कोरोना व्हायरस: नरेंद्र मोदी यांच्या आवाहनामुळे वीज पुरवठा खंडित होईल का?

फोटो स्रोत, Getty Images
देशात एकाचवेळी लाईट बंद केल्यास वीजपुरवठा खंडीत होईल का?
महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी अशी भीती व्यक्त केली आहे, मात्र भाजप नेते आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही शक्यता खोडून काढली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशातील जनतेशी संवाद साधत 5 एप्रिलला रात्री नऊ वाजता नऊ मिनिटं घरातील दिवे बंद करून घराबाहेर किंवा बाल्कनीत पणत्या आणि मेणबत्या पेटवण्याचं आवाहन केलं आहे.
त्यानंतर देशभरात यावरून वाद प्रतिवाद सुरू झालेत.
महाराष्ट्राचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी एका व्हीडिओद्वारे पंतप्रधान मोदींना याचा पुनर्विचार करण्याविषयी विनंती केली. त्याचवेळी त्यांनी मोदींवर टीकाही केली.
नितीन राऊत म्हणाले, "सगळ्या देशात एकाचवेळी लाईट बंद केली तर वीज पुरवठ्याची मागणी एकदम कमी होईल. आधीच वीज पुरवठ्याची मागणी कमी झाली असल्याने वीज निर्मिती आणि पुरवठ्याचे गणित बिघडले आहे. जर सर्वांनी एकाचवेळी वीज पुरवठा बंद केला तर अजून परिस्थिती बिघडेल.
"स्टेट तसेच सेंट्रल ग्रिड हाय फ्रिक्वेन्सीवर फेल होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. म्हणून अशा विधानांचा पुनर्विचार व्हावा. लाईट बंद न करता फक्त दिवे किंवा मेणबत्ती लावली जावी. अशी माझी सर्वांना विनंती आहे."
महाराष्ट्रातील विज पुरवठ्याच्या सद्यस्थितीवर बोलताना ते म्हणाले, "सद्यस्थितीत महाराष्ट्राची विजेची मागणी 23 हजार मेगावॅटवरून 13 हजार मेगावॅटवर आली आहे. हा अत्यावश्यक सेवा आणि घरगुती वीज वापराचीआहे. लॉकडाऊनमुळे औद्योगिक भार पुर्णतः शुन्यावर आला आहे. जर सर्वांनी अचानक दिवे बंद केले तर ग्रीड फेल होऊन सर्व पॉवर स्टेशन हाय फ्रिक्वेन्सीवर ट्रीप होतील. संपूर्ण राज्य अंधारात जाईल," असा दावाही राऊत यांनी केला.
"महाराष्ट्रसारख्या वीज पुरवठ्याची मोठी मागणी असलेल्या राज्यात जर ग्रीड फेल्यूअरमुळे पॉवर स्टेशन बंद पडल्यास मल्टीस्टेट ग्रीड फेल्यूअर होईल. त्यामुळे पूर्ण देश अंधारात जाईल. अत्यावश्यक सेवा विस्कळीत होतील.
"एक पॉवर स्टेशन पुर्ववत सर्व्हिसमध्ये यायला साधारणतः 16 तास लागतात. याप्रमाणे सर्व परिस्थिती नॉर्मल व्हायला साधारणतः एक आठवडा जाईल. म्हणून मला जनतेला सल्ला द्यायचा आहे की आपण याचा पुनर्विचार करावा.
"कोरोना व्हायरसशी लढा द्यायचा असेल तर सरकारनेच ठरवून दिलेल्या सुचनांचं पालन करावं. दिवे लावायचे असतील तर इलेक्ट्रीकल बल्ब बंद न करता दिवे लावा. मला काहीच हरकत नाही.
"पण देशातील एका राज्याचा उर्जामंत्री म्हणून मला जो धोका दिसत आहे, त्याविषयी मी तुम्हाला अवगत करू इच्छितो. उद्या जर वीजपुरवठा खंडीत झाला तर त्याची सगळी जबाबदारी ही देशाच्या पंतप्रधानावर राहील, कुणा दुसऱ्यावर नाही," असं राऊत म्हणाले.
नितीन राऊत दिशाभूल करत आहेत - बावनकुळे
वीज घालवून दिवे लावण्यावरून आता महाराष्ट्राच्या आजी-माजी ऊर्जामंत्र्यांमध्ये वाद पेटला आहे. नितीन राऊत लोकांची दिशाभूल करत असल्याचे मत माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे. राज्य सरकारला याची तयारी करण्याचा पुरेसा वेळ पंतप्रधानांनी दिला आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
9 मिनिटं दिवे बंद केल्यामुळे काहीही होणार नाही. पंतप्रधानांच्या आवाहनावर कोणीही राजकारण करू नये, असे ते म्हणाले.

