कोरोना व्हायरस: गोवा कोव्हिड-19 मुक्त होणारं पहिलं राज्य, सर्व रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

1. गोवा 'कोरोनामुक्त' होणारं पहिलं राज्य

देशभरात सर्वत्र कोरोनाचे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे गोव्यातून मात्र दिलासादायक बातमी आली आहे.

'आनंददायक आणि दिलासादायक गोष्ट : अखेरच्या कोरोना विषाणूबाधित रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. डॉक्टर आणि सहायक कर्मचारी यासाठी कौतुकास पात्र आहेत. गोव्यात 3 एप्रिलनंतर एकही कोरोना रुग्ण आढळून आलेला नाही,' असं ट्वीट गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलं आहे.

गोव्यात कोरोनाचा संसर्ग झालेले सात रुग्ण आढळले होते. यातील सहा रुग्ण यापूर्वीच ठीक झाले होते. अखेरच्या रुग्णाचा अहवाल रविवारी (19 एप्रिल) निगेटिव्ह आला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयातून सोडण्यात आलं.

त्यामुळे इथले सर्व कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत, असं हिंदुस्तान टाइम्स मराठीने दिलेल्या बातमीत म्हटलंय.

2. कोरोनाच्या रुग्णांच्या आकडेवारीतील घोळ दूर करा - देवेंद्र फडणवीस

लक्षणं नसलेल्या व्यक्तींची कोरोना चाचणी न करण्याचा निर्णय मागे घेऊन, ICMRच्या निकषांचे तंतोतंत पालन करावे आणि कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांच्या आकडेवारीतील घोळ दूर करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना यासंबंधी पत्र लिहिलं आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे.

15 एप्रिलपासून मुंबई महापालिकेने लक्षणं नसलेल्या व्यक्तींची कोरोना चाचणी बंद केली. मात्र राज्यात सरासरीच्या किती तरी अधिक नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. म्हणूनच ICMRच्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे 'अ‍ॅग्रेसिव्ह टेस्टिंग' हीच रणनीती वापरावी, अशी विनंती फडणवीस यांनी केली आहे.

3. राज्यात अवकाळी पावसानं शेतमालाचं नुकसान

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला फटका बसत असताना महाराष्ट्रात अवकाळी पावसाचीही भर पडली आहे. गेल्या चोवीस तासात राज्याच्या काही भागात वादळी पाऊस आणि गारपीटही झाल्याने हातातोंडाशी आलेला शेतीमाल, फळबागांचे नुकसान झाले. लोकसत्तानं ही बातमी दिलीये.

काढणीची ज्वारी, गहू, हरभरा आणि कांद्यासह द्राक्ष, चिकू, कलिंगड, टरबूज या पीकांना पावसाचा फटका बसला आहे. कोकणामध्ये आंब्यालाही पावसाने तडाखा दिला. राज्यात आणखी दोन दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

राज्याच्या बहुतांश भागामध्ये कमाल आणि किमान तापमानामध्ये आठवड्यापासून मोठी वाढ झाली असून मध्य प्रदेश ते तामीळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यातच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून बाष्पाचा पुरवठा होतो आहे. त्यामुळे राज्यात पावसाळी स्थिती निर्माण झाली आहे.

4. ई-कॉमर्स कंपन्यांना केवळ जीवनावश्यक वस्तू विक्रींची सूट

केंद्र सरकारने लॉकडाऊन काळात ई-कॉमर्स कंपन्यांच्या माध्यमातून बिगर जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीला स्थगिती दिली आहे. इंडियन एक्सप्रेसने ही बातमी दिलीये.

चार दिवसांपूर्वी ई-कॉमर्स कंपन्यांच्या माध्यमातून मोबाइल फोन, रेफ्रिजरेटर आणि रेडिमेड कपड्यांच्या विक्रीला परवानगी देण्यात आली होती. 20 एप्रिलपासून ई-कॉमर्स कंपन्या या वस्तूंची विक्री करू शकतील, असं यापूर्वीच्या सरकारी आदेशात म्हटलं होतं.

मात्र, आता ही सवलत मागे घेण्यात आली आहे. त्यामुळे आता ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर केवळ जीवनावश्यक वस्तूच मिळतील. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी रविवारी याबाबतचे आदेश जारी केले. यात बिगर जीवनावश्यक उत्पादनांची विक्री केली जाऊ नये, असं म्हटलं आहे.

5. राज्यातील पाच कारागृहं पूर्णपणे लॉकडाऊन

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन देशात लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. अशा परिस्थितीत राज्यातील कारागृहातही लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पुण्यातील येरवडा कारागृहसह राज्यातील पाच कारागृहं लॉकडाऊन करण्यात आली असून पुढील आदेशापर्यंत ही सर्व कारागृह बंद असणार आहेत. TV9 मराठीनं ही बातमी दिलीये.

मुंबई मध्यवर्ती कारागृह, ठाणे मध्यवर्ती कारागृह, येरवडा मध्यवर्ती कारागृह, कल्याण जिल्हा कारागृह, भायखळा जिल्हा कारागृह ही पाच कारागृह बंद ठेवण्यात आली आहे. या ठिकाणचा कोणताही अधिकारी आणि कर्मचारी कारागृहाच्या बाहेर जात नाही तसंच बाहेरून कोणीही कारागृहात येत नाही.

एकट्या येरवडा कारागृहात साडेपाच हजार कैदी आहेत. या कैद्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे. या ठिकाणी अनेक कैदी हे गंभीर गुन्ह्यातील शिक्षा भोगत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात आली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)