You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरसमुळे इतर रुग्णांचे हाल, लॉकडाऊनमुळे हॉस्पिटल गाठणं झालं अवघड
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
"माझ्या उजव्या डोळ्याच्या कॉर्निया ट्रांसप्लांटची शस्त्रक्रिया तातडीने केली नाही तर माझी दृष्टी जाऊ शकते, असं डॉक्टरांनी सांगितलंय."
बीबीसी मराठीशी बोलताना विजय जाधव यांनी सांगितलं. नंदुरबार येथील शहादाचे रहिवासी असलेल्या 40 वर्षीय विजय जाधव यांना उजव्या डोळ्याने अचानक कमी दिसू लागलं.
मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून त्यांना हा त्रास होण्यास सुरुवात झाली.
"सुरुवातीला उपचारासाठी आम्ही पुण्याला गेलो. तिथे तातडीने शस्त्रक्रीया करण्याची गरज असल्याचं सांगितलं. पण कॉर्निया ट्रांसप्लांट इकडे शक्य नसल्याचे सांगत हैदराबाद, इंदूर या ठिकाणच्या रूग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला," अशी विजय यांची बहीण अंकिता जाधव यांनी सांगितलं
दरम्यान, राज्यात संचारबंदी लागू झाली. देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं. हैदराबाद, गुजरात येथील रुग्णालयात संपर्क साधला असता त्यांनी ट्रांसप्लांटसाठी कॉर्निया नसल्याचं कारण दिलं. हैदराबादच्या रुग्णालयाकडून शस्त्रक्रिया दोन्ही डोळ्यांची असेल तरच या असं सांगण्यात आलं, असंही अंकिता यांनी सांगितलं.
देशभरात लॉकडाऊन असल्याने आणि राज्यातही संचारबंदी असल्याने वाहतूक बंद आहे. नियमानुसार वैद्यकीय उपचारासाठी वाहतुकीला बंदी नसली तरीही खासगी रुग्णालय मात्र उपचारासाठी वेळ देत नसल्याची तक्रार रुग्ण करत आहेत.
" आम्ही आता जालना जिल्ह्यातल्या रुग्णालयात आलोय. इथल्या डॉक्टरांशी चर्चा सुरू आहे, कॉर्निया ट्रांसप्लांटसाठी प्रयत्न करत आहोत," असं अंकिता पुढे सांगते.
याविषयी आम्ही इंदोरच्या सेंटर फॉर साईट या हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. प्रदीप व्यास यांच्यशी संपर्क केला.
त्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "आम्ही केवळ अतिमहत्त्वाच्या शस्त्रक्रिया करत आहोत. कॉर्निया ट्रांसप्लांटसाठी डोनर टिश्यू आवश्यक असतो. त्यासाठी इंदोरमध्ये सरकारमान्य आय बँक चालवली जाते. पण लॉकडाऊन असल्याने ही आय बँक सध्या बंद आहे."
डॉ. व्यास यांनी सांगितलं, "सरकारकडून इलेक्टीव्ह शस्त्रक्रिया बंद करण्यात आल्या आहेत. कॉर्निया ट्रांसप्लांट इलेक्टीव्ह शस्त्रक्रीया असल्याने आम्ही सध्या त्या थांबवल्या आहेत."
इलेक्टीव्ह शस्त्रक्रिया म्हणजे काय ?
महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये इलेक्टीव्ह शस्त्रक्रिया थांबवण्याच्या सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
ज्या शस्त्रक्रिया पूर्वनियोजित असतात त्यांना वैद्यकीय भाषेत इलेक्टीव्ह सर्जरी म्हणतात.
म्हणजेच कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून केवळ तातडीने शस्त्रक्रिया करण्याच्या सूचना आहेत.
सरकारी रुग्णालयात शस्त्रक्रीया घटल्या
मुंबईतील केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "रुग्णांची एकूण संख्या 70 ते 80 टक्क्यांनी कमी झाली आहे. केईएमच्या ओपीडीमध्ये दिवसाला 7 ते 8 हजार रुग्ण येतात, पण गेल्या काही दिवसांत ओपीडीमध्ये येणाऱ्या रूग्णांची संख्या साधारण 1,700 इतकी आहे."
- वाचा - कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?
- वाचा -कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसची लक्षणं दिसायला किती दिवस लागतात?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा -मास्कची विल्हेवाट कशी लावायची? नवं संकट टाळण्यासाठी ‘हे’ नक्की करा
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात
"विविध विभागाच्या एकूण 250 शस्त्रक्रिया दर दिवशी होत असतात, पण आता दिवसाला जवळपास 60 शस्त्रक्रिया पार पडतात."
डॉ.देशमुख यांनी सांगितलं, "सध्या केवळ आपत्कालीन शस्त्रक्रिया करत आहोत. संचारबंदी असल्याने मुंबई बाहेरून येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. प्रसूतिगृह 24 तास सुरू आहे. दिवसाला साधारण 7-8 डिलीव्हरी होत आहेत."
उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू?
राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये खासगी दवाखाने आणि रुग्णालय बंद असल्याचं चित्र आहे. जवळच्या ठिकाणी वेळेत उपचार मिळत नसल्याची तक्रारही रुग्णांकडून केली जात आहे.
याविषयी डॉ. देशमुख यांनी सांगितलं, "खासगी रुग्णालयांकडून आपत्कालीन उपचार नाकारले जात असल्याचं निदर्शनास येत आहे. असे रुग्णही आमच्याकडे येत आहेत. आम्ही त्यांना तातडीने उपचार देण्याचा प्रयत्न करतो, पण इथे पोहोचेपर्यंत रुग्णाचा मृत्यू होत असल्याचंही निदर्शनास आलं आहे."
'कॅन्सर उपचारही पुढे ढकलले'
मुंबईतील कॅन्सर उपचारासाठी सुप्रसिद्ध टाटा मेमोरियल ट्रस्टकडूनही काही रुग्णांच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी जाफरी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "रुग्णलयाने स्वत:हून कोणत्याही शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन हे उपचार रद्द केलेले नाहीत. पण प्रवास करून येणं शक्य नसल्याचं रुग्णांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे अशा शस्त्रक्रीया आम्ही पुढे ढकलत आहोत."
"कॅन्सर रुग्णांना रेडिएशन आणि केमोथेरपीसाठी वारंवार रुग्णालयात यावं लागतं. अशा काही रुग्णांना आम्ही स्थानिक रुग्णालयात जाण्याचा सल्ला देत आहोत," असंही जाफरी यांनी सांगितलं.
आरोग्य विभागाकडून दखल
राज्याच्या आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "खासगी रुग्णालयांना केवळ दैनंदिन शस्त्रक्रिया करू नका, अशी सूचना देण्यात आली आहे. पण आपत्कालीन आणि जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशा शस्त्रक्रियांना रुग्णालय नाही म्हणू शकत नाही."
"राज्यभरात आता आम्ही कोव्हिड-19 साठी रुग्णवाहिका राखीव करत आहोत. प्रत्येक जिल्ह्यांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिका कोव्हिड-19 साठी राखीव करण्याच्या सूचना देणार आहोत. पण इतर रुग्णांनी आपत्कालीन परिस्थितीत 108 या क्रमांकावरच संपर्क साधावा," असंही त्या म्हणाल्या.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)