आहे. मोसम नदीच्या पूर्वेला मुस्लीम वस्ती आहे तर पश्चिमेला हिंदू वस्ती. सुरुवातीला असं चित्र नव्हतं. मूळ मालेगावात, ज्याला जुनं मालेगावही म्हटलं जातं तिथे सगळ्या प्रकारचे लोक राहात.
याबद्दल बोलताना निळू दामले म्हणतात, "गेल्या काही वर्षांतला मोठा बदल म्हणजे, हिंदू मोठ्या संख्येने जुनं मालेगाव सोडून पश्चिमेला स्थायिक होऊ लागलेत. नव्या पिढ्या आल्या, अनेक मुलं शिक्षणासाठी, नोकरीधंद्यांसाठी मोठ्या शहरांमध्ये स्थायिक झाली, त्यामुळे हातात थोडा पैसा आला. परिणामी त्यांना नव्या सोयी हव्या होत्या म्हणून मालेगावात त्यांनी मोठी घरं बांधली, नव्याने शहरीकरण झालेल्या भागात स्थायिक झाली.
"मुस्लीम मात्र आहेत तिथेच राहिले. याला दोन कारणं होती - एक म्हणजे, आपल्या धर्माच्या लोकांमध्येच राहाणं त्यांना सुरक्षित वाटलं. आणि दुसरं म्हणजे, त्यांची आर्थिक परिस्थिती नव्हती."
"शिक्षणाचा अभाव असल्याने मुस्लीम समाज मात्र पारंपारिक पावरलूमच्या व्यवसायावरच अवलंबून राहिला. आज मालेगावच्या पावरलूममधले 80 टक्के कामगार मुस्लीम आहेत, आणि अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत राहतात. 10 बाय 10च्या एका घरात 15-20 माणसं राहतात. जागेचा अभाव, स्वच्छतेचा अभावामुळे इथल्या लोकांमध्ये आजारी पडण्याचं प्रमाणही जास्त आहे.
ही माणसं राहातात त्या वस्त्या आणि गल्ल्या अत्यंत दाटीवाटीच्या, कोंदट आणि गर्दीच्या आहेत, त्यामुळे कोणत्याही साथीच्या रोगाला इथली माणसं लवकर बळी पडतात. कोरोना व्हायरसच्या आधी चिकुनगुनियाने मालेगावमध्ये थैमान घातलं होतं.
"जुनं मालेगाव आता मुस्लीम मालेगाव झालं आहे. इथल्या दाटीवाटीच्या वस्तीमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग पाळणं अवघड आहे. इथली अस्वच्छता पाहून अंगावर शहारा येतो. या लोकांचा दोन वेळाच्या जेवणाचा प्रश्न आहे. आठवड्याच्या आठवड्याला यांना पैसे मिळतात त्यावर घर चालतं. अशीच परिस्थिती धारावीमध्ये आहे, पण तिथे हिंदू-मुस्लीम दोन्ही प्रकारचे लोक आहेत," निळू दामले सांगतात.
मालेगाव महाराष्ट्राच्या वस्रोद्योगाचं केंद्र आहे. इथे जवळपास तीन लाख पावरलूम्स आहेत आणि इथले बहुतांश रहिवाशी आपल्या उपजीविकेसाठी पावरलूमवर अवलंबून आहेत.
इथल्या परिस्थितीविषयी बोलताना नाशिकचे कलेक्टर सुरज मांढरे यांनी सांगितलं होतं की, "इथल्या लोकांना आधीपासूनच श्वसनसंस्थेचे आजार आहेत. सतत पावरलूममध्ये काम केल्याने या लोकांच्या छातीत अत्यंत छोटे कण, धागे, धूळ जाऊन त्यांची श्वसनयंत्रणा आधीच कमजोर झालेली असते. मालेगावमध्ये टीबीचा प्रादुर्भावही प्रचंड आहे. इथल्या लोकांना सतत अनारोग्यात जगावं लागतं, त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते. कोव्हिड-19 सारख्या आजाराला ते फार लवकर बळी पडू शकतात."
