कोरोनाची चाचणी करायला गेलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर इंदूरमध्ये खरंच दगडफेक?-फॅक्ट चेक

    • Author, कीर्ती दुबे
    • Role, बीबीसी हिंदी फॅक्ट चेक टीम
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दोन हजारपर्यंत पोहोचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 50 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना व्हायरससंबंधित अनेक मेसेज आणि व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. यापैकी एक व्हीडिओ मध्य प्रदेशातल्या इंदूर जिल्ह्यातील आहे.

1 मिनिट 12 सेकंदांचा हा व्हीडिओ इंदूरमधल्या सिलावटपूरा भागातील असल्याचं सांगितलं जात आहे.

या हॅमजेट सूट घातलेले आरोग्य कर्मचारी एका गल्लीतून धावत बाहेर येताना दिसतात. त्यांच्या मागे दगड घेऊन लागलेले काही युवक येतात आणि त्यांच्यावर दगडफेक करतात.

हा व्हीडिओ उंचीवरून बनवण्यात आला आहे. व्हीडिओत बराच आवाज ऐकायला येतो.

व्हीडिओची पडताळणी

इंदूरमधल्या या भागात आरोग्य कर्मचारी एका व्यक्तीची कोव्हिड-19ची चाचणी करण्यासाठी आले होते. पण, जमावानं त्यांच्यावर हल्ला केला. सोशल मीडियावर फिरणारा व्हीडिओ याबद्दलचाच आहे.

बीबीसीनं या व्हीडिओची पडताळणी केली.

आम्ही इंदूरचे पोलीस महासंचालक हरिनारायण चारी मिश्रा यांच्याशी संपर्क साधला.

त्यांनी सांगितलं, "टाटपट्टी बाखल परिसरातील हे प्रकरण आहे. या प्रकरणी दाखल झालेल्या एफआयरमध्ये 8 जणांची नावं आहेत, त्यापैकी 7 जणांना अटक करण्यात आली आहे."

यानंतर आम्ही इंदूरचे पोलीस अधीक्षक महेश चंद यांच्याशी संपर्क साधला.

त्यांनी सांगितलं, "बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास टाटपट्टी बाखल भागात कोव्हिड-19ची तपासणी करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची एक टीम पोहोचली."

"इथं एका व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षण आढळल्याची बातमी मिळाली होती. जेव्हा ही टीम संबंधित व्यक्तीच्या घरी पोहोचली, तेव्हा तिथं फक्त त्यांची आई होती. आरोग्य कर्मचारी त्यांच्यासोबत चर्चा करत असताना तिथं जमलेल्या लोकांना वाटलं, की कर्मचारी त्या वृद्ध महिलेला सोबत घेऊन जातील."

जमावाकडून दगडफेक

त्यानंतर काही लोकांनी डॉक्टरांसहित इतर कर्मचाऱ्यांवर दगडफेक सुरू केली. आरोग्य कर्मचाऱ्यांनी धावत तिथून पळ काढला. आरोग्य कर्मचारी जमावापैकी कुणालाही ओळखत नसल्यानं आम्ही आयपीसीच्या कलम 353 अंतर्गत अज्ञातांविरुद्ध एफआयआर दाखल केली. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून 8 ते 10 जणांची ओळख करण्यात आली. त्यातील 8 जणांना अटक करण्यात आलं.

इंदूरचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण जाडिया यांनी सांगितलं, "जवळपास 6 आरोग्य कर्मचारी टाटपट्टी बाखल भागात गेले होते. यात 2 डॉक्टर, 2 मेडिकल स्टाफ, तसंच आशा आणि अंगणवाडी सेविकासुद्धा होत्या. या हल्ल्यात 2 डॉक्टरांच्या पायाला जखम झाली आहे. या भागात आतापर्यंत 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, तर 54 कुटुंबांना क्वारंटाईन केलं आहे."

याचा अर्थ इंदूरच्या टाटपट्टी बाखल भागात जमावानं आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला केला हे स्पष्ट होतं.

व्हॉट्सअप व्हायरल

या घटनेपूर्वी मंगळवारी (31 मार्च) इंदूरमध्ये व्हॉट्सअपवर एक मेसेज व्हायरल झाला होता.

बीबीसीकडे या मेसेजचा स्क्रीनशॉट आहे. मुस्लिमांना फसवलं जात आहे आणि त्यांना कोरोना पॉझिटिव्ह इंजेक्शन दिलं जात आहे, असं या मेसेजमध्ये म्हटलं जात आहे.

इंदूरचे आरोग्य अधिकारी प्रवीण जाडिया आणि पोलीस अधीक्षक महेश चंद दोघेही असे मेसेज व्हायरस झाल्याचं मान्य करतात आणि याप्रकारचे फेक मेसेज लोकांना प्रशासनाविरुद्ध भडकावण्याचं काम करतात, असंही त्यांना वाटतं.

इंदूरमधील स्थानिक पत्रकार आदिल सईद यांनी बीबीसीला सांगितलं, "टाटपट्टी बाखल भाग इंदूरपासून 5 किमी अंतरावर आहे आणि इथला समाज मागास आहे. इथं बहुसंख्य मजूर राहतात. इथं अनेक जण अशिक्षित असल्यानं इथल्या लोकांमध्ये फेक न्यूज लगेच पसरते."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)