कोरोना व्हायरस, बॅचलर आणि स्वयंपाक...

    • Author, पराग फाटक
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

एखादं संकट अनेक पातळ्यांवर तडाखा देतं. कोरोनाही त्याला अपवाद नाही. कोरोनाने एकटं राहणाऱ्यांना बेजार केलंय. दररोज जाग आली की खायचं काय करायचं ही समस्या अनेक बॅचलर्सना घेरून टाकते आहे. त्यानिमित्ताने बॅचलर ही संकल्पना उलगडूया. शिक्षणानिमित्ताने, काम-नोकरी-व्यवसायाच्या उद्देशाने किंवा ठरवून एकटी राहणारी माणसं बॅचलर वर्गात मोडतात.

या वर्गाची गंमत म्हणजे याला जात, धर्म, पंथ, लिंग वंश, प्रदेश, पैसे कशाचेच अडथळे नाहीत. 'एकला चलो रे' असा हा पंथ. पेइंग गेस्ट, ग्रुपने राहणारे मित्रमित्र किंवा मैत्रिणी-मैत्रिणी, ऑफिसचे कलिग मिळून एकत्र राहणारे, नातेवाईकांकडे राहणारे यांना या गटात मज्जाव आहे. कुटुंबकबिला म्हणजेच संसार अशी व्याख्या नातेवाईकांनी केलेली असते. परंतु जेवाखायला, चांगलं जगायला प्रत्येकाला लागतं. त्यामुळे बॅचलर हेही संसारार्थीच माणसं. फरक एवढाच यांच्या रथाला एकच चाक असतं आणि ओढणारा माणूसही तोच असतो.

बॅचलर मंडळीतही गट असतात. काही हौशी स्वयंपाक करतात. परंतु ही हौस वीकली ऑफच्या दिवशीच जागृत होते. कोरोनाने कंपल्सरी घरात बसवलं आहे. वरती वर्क फ्रॉम होम झालं आहे. घरातच लॅपटॉप-वायरींची जंजाळं दिसू लागल्याने आता वर्क-फूड बॅलन्स कसा साधायचा असा यक्षप्रश्न अनेकांसाठी झाला आहे. दिलेलं टास्क पूर्ण करावं की एकीकडे कुकर लावावा का शिफ्ट संपल्यावरच जेवण करायला घ्यावं का मध्ये ब्रेक घेऊन भाजी फोडणीस टाकावी अशी नवीनच इक्वेशन्स निर्माण होत आहेत.

काही मंडळी सलाड आणि पालापाचोळा सदराअंतर्गत उरकून घेतात पण बहुतांशांना चौरस आहार लागतो. कामाची वेळ कुठलीही असली तरी दिवसातून दोन जेवणं, एक नाश्ता आणि तीन चहा/कॉफी एवढं लागतंच. बरं मनात आलं आणि घेतलं करायला असं करून चालत नाही. लॉकडाऊन पर्वात, सोशल डिस्टन्सिंग ठेऊन वाणसामान आणलंय का, भाज्या आहेत का, पॅनिक बाईंगमुळे न मिळालेल्या गोष्टी यामुळे आधीच उल्हास अशी परिस्थिती निर्माण होते.

कोरोनाबद्दल अधिक माहिती-

स्वयंपाक ही कलाही आहे आणि शास्त्रही. अस्मादिकांनी वर्क फ्रॉम होम काळात कुकरमध्ये भात लावण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला. परंतु आत वळणदार घुसळून खिटीत बसणारं ते झाकण पाहून तमाम जिम्नॅस्टना वंदन केलं. कुकरची खिटी आहे का सुडोकू असा प्रश्न मनी पडला.

भात राहिला बाजूला पण पायथागोरसलाही बुचकळ्यात टाकणाऱ्या कुकरच्या खिटीरुपी झाकणाने वात आणला. कुकरशी व्यर्थ झटापट सुरू असताना २ कॉल, ३ व्हॉट्सअप कॉल, १ ऑडियो नोट आणि १३७ व्हॉट्सअप मेसेज दाखल झाले होते. एवढ्या वेळात खरंतर भाताची शिटी होऊन वदनी कवळ म्हणायला घ्यायचं त्या काळात युट्यूबवर कुकर लावायचा कसा या ट्युटोरिअलची शिकवणी सुरू झाली होती.

