कोरोना व्हायरस : 'अवकाळीतून जीवापाड वाचवलेली बाग आता स्वतःच्या हाताने तोडतोय' - ग्राऊंड रिपोर्ट

फोटो स्रोत, BBC/Anagha Pathak
- Author, अनघा पाठक आणि प्रवीण ठाकरे
- Role, बीबीसी मराठी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
एरवी मरणाच्या वेगाने धावणाऱ्या मुंबई-आग्रा हायवेवर आता नकोशी शांतता आहे. याच हायवेच्या छातीवरून कित्येक हजार कोटींची उलाढाल होते. जमशेदपूरहुन निघालेलं स्टील भिवंडीला पोहचतं, कोकणगावहून निघालेल्या भाज्या मुंबईला पोहोचतात, लासलगावचा कांदा पंजाबच्या बर्नाला मार्केटमध्ये जातो, आणि निफाडची द्राक्ष युरोपला पोहचतात व्हाया हाच हायवे. याच हायवेपासून हाकेच्या अंतरावर आहे मोहाडी.
मोहाडीसारख्या अनेक गावांमध्ये एप्रिल म्हणजे द्राक्षांचा ऐन भराचा सीझन. द्राक्षबागांमध्ये नेहमी असते ती लगबग आता दिसत नाही. रिकाम्या बागांमधल्या टच्च भरलेल्या द्राक्षमण्यांनी लगडलेल्या वेली हा विरोधाभास अधोरेखित करतात.
द्राक्ष तयार आहेत, पण माल घ्यायला कोणी नाही. भरल्या बागांमधली शांतता सहन होत नाही की काय म्हणून इथल्या एका द्राक्ष बागायतदाराने स्वतःच्या हाताने आपली बाग तोडून टाकलीये.
नाशिक जिल्ह्यातल्या मोहाडी गावातले नारायण जाधव द्राक्ष बागायतदार आहेत. पण पोटच्या पोरासारखी जपलेली बाग त्यांनी स्वतःच्या हाताने तोडून टाकली. गुरूवारी (2 एप्रिल) संध्याकाळी आम्ही त्याच्या शेतात गेलो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरची खिन्नता सगळंच सांगत होती.


"काय करू आता हे द्राक्ष ठेवून शेतात?" त्यांनी डोळ्यातले अश्रू पुसत प्रश्न विचारला. त्यांच्या डोळ्यात अनिश्चिततेच सावट स्पष्ट दिसत होतं. मागे उभ्या असणाऱ्यांपैकी कोणीतरी म्हणालं, "ताई, द्राक्ष खाऊन पाहा, तुम्हाला क्वालिटी कळेल." वर हात करून चार द्राक्षं तोडली आणि तोंडात टाकली. उत्तम प्रतीची द्राक्ष होती. पण दुसऱ्याच क्षणाला स्वतःची शरम वाटली.
नारायण जाधव आणि त्यांच्या मुलांनी संपूर्ण दुपार आपली बाग तोडण्यात घालवली. स्वतःच्या शेतात ते असंख्य वेळा राबले असतील पण अशा प्रकारची मेहनत घेण्याचं त्यांच्या स्वप्नातही आलं नसेल.

- वाचा - कोरोनाचा माझ्या जीवाला किती धोका आहे?
- वाचा -आधी कोव्हिड-19ची किट बनवली, मग बाळाला जन्म दिला
- वाचा-कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?
- वाचा- कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात
- वाचा - कोव्हिड-19 पँडेमिक जाहीर, पण याचा नेमका अर्थ काय?

"मागे प्रचंड अवकाळी पाऊस झाला. तेव्हाच वाटलं गेली बाग हातातून. तेव्हा कशी वाचवली आमचं आम्हालाच माहीत. पोटच्या पोरासारखी सांभाळली आणि आता स्वतःच्याच हाताने तोडली," जाधव आपल्या भावना आवरत सांगतात.
त्यांच्या बागेत आता 270 क्विंटल द्राक्ष उभी आहेत. आधीच्या बागेतली द्राक्ष व्यापाऱ्याला 20 रूपये किलोने नुकसान सहन करून विकलीत, पण त्याचे पैसे अजून मिळाले नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे.
"व्यापारी म्हणतो लॉकडाऊन संपल्यावर पैसे देईन. पण हे किती दिवस चालणार, यावर काय पर्याय निघणार काहीच माहिती नाही. बागेवर कर्जकाढून साडेतीन लाख रूपये खर्च केले होते. 40 रूपये किलोनी जरी भाव मिळाला असता तरी 10 लाख रूपये उत्पन्न मिळालं असतं. पण आता आमचा उत्पादन खर्चच निघणार नाही," जाधव सांगतात.
द्राक्ष तयार आहेत पण तोडायला मजूर नाही, बाजारात न्यायला व्यवस्था नाही, आणि इतकं करूनही लोकांच्या दाराशी माल नेला तर घ्यायला ग्राहक नाहीत अशा परिस्थितीत बाग तोडण्याशिवाय आमच्याकडे काही पर्याय नव्हता असं ते म्हणतात.