एकमेकांवर अवलंबून, तरी सर्वार्थाने दूर
मालेगावचं चित्रण करताना इथे नेहमीच हिंदू मुस्लीमांमध्ये तणाव असल्यांच दर्शवलं जातं. प्रत्यक्षात तशी परिस्थिती नाहीये. "इथे हिंदू-मुस्लीम तणाव निर्माण करणं लोकांना परवडणारच नाहीये," दामले म्हणतात.
इथली अर्थव्यवस्थाच अशी आहे की हिंदू आणि मुस्लीम समुदाय एकमेकांवर अबलंबून आहेत, मालेगावच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत म्हणजे पावरलूम्स. या कापड व्यवसायात हिंदू आणि मुस्लीम दोघेही गुंतलेले आहेत.
"या यंत्रमागांचे मालक मुस्लीम, त्यांच्या हाताखाली काम करणारे, माग चालवणारे, कापड बनवणारे, रंगकाम करणारे सगळे कामगार मुस्लीम तर दुसऱ्या बाजूला या व्यवसायाला पतपुरवठा करणारे, यांना कच्चा माल पुरवणारे आणि सरतेशेवटी हे कापड विकत घेणारे सगळे हिंदू. त्यामुळे एकाशिवाय दुसऱ्याचं काम होऊच शकत नाही," दिप्ती राऊत नमूद करतात.
पण तरीही या दोन्ही समुदायांचा एकमेकांशी विशेष संबंध नाही. मुळात मालेगावातून वाहाणाऱ्या मोसम नदीने दोन्ही समुदायात भौगोलिक रेष आखल्यासारखीच आहे, त्याहीपलिकडे जाऊन दोन्ही समुदायांचा एकमेकांशी व्यवसाय सोडून फारसा संबंध येत नाही. निळू दामलेंच्या 'बाँबस्फोटानंतर मालेगाव' या पुस्तकात उल्लेख आहे की यंत्रमाग मालकाला सुत विकणाऱ्या व्यापाऱ्याला त्या यंत्रमागात कापड बनलेलं कापड विकत घेणारा व्यापारी परस्पर पैसे देतो.
मग दंगलीचा रोख कुणाकडे?
जर हिंदू-मुस्लिमांमध्ये तणाव नसेल, तर मग मालेगावला दंगलीचं शहर ही ओळख का मिळाली? याबद्दल समजावून सांगताना सामाजिक कार्यकर्ते शेखर सोनाळकर म्हणतात की, "1990 नंतर शहरात धार्मिक ध्रुवीकरणाचे प्रयत्न केले गेले. यात दोन्ही समुदायांचे नेते सहभागी होते. धार्मिक कट्टरता वाढीस लागली, आणि हिंदूंमध्ये धार्मिक कट्टरता वाढली तशी मुस्लिमांमध्येही. फरक इतकाच आहे की हिंदू समुदायात शिकलेले काही नेते होते, काही संस्थाचं काम होतं, त्यामुळे त्यांना प्रगती करता आली. मुस्लिमांना तोही फायदा मिळाला नाही. वर्षानुवर्षांचं अज्ञान, गरिबी आणि धर्मगुरूंची शिकवण, यामुळे ते काळाबरोबर चालू शकले नाहीत."
दिप्ती राऊतही याला दुजोरा देतात. "इथल्या नेत्यांनी कायमच अफवांना खतपाणी घातलं. लोक अज्ञानात, गरिबीत राहण्यातच त्यांचा फायदा होता," त्या खेद व्यक्त करतात.
तर हिंदू-मुस्लीम हे इथल्या तणावाचं कारण नाही, इथला सुविधांचा आणि इन्फ्रास्ट्रक्चरचा अभाव, खिळखिळी आरोग्य व्यवस्था, गरिबी यामुळे इथे लोक प्रेशर कुकर झालेत, असं दामले म्हणतात. "दुर्दैवाने यात मुस्लीम लोकांची संख्या जास्त आहे. काळाबरोबर न चालण्याचा तोटा त्यांना होतोय आणि त्यात धर्मगुरूंनीही त्यांचं काही अंशी नुकसान केलंय," ते सांगतात.