पोटातल्या कावळ्यांचं महाकाय पक्षी अभयारण्यात रुपांतर झालं. आजूबाजूच्या घरातून मसालेदार ग्रेव्ही भाजीचे, तूप ओथंबून वाहणाऱ्या पोळ्यांचे, वाफाळत्या भाताचे गंध विहरू लागले. भात पंचवार्षिक योजना तिथेच सोडून देण्याचा अप्रिय निर्णय घ्यावा लागला. बाजूच्या ड्रॉवरमधून तमाम बॅचलर्सचा परमोच्च आधारवड बाहेर काढला- मॅगी.

बॅचलर मंडळींच्या घरी स्वयंपाकाला ताई, मावशी, काकू येतात. न सांगता दांडी मारणं, अचानक गावी जाणं, ठरलेल्या वेळी सोडून सगळ्या वेळी येणं या प्रकाराला कंटाळून अनेक बॅचलर बल्लवाचार्य बनू पाहतात. परंतु स्वयंपाक हे पूर्णवेळाचं काम आहे आणि हा चहाचा कप आपल्या बसकी बात नही हे लक्षात आल्यावर बहुतांशजण पुन्हा हायबरनेशन मोडमध्ये जातात.

कोरोना पसरू लागल्या लागल्या अनेकघरी स्वयंपाक करणाऱ्या वर्गाने बंडाची हाक दिली. त्यांच्या आणि आपल्या आरोग्याचा मुद्दा लक्षात घेऊन त्यांनी कामावर येणं थांबवलं आणि बॅचलर मंडळींचं धाबं दणाणलं. वाढत्या वयानुसार लागणारी पोळ्यांची चळत, भाजी, गरज लागल्यास आमटी-भात, यादरम्यान चहाची आधणं हे सगळं निगुतीने करणाऱ्या मंडळींना कोरोनाने घरी बसायला लावलं आणि इकडे आम्ही बसकण मारली.

मोठ्या शहरांमध्ये मेस किंवा पोळीभाजी केंद्र असतात. अनेक बॅचलर मंडळी आपापल्या वेळांप्रमाणे तिथे जाऊन खातात. आमटी-भात, पोळी-भाजी, कोशिंबीर, लोणचं पापड, स्वीट एवढं परवडणाऱ्या दरात मिळाल्यावर कोण कशाला किचनमध्ये घुसण्याची तसदी घेतंय. कोरोनामुळे लॉकडाऊन लागलं आणि बॅचलर्सचा घास हिरावून घेतला गेला.

आपण आपलं काम करावं, वेळ झाली की इथे येऊन जेवण करावं या पंथाचे पाईक असणारी मंडळी पार धुपली. रोज नित्यनेमाने जेवण पुरवणाऱ्या दुकानाचं बंद शटर आणि पितळी टाळं पोटात खड्डा करतं. शिकणारी मुलं, अनेक नोकरदार माणसं, व्यावसायिक यांच्यासाठी या जागा श्रद्धेय होत्या, आहेत. कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन लागलं. परंतु प्रत्यक्षात कोरोनाने पोटार्थी आणि अन्नदाते ही साखळीच तोडली.

काही शहरांमध्ये खास बॅचलरसाठीचे ढाबे अड्डे असतात. सब्जी-रोटी, दाल-चावल या उदरभरणाची सोय तिथे होते. बाईक काढली, अड्यावर गेलं, जेवण केलं, मग शेकोटी-सुट्टा असा अनेक बॅचलर्सचा दिनक्रम असतो. आता या अड्यांच्या जागी उष्टं अन्न टिपण्यासाठी येणारे पक्षी-प्राणी निमूट बसलेले दिसतात.

गेल्या काही वर्षात बॅचलर मंडळींसाठी स्विगी, झोमॅटो, फूडपांडा, उबरउट्स (ते वारलं) असे ऑनलाईन आधारवड निर्माण झालेत. खिशात किंवा खात्यात पैसे असतील तर दोन क्लिकवर घरबसल्या हवं ते येतं. स्टार्टर, मेन कोर्स, डेझर्ट्स, आईस्क्रीम, नाश्ता, ब्रँच, लाईट स्नॅक्स काय वाट्टेल ते येतं. कोरोना काळात या आधारवडांनाही धक्का बसला आहे. बनवणारा एक, पॅक करणारा दुसरा, ते घेऊन येणारा तिसरा यामुळे हस्तेपरहस्ते धोका फारच वाढतो. त्यामुळे अनेक बॅचलर मोबाईल उघडतात. जाम भूक लागलेली असते.