- वाचा - कोरोनाचा माझ्या जीवाला किती धोका आहे?
- वाचा -आधी कोव्हिड-19ची किट बनवली, मग बाळाला जन्म दिला
- वाचा-कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?
- वाचा- कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात
- वाचा - कोव्हिड-19 पँडेमिक जाहीर, पण याचा नेमका अर्थ काय?

मात्र ग्रिड फेल्युअर आणि वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता नाकारत केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने यासंदर्भात काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.
"नऊ मिनिटं इलेक्ट्रिक बंद केल्याने तसंच नऊ मिनिटांनंतर सुरू केल्याने हाय ग्रीड पॉवरस्टेशन बंद होणार नाही. विद्युत पुरवठा सुरळीतपणे सुरू राहील. त्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यासंबंधी नियमावलीचं पालन करण्यात आलं आहे", असं ऊर्जा मंत्रालयाने स्पष्ट केलं.
ऊर्जा मंत्रालयाने आणखी काही गोष्टी स्पष्ट केल्या. पंतप्रधानांनी 5 एप्रिलला रात्री 9 वाजता नऊ मिनिटांकरता दिवे बंद करण्याचं आवाहन केलं आहे. रस्त्यावरचे दिवे तसंच संगणक, टीव्ही, फॅन, रेफ्रिजेटर, एसी बंद करायला सांगितलेलं नाही. केवळ इलेक्ट्रिक दिवे बंद करण्याचं आवाहन केलं आहे. हॉस्पिटलमधील तसंच महानगरपालिका, नगरपालिका, पोलीस स्टेशन, उत्पादन केंद्र इथलं कामकाज विनाखंडित सुरू राहील. पंतप्रधानांनी केवळ घरातले दिवे नऊ मिनिटांकरता बंद करण्याचं आवाहन केलं आहे.
सार्वजनिक सुरक्षितता लक्षात घेऊन, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी पथदिवे सुरूच ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
केंद्रीय ऊर्जामंत्र्यांनी पीसीसीआयएल पॉवरग्रिड आणि लोड सांभाळणाऱ्या यंत्रणेसोबत चर्चा केली. पॉवर सिस्टम ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने यासंदर्भात प्लॅन तयार केला आहे. पाचही प्रादेशिक लोड डिस्पॅच केंद्र आणि नॅशनल लोड डिस्पॅच सेंटर सह ब्लॅकआऊटदरम्यान मागणी अचानक कमी झाली तरीही ग्रिडची वारंवारता कायम राखली जाईल. राज्य सरकारांना वेळापत्रक निश्चित करण्यास सांगण्यात आलं आहे.
तांत्रिकदृष्ट्या
याविषयीच्या तांत्रिक बाजू समजून घेण्यासाठी बीबीसीनं 'ऑल इंडिया पॉवर फेडरेशन'चे अध्यक्ष शैलेंद्र दुबे यांच्याशी संपर्क साधला. ते सांगतात, "वीज साठवून ठेवता येत नाही. यामुळे विजेचं जितकं उत्पादन होतं, तितका त्याचा वापर करणं गरजेचं असतं.
"सध्या देशात लॉकडाऊन असल्यामुळे वीजेचं उत्पादन घटलं आहे आणि ते 1,20,000 मेगावॉट इतकं झालं आहे. सर्वसाधारण परिस्थितीत ते 1,67,000 मेगावॉट इतकं असतं."
"अशात ज्यावेळी लोक रविवारी रात्री लाईट बंद करतील, त्यावेळी वीजेच्या वापरात 17,000 मेगावॉटची कमतरता येईल. ज्यावेळी अचानकपणे वीजेचा वापर कमी होतो, तेव्हा वोल्टेज वाढायला लागतं. यामुळे मग सामान्य फ्रिक्वेंसी जी 50 हर्ट्झ असते, ती वाढण्याची शक्यता असते आणि फ्रिक्वेंसी कमी-जास्त झाल्यास ग्रिड फेल होण्याची शक्यता बळावते," असं दुबे म्हणाले.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