दुसरं आणि अधिक महत्त्वाचं कारण म्हणजे, मुस्लिमांच्या मनात प्रशासनाबद्दल असलेला राग. "हा राग काही अंशी पूर्वानुभवातून आलाय तर काही अंशी पूर्वग्रहातून. प्रशासन कायमच आमच्याकडे दंगलखोर म्हणून बघतं, हिंदूंच्या तुलनेत आम्हाला कमी सुविधा मिळतात, असं इथल्या मुस्लिमांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे तेही प्रशासनाला पूर्वग्रहदूषित नजरेने बघतात हेही खरं आहे," राऊत उलगडून सांगतात.
त्यामुळे मालेगावात जे हल्ले किंवा दंगली होतात त्या हिंदूच्या विरोधात केलेल्या नसून प्रशासनाच्या विरोधात केलेल्या असतात, पण प्रशासनात बहुतांश हिंदू लोक असल्याने त्याला हिंदू-मुस्लीम असा रंग मिळतो, हे राऊत आणि दामले एकसुरात मान्य करतात.
याआधी झालेल्या दंगलीही प्रशासनाविरोधात होत्या. अगदी 1921 साली झालेल्या दंगलीत दोन पोलीस मारले गेले होते, पण ते हिंदू आहेत म्हणून म्हणून त्यांच्यावर हल्ला झाला नव्हता तर प्रशासकीय यंत्रणेचा भाग आहेत म्हणून हल्ला झाला होता, असा उल्लेख 'बाँबस्फोटानंतर मालेगाव' या पुस्तकात आहे.
'मदत नको, हॉस्पिटल द्या'
आरोग्य, विकास आणि सुविधा हे इथले मुलभूत प्रश्न आहेत. आणि यांची मालेगावातल्या लोकांना किती गरज आहे, हे एका प्रसंगावरून सिद्ध होतं.
2008च्या बाँम्बस्फोटानंतर इथे मृतांच्या नातेवाईकांना भरपाईचे चेक देण्याचा कार्यक्रम सुरू होता. यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देखमुख, गृहमंत्री आर आर पाटील आले होते. साजिद अहमद या तरुणाचा स्फोटात मृत्यू झाला होता. त्याच्या वडिलांना, शफिक अहमद यांना सोनिया गांधीच्या हस्ते मदतीचा चेक घेण्यासाठी स्टेजवर बोलवलं, पण त्यांनी तो चेक घ्यायला सगळ्यांसमोर नकार दिला.
त्यांनी विचारलं, 'सरकारने 2001 साली मालेगावात सुसज्ज हॉस्पिटल उभारण्याचं ठरवलं होतं, त्याचं काय झालं? ते हॉस्पिटल असतं तर माझा मुलगा वाचला असता. हा चेक नका देऊ, हॉस्पिटल बांधा, काहीतरी विकास करा. आमच्या मुलांना त्याची गरज आहे,' असं शफिक म्हणाले होते.
मदतीचे चेक देण्याचा कार्यक्रम नंतर गुंडाळला गेला. "आज ते हॉस्पिटल उभं आहे, पण क्षमतेच्या फक्त 30 टक्के स्टाफ तिथे कार्यरत आहे. आताही संकटाचाच काळ आहे," दिप्ती राऊत सांगतात.
सध्या काय परिस्थिती?
मालेगावात कोरोना पॉझिटिव्ह पेशंटची संख्या जवळपास चारशेपर्यंत पोहचली आहे. अजूनही संख्या वाढेल, असं स्पष्ट दिसतंय. दिप्ती राऊत सांगतात की, "ज्यांच्या सांगण्यावरून लोक ताबडतोब ऐकतील, असे चारही मौलाना कोरोनाला बळी पडले आहेत. अजूनही आरोग्य यंत्रणा सक्षम झालेली नाही. प्रशासनाने आधीच धर्मगुरूंची मदत घेऊन लोकांना आवाहन करायला हवं होतं, ते झालेलं नाही. तातडीने उपाययोजना केल्या नाहीत तर मालेगावची परिस्थिती आणखी बिघडत जाईल."
असं म्हणतात की मालेगावात माणूस यंत्रमागावर जन्मतो आणि कब्रस्तानात संपतो, पण आता या जन्म-मृत्यूच्या खेळात कोरोना निर्णायक ठरतो आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)