कोरोना व्हायरस: रतन टाटांनी केली ताज हॉटेलमध्ये डॉक्टरांची राहाण्याची सोय #5मोठ्याबातम्या

टाटा

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

विविध वर्तमानपत्र आणि माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या पाच महत्वाच्या बातम्यांचा घेतलेला संक्षिप्त आढावा.

1) टाटांनी आधी 1500 कोटी दिले, आता ताजमध्ये डॉक्टरांना राहण्याची सोय

कोरोना व्हायरसविरुद्ध लढणाऱ्या डॉक्टरांना राहण्यासाठी ताज ग्रुपच्या मुंबईतील हॉटेल्सची दारं खुली राहणार आहेत. कोरोनाग्रस्तांवर उपचार केल्यानंतर डॉक्टर घरी गेल्यास कुटुंबीयांना संसर्ग होण्याची भीती लक्षात घेऊन ताज ग्रुपनं हे पाऊल उचललंय. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिलीय.

मुंबईत ताज ग्रुपच्या मालकीचे कुलाब्यातील ताजमहाल, वांद्रे येथील ताज लँड्स, सांताक्रुजमधील हॉटेल ताज आणि हॉटेल प्रेसिडंट अशी हॉटेल आहेत. या ठिकाणी डॉक्टरांना राहाण्यास रुम्स उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.

कोरोना
लाईन

काही दिवसांपूर्वीच रतन टाटा यांनी त्यांच्या टाटा ट्रस्ट आणि टाटा सन्सच्या माध्यमातून कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईसाठी तब्बल 1500 कोटींची रक्कम दिली होती. टाटांच्या या सर्व निर्णयांचं सर्व स्तरातून कौतुक होतंय.

2) त्या तबलीगी जमातच्या कार्यकर्त्यांवर कडक कारवाई होणार

डॉक्टर आणि नर्ससोबत गैरवर्तन करणाऱ्या तबलीगी जमातच्या कार्यकर्त्यांवर कडक कारवाई करा, असे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयानं सर्व राज्य सरकारांना दिलेत. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली.

कोरोना व्हायरसच्या चाचणीदरम्यान तबलीगी जमातच्या कार्यकर्त्यांकडून नर्स आणि डॉक्टरांसोबत गैरवर्तन केलं जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत.

तबलीगींच्या कार्यक्रमांमुळं देशातील कोरोनाबाधितांचा आकडा प्रचंड वेगानं वाढल्याचं केंद्र सरकारनं सांगितलं.

लाईन

लाईन

गाझियाबादच्या एमएमजी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याऐवजी तबलीगी जमातचे कार्यकर्ते गैरव्यवहार करताना दिसले.

दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये झालेल्या तबलीगी जमातच्या कार्यक्रमाला हजारो जण उपस्थित राहिले. यात काही परदेशी नागरिकही होते. या कार्यक्रमात सहभागी होऊन देशाच्या विविध भागात गेलेल्या लोकांमुळं कोरोना विविध ठिकाणी पसरल्याचं उघड झालं आहे.

3) नवी मुंबईत केंद्रीय सुरक्षा बलाचे 11 जवान कोरोना पॉझिटिव्ह

नवी मुंबईतील खारघरमध्ये बंदोबस्तासाठी असलेल्या केंद्रीय सुरक्षा बलाचे 11 जवान कोरोना व्हायरसच्या चाचणीत पॉझिटिव्ह आढळले आहेत. विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी याबाबत माहिती दिली. एबीपी माझानं ही बातमी प्रसिद्ध केलीय.

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

केंद्रीय सुरक्षा बलाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यातील पाच जण पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर 146 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कळंबोलीतील महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.

यांचीही पुन्हा चाचणी घेण्यात आली, तर आणखी सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळं केंद्रीय सुरक्षा बलातील रुग्ण जवानांची एकूण संख्या 11 वर गेलीय.

प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांवर लक्ष ठेवून असल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी दिली.

4) रेशनसाठी केंद्राची अट नसताना, राज्याच्या अटी का? – फडणवीस

आगामी तीन महिन्यांचे धान्य रेशन दुकानातून देताना केंद्र सरकारनं कुठलीच अट ठेवली नसताना, राज्य सरकारनं अटी का ठेवल्यात? असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलाय. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारनं 24 मार्च रोजी देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केलं. त्याचवेळी, गरिबांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून मोफत धान्य वाटपाचेही राज्य सरकारांना आदेश दिले होते.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

“आधी विकत मिळणारे धान्य घेतले तरच पुढचे धान्य मोफत मिळेल, ज्यांनी नियमित धान्य घेतले, त्यांनाच ते मिळेल, अशा स्वरूपाच्या अटी राज्य सरकारनं ठेवल्यात,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अटी मागे घेऊन गरिबांना धान्य मोफत मिळावे, अशी विनंतीही फडणवीसांनी केलीय.

5) कामावर न आल्यास निलंबन, ST कर्मचाऱ्यांना इशारा

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आलंय. मात्र, अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांसाठी एसटीचे काही मार्ग सुरू आहेत. तरीही काही एसटी चालक, वाहक आणि कर्मचारी गैरहजर राहत असल्याचे लक्षात आल्यानं अशा कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा महामंडळानं दिलाय. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

एसटी

फोटो स्रोत, Getty Images

वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, पालिका कर्मचारी, शासकीय कर्मचारी, अग्निशमन दल इत्यादी अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी एसटीचे काही मार्ग सुरू ठेवण्यात आलेत.

अत्यावश्यक सेवेत वाहतुकीमुळं कुठलाच अडथळा निर्माण होऊ नये म्हणून एसटीनं आढावा बैठक घेतली. नियोजनापेक्षा केवळ 30 टक्केच सेवा सुरू असल्याचे लक्षात आले. एसटीचे अनेक कर्मचारी कामावर गैरहजर राहत असल्यानं महामंडळानं निलंबनाचा इशारा दिलाय. शिवाय, गैरहजेरीच्या कालावधीचा पगारही दिला जाणार नाही, असं स्पष्ट केलंय.

एसटी कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर, निवास, भोजन इत्यादी गोष्टींची व्यवस्था करून देण्याचेही महामंडळांनं आदेशात म्हटलंय.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)