कोरोना व्हायरस : चांगल्या कामासाठी उद्धव ठाकरेंना पूर्ण पाठिंबा देईन- पंकजा मुंडे

पंकजा मुंडे

फोटो स्रोत, facebook

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

"महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणून मी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देई. ते परिस्थिती व्यवस्थित हाताळत असल्याचं मला दिसतंय. टीका-टिप्पणी करण्यापेक्षा सूचना करणं हे आता माझं कर्तव्य आहे," अशा शब्दांमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कौतुक केलंय.

बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांनी उद्धव ठाकरेंचं आणि कोरोना व्हायरसची परिस्थिती हाताळण्याच्या त्यांच्या कार्यशैलीचं कौतुक केलंय.

"मुख्यमंत्री कसा असावा, त्याने कपडे कसे परिधान करावे, त्याची बॉडी लँग्वेज काय असावी, त्याने किती व्यक्त व्हावं, त्यांनी सतत दिसावं याविषयी लोकांच्या कल्पना असतात. त्याच्यापेक्षा ते थोडे वेगळे दिसतायत हे मात्र नक्की. त्यांचा पेहराव किंवा ते सोशल मीडियावर स्वतः फार अॅक्टिव्ह नाहीत, पण CMO अॅक्टिव्ह आहे. देवेंद्र फडणवीस स्वतः सोशल मीडियावर अॅक्टिव्ह होते. ते स्वतः ट्वीट करायचे. पण उद्वव ठाकरेंचा कल वेगळा दिसतोय. मला वाटतं ते एक नवीन पायंडा पाडू शकतात. मी त्यांना पूर्ण पाठिंबा देईन कारण लोकांना त्रास होऊ नये म्हणून त्यांची चांगलं काम करावं असं मला वाटतं."

कोरोना
लाईन

"आताची परिस्थिती ही फक्त महाराष्ट्रावर वा उत्तर प्रदेशवर आलेली नसून जगावर आलेली आहे. आणि आता जग हे एक 'कम्युनिटी' झालंय. अमेरिकेची गरज पूर्ण केली म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीट करून मोदींजींचे आभार मानले आहेत. हे यापूर्वी आपण पाहिलं नव्हतं. आतापर्यंत आपल्याला काही हवं असल्यास आपण जगाकडे बघत होतो. पण आता आपण सगळे किती छोटे आहोत, हे जाणवतं. म्हणून आता उद्धव ठाकरेंनी असं का केलं, त्या पक्षाने असं का केलं अशा दृष्टीने बघणार नाही," असं पंकजा मुंडेंनी सांगितलं.

सध्याच्या परिस्थितीत आपण सगळ्या गोष्टींकडे सकारात्मक दृष्टीने पाहत असल्याचं पंकजा मुंडेंनी सांगितलंय.

त्या म्हणाल्या, "मी याकडे पक्षाच्या दृष्टीतून पाहत नाही. मला वाटतं आता जे चालू आहे ते चांगलं चालू आहे आणि त्यासाठी आपण सहकार्य केलं पाहिजे आणि जे वाईट चालू आहे त्याच्यावर बोट दाखवलं पाहिजे. परिस्थिती आटोक्यात आणण्याचे सध्याचे प्रयत्न ठीक आहेत, त्याच्यासाठी आम्ही त्यांना सहकार्य करू."

'जे स्वतःच्या घरापासून दूर, त्यांची काळजी घेण्याची गरज'

असंघटित क्षेत्रातल्या कामगारांविषयीची चिंताही बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी मांडली.

"ऊसतोड कामगार वा जे कामगार आज रस्त्यांवर आहेत, हे आपल्यासाठी मोठं आव्हानन ठरू शकतं. दिल्लीत जो प्रकार घडला तसं महाराष्ट्रात घडू नये याची खबरदारी सरकारने घेण्याची आवश्यकता आहे. नाहीतर जे लोक आता स्वतःच्या घरापासून वंचित आहेत ते थोडेसे आक्रमक होण्याची शक्यता असू शकते."

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Twitter

अनेक ऊस तोडणी कामगार बाहेरच्या राज्यांमध्ये अडकलेले आहेत. याविषयी आपण शरद पवारांशी चर्चा केल्याचं पंकजा मुंडेंनी सांगितलं. "मी फोन केल्यानंतर त्यांनी मला तात्काळ प्रतिसाद दिला. त्यांची माझी चांगली चर्चा झाली. मी त्यांना पत्र लिहिलं. ऊस तोड कामगारांच्या लवादाला मी ऊस तोड कामगारांच्या वतीनं आणि जयंत पाटील यांनी कारखानदारांच्या वतीनं पत्रं लिहिलं. उद्धव ठाकरेंनाही पत्र लिहिलं. मी मुख्यमंत्री कार्यालय, मातोश्री यांच्याही संपर्कात आहे. ऊस तोड कामगारांच्या विषयावर उद्धव ठाकरेंशी थेट चर्चा होऊ शकलेली नाही, पण त्यांच्यापर्यंत हा विषय गेला असून त्यांनी याची दखल घेतलेली आहे."

धनंजय मुंडेसोबत याविषयी चर्चा होते का याचं उत्तर देताना पंकजा म्हणाल्या, "परळीमध्ये आमच्या भूमिकांची अदलाबदल झालेली आहे. मी पण पालकमंत्री होते 5 वर्षं. माझाही जिल्ह्याचा अभ्यास आहे. निर्णय प्रक्रियेतल्या अधिकाऱ्यांशीही माझे संबंध आहेत. मी अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली बरी. धनंजय मुंडेंशी चर्चा करण्याचा योग वा इच्छा झालेली नाही कारण फार कुठे त्यांचा सक्रीय सहभाग मला दिसलेला नाही."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)