फोटो स्रोत, BBC/Pravin Thakare
प्रवीण जाधव मोहाडीचे माजी जिल्हापरिषद सदस्य आहेत. ते माहिती देतात. "ही द्राक्ष जर वेळीच बाजारात गेली नाही पूर्णपणे वाया जाणार. मालाला कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवायचं म्हटलं तरी महिन्याला पॅकिंगसह किलोला 35 रूपये खर्च येतो. आणि त्यानंतरही मालाला भाव मिळेल, किंवा माल विकला जाईल याची गॅरेंटी नाही."
या द्राक्षांचे बेदाणे बनवणंही शक्य नाही. कारण त्यासाठी जो कच्चा माल, रसायनं आणि उपकरणं लागतात त्यांचा तुटवडा असल्याचं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. "बेदाणे तयार करायला पोटॅशिअम क्लोराईड आणि डिपींग ऑईल लागतं. त्यांच्या कंपन्या हैदराबाद, सांगली, मुंबई अशा ठिकाणी आहेत. त्या कंपन्याच बंद आहेत, मग आम्हाला माल मिळणार कुठे. सगळीकडून कोंडी झालीये," प्रवीण जाधव उत्तरतात.
द्राक्षबाग तोडल्याने काय साध्य होणार?
पण मुळात द्राक्ष बाग तोडल्याने काय सिद्ध होणार, समजा ही द्राक्ष तशीच राहू दिली असती तर काय बिघडलं असतं? याप्रश्नांची उत्तर शोधायला शेतीचं शास्त्र समजून घ्यावं लागेल. द्राक्षाचं पीक वर्षातून एकदाच येत पण त्याला मेहनत खूप लागते.
या वर्षभराच्या काळात दोन प्रकारच्या छाटण्या होतात. एक ऑक्टोबर छाटणी आणि एक एप्रिल छाटणी. एप्रिल छाटणीला खरड छाटणी असंही म्हणतात. तयार द्राक्ष काढल्यानंतर पुढच्या मोसमासाठी बाग तयार केली जाते, त्याला खरड छाटणी म्हटलं जातं. काड्या (नव्या वेली) तयार करणं, झाडाच्या बुंध्यांना योग्य ती खतं देणं, युरिया देणं असं सगळं केलं जातं. याचा खर्च लाखात असतो.

फोटो स्रोत, BBC/Pravin Thakare
हा खर्च परवडणारा नव्हता म्हणून पूर्ण बाग काढून टाकायचं आम्ही ठरवलं, नारायण जाधव सांगतात.
"आधीच्या बागेची खरड छाटणी झाली आहे, या बागेसाठी तो खर्च करणं शक्य नव्हतं. दोन कुटुंब पोसण्यापेक्षा एक कुटुंब पोसायचं ठरवलं. आधीच बँकेचं कर्ज आहे. आता या जागेवरची बाग काढून इथे भाजीपाला लावणार," सहा वर्ष तळहाताच्या फोडासारख्या जपलेल्या बागेकडे हात करून ते म्हणतात.
गावातल्या लोक म्हणतात ही तर नुसती सुरूवात आहे, अजून अशा अनेक बागा तुटायच्या आहेत.
4 लाख टन द्राक्ष पडून
नाशिक जिल्ह्यातली सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी द्राक्ष बागायतदारांची सहकारी संस्था आहे. संस्थेचे चेअरमन विलास शिंदे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय की एकट्या नाशिक जिल्ह्यात 4 लाख टन द्राक्षांची काढणी आणि विक्री होणं शिल्लक आहे.
सरकारने द्राक्षांचं पॅकिंग आणि निर्यातीला बंदी घातली नसली तरी द्राक्ष निर्यातीत सध्या अनेक धोके आहेत असं त्याचं म्हणणं आहे. "युरोपच्या बाजारात द्राक्ष गेली तरी त्यांची विक्री होऊन त्या मालाचे पैसै मिळणार आहेत का हा खरा प्रश्न आहे. मुळात युरोपातली द्राक्षांची मागणी घटली आहे त्यामुळे आधी जी द्राक्ष निर्यात केली आहेत तीच विकली जातील की नाही हा प्रश्न आहे."

फोटो स्रोत, BBC/Anagha Pathak
देशांतर्गत व्यापारातही लॉकडाऊनचा परिणाम झाल्याचं ते मान्य करतात. द्राक्षाची काढणी, पॅकिंग, वाहतूक, व्यापारी अशी सगळीच सप्लाय चेन तुटल्यामुळे इतर राज्यातही माल पोहचायला अडचणी निर्माण होत आहेत.
"त्याकरिता आम्ही राज्य सरकारशी बोलत आहोत आणि लवकरच यातून मार्ग निघेल अशी आशा आहे. राज्यातच आपला माल विकणं आणि त्या विक्रीतून लगेच पैसै हातात येतील अशी व्यवस्था उभी करणं हे आमच्यासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे," शिंदे नमूद करतात.
याकरिता राज्यसरकारकडून काय प्रयत्न केले जात आहेत याबद्दल मालेगावात बोलताना राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी म्हटलं होतं की, " द्राक्ष, केळी, आंबे आणि संत्र्यांचा सध्या हंगाम आहे. पण कोरोना व्हायरसच्या आपत्तीमुळे त्यांना उठाव नाहीये. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीला राज्यातील माल विकण्याच्या पर्यायाबद्दल आम्ही विचार करतो आहोत. तसंच राज्याबाहेरच्या कोल्डस्टोरेजमध्ये त्यांची साठवणूक करता येईल का याचाही आढावा घेत आहोत."
लॉकडाऊन झाल्यानंतर प्रारंभी गैरसोय झाल्याचं मान्य करत जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतूकीला तातडीने परवाने मिळावे यासाठी ऑनलाईन व्यवस्था सुरू केल्याचंही त्यांनी सांगितलं.
या उपाययोजना पुरेशा आहेत की नाही हे येणारा काळच सांगेल. नारायण जाधवांची सकाळी हिरवीगार असणारी संध्याकाळी सुकायला लागली होती. सुकलेली पानं कराकरा वाजत होती. लांबवर मुंबई आग्रा हायवे, ज्यावरून हीच द्राक्ष वाहून नेली गेली असती, अंधुक प्रकाशात रिकामा आणि भकास दिसत होता.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)