खात्यात पैसा असतात, काही मोजकी हॉटेल्स डिलिव्हर करू असं लिहिलेलं दिसतं. पण स्वच्छता पाळा, हात धुवा, सॅनिटायझर लावाचे मेसेज डोळ्यासमोर येऊ लागतात. हे सगळं सगळ्यांनी केलं असेलच याची शाश्वती वाटत नाही. तेवढ्यात आम्ही स्वच्छतेची सगळी काळजी घेतो या आशयाचा फूड डिलिव्हरी कंपनीचा इमेल येऊन थडकतो. बॉटने पाठवला असला तरी या मेलवर विश्वास ठेवावा असं एक मन म्हणतं. पटकन खिचडी करू असं दुसरं मन म्हणतं. बरं ही त्रेधातिरपीट कोणाला सांगायची सोय नाही कारण एकला चलो रे.

कुकरची खिटी बसवणं असो, तळण करताना अंगावर उडणारं तेल असो, भाज्या अणुकुचीदार चिरणं असो- स्वयंपाक करणं हे रॉकेट सायन्स नक्कीच नाही पण ते सगळ्यांनाच जमेल असंही नाही. कारण ते सरावाचं, रियाझाचं काम आहे. त्यात गणित आहे, शास्त्र आहे, सौंदर्य आहे, टायमिंग आहे. स्वयंपाक करताना त्यात मन असावं लागतं आणि जीव ओतावा लागतो. मोबाईलचे नोटिफिकेशन विसरण्याएवढी तन्मयता लागते. लोणचं मुरावं तसं स्वयंपाकाच्या क्लृप्त्या अंगी भिनतात. आला कोरोना, झालो शेफ इतका सोपा हा खेळ नाही.

अशावेळी बॅचलर्सच्या साथीला आपली माणसं धावून येतात. ही माणसं हिशोब मांडत बसत नाहीत, ती ताट मांडतात, डबा देतात. कधी ही माणसं एक्सटेंडेड फॅमिली असते, कधी मित्रमैत्रिणी, कधी सामाजिक संस्था. आपल्या माणसांना थँक्यू म्हणायचं नसतं. त्यांना दुवा देत, त्यांच्या ऋणात राहणंच योग्य. हे सगळं असतानाच फुकट सल्ले देणारे जोमाने कार्यरत असतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणंच योग्य.

स्वयंपाक करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबद्दल आदर होताच, कृतज्ञता तर होतीच. बहुतांश घरांमध्ये आई, बायको, बहीण, आत्या, काकू, मावशी या आयुष्यभर स्वयंपाकाचा भार वाहत आहेत. त्यांचं काम नाही चिरा नाही पणती राहतं. किराणा आणणं, भाज्या आणणं, निवडणं, घरातल्यांच्या आवडीनिवडी लक्षात ठेवणं, सणसमारंभ हे सगळं करून प्रत्यक्ष स्वयंपाक करणं आणि खिलवणं हा अन्नरथ 365 दिवस सुरू असतो. कौटुंबिक सुट्टी किंवा एखाददिवशी हॉटेलिंग सोडलं तर अनेकींचं आयुष्य स्वयंपाकात जातं. अनेकजणी यासाठी करिअरला तिलांजली देतात.

काहीजणी हे सगळं करून नोकरीही करतात, प्रवासही करतात. बाईने स्वयंपाकघरातच राहावं का? अन्नपूर्णेनं स्वत:चा विचार करू नये का? हे प्रश्न आहेतच. तूर्तास आपल्या रचनेत स्त्रीच्या हातात किचन आहे. हल्ली अनेक पुरुष मंडळी हौसेपल्याड जात नियमितपणे स्वयंपाक करू लागली आहेत. पाण्यात पडलं की पोहायला जमतं अशी म्हण आहे. पण म्हणून स्विमिंग पूलमध्ये सूर मारणारा प्रत्येकजण मायकेल फेल्प्स होत नाही. पोटात उसळणारा आगडोंब माणसाला अंतर्बाह्य बदलवतो. कोरोनाने पोटाच्या खळगीला आव्हान दिलंय. कोरोनाचं संकट बिकट आहे, यथावकाश ते जाईल. पण तोपर्यंत स्वत:चं आणि इतरांचंही पोट भरू शकतील अशा एकला चलो रे मंडळींची फौज तयार झालेली असेल हे पक्कं!

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)