कोरोना व्हायरस: कोव्हिड-19 पासून बरी झालेली 81 वर्षांची आजी

कुलवंत कौर
फोटो कॅप्शन, कुलवंत कौर
    • Author, अरविंद छाबडा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, चंदीगढ
  • Published
  • वाचन वेळ: 2 मिनिटे

जगभरात तसंच भारतात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांमध्ये 60 वर्षाहून अधिक वय असलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यातच मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा हृदयविकारासारखे आजार असलेल्यांना कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा धोका इतरांच्या तुलनेत अधिक असल्याचं आतापर्यंतच्या संशोधनात पुढे आलंय.

मात्र या आकडेवारीला खोडून काढत पंजाबमधील एक 81 वर्षांची आज्जी कोव्हिड-19 पासून पूर्णपणे बरी झाली आहे.

चंदीगढला लागून असलेल्या मोहाली शहरातील कुलवंत निर्मल कौर या कोरोनावरील उपचार घेऊन बऱ्या झाल्या आहेत आणि आपल्या घरीही परतल्या आहेत.

“परमेश्वराच्या कृपेमुळेच हे शक्य झालं,” कुलवंत यांचे पुत्र गुरमिंदर सिंह आपल्या भावना व्यक्त करत होते.

अर्थात, आपल्या आईवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही त्यांनी याचं श्रेय दिलं.

गुरमिंदर सिंह सांगतात, “आम्ही घरात क्वारंटाईनमध्ये होतो आणि आई हॉस्पिटलमध्ये. एकमेकांना भेटताही येत नव्हतं. मोहालीच्या खासगी रुग्णालयातील डॉक्टर दीपक भसीन आम्हाला सतत त्यांच्या प्रकृतीची माहिती देत होते.”

मधुमेह आणि रक्तदाबामुळे उपचारादरम्यान आव्हानं

कोरोनाशी लढताना त्यांचं वय ही महत्त्वाची बाब होतीच, पण त्यांना मधुमेह आणि रक्तदाबाचाही त्रास होता. गेल्या तीस वर्षांपासून आपली आई मधुमेह आणि रक्तदाबाच्या गोळ्या खात असल्याचं गुरमिंदर सिंह सांगतात.

"आई सुरुवातीपासूनच सकारात्मक विचार करत होती. आमच्या सगळ्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे तिचं मनोधैर्य अजूनच वाढलं,” ते सांगतात.

कोरोना
लाईन

चंदीगढमध्ये ब्रिटनवरून परत आलेल्या 23 वर्षीय तरुणीला सर्वात पहिल्यांदा कोरोनाची लक्षण दिसून आली होती. 19 दिवस उपचार घेतल्यानंतर ती बरी झाली.

“या मुलीची एक मैत्रीण माझ्या आईच्या फ्लॅटवर भाडेकरू होती,” गुरमिंदर यांनी सांगितलं.

त्यांच्या संपर्कात आल्यानंतर कुलवंत यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आलं. मात्र तिथं जागा नसल्यामुळे त्यांना सिव्हिल हॉस्पिटल, खरड इथं नेण्यात आलं.

कुलवंत यांची सरकारी रुग्णालयाबद्दल कोणतीही तक्रार नाहीये, मात्र खासगी रुग्णालयाच्या तुलनेत तिथं सुविधा कमी असतात, असं त्यांना वाटतं. म्हणूनच त्यांनी नंतर खासगी रुग्णालयात जाणं पसंत केलं.

बऱ्या झाल्या असल्या तरी सध्या कुलवंत आपल्या घरामध्ये क्वारंटाईनमध्ये आहेत.

कुलवंत यांच्या धैर्याला डॉक्टरांचीही दाद

कुलवंत यांच्यावर मोहालीमधील मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर दीपक भसीन यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, की कुलवंत यांची सकारात्मक वृत्ती उपचारादरम्यान खूप महत्त्वाची ठरली, कारण 80 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या रुग्णांना अधिक धोका असतो.

डॉ. भसीन सांगतात, “कुलवंत स्वतः एक नर्स होत्या. उपचारादरम्यान काय काळजी घ्यायची, स्वतःच्या आरोग्याची देखभाल कशी करायची याबद्दल त्यांना माहिती आहे. दरम्यान, त्यांना ताप आला होता. आम्ही त्यांना मलेरियावर दिली जाणारी औषधं दिली. त्यांच्या मधुमेह आणि रक्तदाबाच्या गोळ्या तर सुरूच होत्या. यामुळेही खूप फरक पडला.

"हॉस्पिटलमधल्या दोन आठवड्यांच्या वास्तव्यामध्ये आम्ही त्यांना टीव्ही पाहू देत होतो. त्या गुरूबाणीही ऐकायच्या. पण आम्ही त्यांना फार बातम्या पाहू देत नव्हतो, कारण त्यावर सतत कोरोनाबद्दलच सांगितलं जात होतं," असं डॉक्टरांनी सांगितलं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)