You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना नागपूर: हॉटस्पॉट सतरंजीपुरा भागातून दोन तासांत 1,200 लोक क्वारंटाईन
- Author, प्रवीण मुधोळकर
- Role, बीबीसी मराठीसाठी नागपूरहून
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
नागपुरात कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आकडा 133 वर पोहोचला आहे. ही संख्या मुंबई-पुण्यापेक्षा कमी असली तरी बरेच प्रयत्न करूनही शहर कायम रेडझोनमध्ये आले, आकडे सातत्याने वाढतच आहेत.
त्यामुळे नागपूर महानगरपालिका आणि स्थानिक प्रशासनाने पूर्व नागपूरात हॉटस्पॉट बनलेल्या सतरंजीपुरा या भागात आता आणखी कडक कारवाई केली आहे.
काही संशयित रुग्ण हे पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्याची किंवा लक्षणं दिसत असल्याची खरी माहिती लपवत असल्याचं सांगत महापालिकेने या भागातील 1200 हून अधिक लोकांना सक्तीने क्वारंटाईन केलं आहे, अशी माहिती नागपूरच्या रविभवन या शासकीय विश्रामगृहात हलवण्यात आलेल्या एका 45 वर्षीय व्यक्तीनं आपली ओळख उघड न करण्याचा अटीवर बीबीसी मराठीला दिली.
सोमवारी 27 तारखेला संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास महापालिकेच्या वतीने या भागातील नागरिकांना सूचना देण्यात आल्या की पुढच्या दोन तासात शेकडो लोकांना कोरोनाची लागण झाल्याच्या संशयावरून क्वारंटाईन करण्यात येणार आहे.
"दोन तासात तयारी करून ठेवा, याचं पालन आमच्यापैकी काहींनी केलं नाही. त्यातच दोन अडीच तासाने आमच्या सतरंजीपुऱ्यातील हबीब टिंबर, तेलंगीपुरा आखाडा, माता मंदिर, अत्तरवाले मशीद, मामा मेडीकल या संवेदनशील भागांत महापालिकेच्या लोक पोलिसांसह पोहोचले.
"महापालिकेच्या 'आपली बस'मध्ये भरून आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी आणण्यात आले. आम्हाला रविभवनात आणले आहे. मी, माझी पत्नी आणि दोन मुलं, असे चौघेही क्वारंटाईन आहोत," असं या इसमाने सांगितलं.
एका रुग्णापासून 56 जणांना बाधा
नागपुरात आतापर्यंत कोरोनाने एक बळी घेतला आहे. पूर्व नागपुरातल्या सतरंजीपुरा भागातल्या या रुग्णाला टीबी होता आणि त्यांचं कुटुंब फार मोठं आहे. त्यांची मुलं, नातवंडं असे एकूण 21 व्यक्ती आहेत. यांच्याच संपर्कात आल्यामुळेच परिसरात 56 लोकांना बाधा झाल्याची माहिती नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काही दिवसांपूर्वी बीबीसी मराठीशी बोलताना दिली होती.
- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
क्वारंटाईनसाठी हलवण्यात आलेल्या दुसऱ्या एकाने सांगितलं, "आम्ही ज्या परिसरातील किराणा दुकानात जातो तेथूनच काही पॉझिटिव्ह आले आहेत. याच लोकांच्या संपर्कात आल्याचा आमच्यावर संशय आहे. आता याच रविभवनात पंधरा दिवस राहावे लागणार आहे. आमच्यातील काहींनी विरोध केला, पण आता रविभवनात आलोय, पर्याय नाही. आता जर आम्हाला कोरोना असो किंवा नसो, पण इकडून तिकडे फिरवू नका, एकाच ठिकाणी ठेवा."
महापालिकेने आधी सतरंजीपुरा भागातील 116 हून अधिक नागरिकांना ताब्यात घेऊन वानाडोंगरी येथे विलगीकरण कक्षात ठेवलं होतं. मात्र स्थानिकांच्या विरोधानंतर त्यांना पाचपावली भागात हलवण्यात आलं. पण आता तिथले स्थानिक लोक याचा विरोध करत आहेत. त्यामुळे आता रविभवन, आमदार निवास आणि वाठोड्यात त्यांना 14 दिवसांसाठी क्वारंटाईन केलं जाणार आहे.
मनपा आयुक्त मुंढे यांनी सांगितलं की सतरंजीपुरा परिसरातून क्वारंटाईन करण्यात आलेल्यांची संख्या 1200 झाली आहे. "आधी आम्ही 150 लोकांना क्वारंटाईन केलं, नंतर 450 आणि हा आकडा आता 1,200 पर्यत गेलाय. या लोकांचे स्वॉब घेतले जातील. जे पॉझिटिव्ह आढळतील त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू होतील, आणि निगेटिव्ह आढळलेल्या लोकांना 14 दिवस क्वारंटाईनमध्ये ठेवलं जाईल," असंही मुंढे म्हणाले.
पोलिसांपुढे वेगळंच आव्हान
नागपूर पोलिसांनी यापूर्वीच सतरंजीपुराच्या आसपासचा पाच किलोमीटर परिसर सील केला आहे. तर याच भागातून पळून गेलेल्या दहा लोकांना कळमना परिसरातील एका गोदामातून पोलिसांनी अटक केली होती. या दहा जणांपैकी दोन पॉझिटिव्ह आढळले होते.
आता पोलिसांसमोर आव्हान आहे लोकांना घरातून बाहेर न पडू देण्याचं. लॉकडाऊनचं काटेकोरपणे पालन, कंटेनमेंट झोनमध्ये घातलेल्या कडक निर्बंधांचं पालन, यावर भर दिला जात असतानाच जनजागृतीसाठी स्थानिक लकडगंज पोलिसांनी कोरोनाचा प्रतीकात्मक पुतळाही उभारल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेन्द्र हिवरे यांनी सांगितलं.
आजवर नागपुरातील 25 कोरोनाग्रस्तांना उपचारांनंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर यापैकी काहींना रुग्णालयातून क्वारंटाईन मध्ये पाठवण्यात आले आहे अशी माहिती नागपुरच्या मेडीकल काँलेज आणि हाँस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी दिली आहे.
नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयत, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (मेयो) या ठिकाणी शहरातील कोरोनाचे नमुने तपासले जात आहेत, तर त्यांच्या मदतीला NEERI - राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था आणि माफसू पशुवैद्यकीय विद्यापीठातही तपासण्या सुरू आहेत. तसंच नागपूरच्या एम्स म्हणजेच अखिल भारतीस आयुर्विज्ञान संस्थानमध्येही तपासण्या होताहेत.
या एम्समध्ये विदर्भातील इतर जिल्ह्यातील कोरोनाचे नमुने तपासणीसाठी पाठविले जाताहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)