तबलीगी जमात संस्थेमुळे भारतात कोरोना व्हायरसचा उद्रेक? ट्विटरवर

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

दिल्लीतल्या निझामुद्दीनमधल्या तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमात हजारो जण सहभागी झाले होते. यावरून आता ट्विटरवर जोरदार चर्चा सुरू आहे, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.

निजामुद्दीन भागात तबलीगी जमात या मुस्लिम संस्थेचं मुख्यालय आहे. मार्च महिन्यात इथे एका धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात हजारो लोक सहभागी झाले होते.

एवढंच नव्हे तर सध्या देशात लॉकडाऊन असतानाही इथे मोठ्या संख्येनं लोक एकत्र राहात असल्यामुळे अनेकांमध्ये आजारपणाची लक्षणं दिसून आली.

तबलिगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांची आता तपासणी करण्यात येत आहे. शिवाय या कार्यक्रमात सहभागी झालेले लोक देशभरातल्या कोणकोणत्या भागात गेले, याचाही शोध घेण्यात येतोय.

यावरून आता ट्विटरवर जोरदार चर्चा सुरू आहे, आरोप-प्रत्यारोपसुद्धा सुरू आहेत.

तबलीगी जमातच्या कार्यक्रमाशी संबंध असलेली केस 17 मार्चला सापडूनही गृहखात्याने राज्यांना या विषयीचा इशारा तब्ब्ल 4 दिवसांनी 21 मार्चला दिला, आणि त्यानंतर लॉकडाऊन झाला, असं म्हणत पत्रकार दीप्तीमान तिवारी यांनी इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीची लिंक दिली आहे.

तबलीगी जमातनेही याविषयीची आपली बाजू मांडली. पंतप्रधानांनी 22 मार्चचा जनता कर्फ्यू जाहीर केल्यानंतर संघटनेने आपला कार्यक्रम ताबडतोब थांबवला, पण देशभरातली रेल्वेसेवा बंद झाल्याने या कार्यक्रमासाठी आलेले अनेकजण अडकून पडल्याचं जमातने म्हटलंय. 'द हिंदू'ने याविषयीची माहिती दिलीय.

पत्रकार राणा अयूब यांनीही याविषयी ट्वीटही केलंय.

मात्र ही घटना उघडकीस आल्यापासून ट्विटरवर #TablighiJamaat आणि #CoronaJihaad हे हॅशटॅग ट्रेंड होताहेत. हा प्रकार जाणूनबुजून घडवण्यात आला, हा एकप्रकारचा जिहाद आहे, असा आरोप अनेक जण करत आहेत.

पण या आरोग्य संकटाला धार्मिक रंग न देता एक जागतिक संकट म्हणूनच याकडे बघणं गरजेचं आहे, असाही एक मतप्रवाह आहे.

रिजॉय नावाच्या एका युजरने ट्वीट केलंय की "भाजपचा IT सेल या धार्मिक तेढीच्या गोष्टी पसरवत असून राहुल गांधींनी 12 फेब्रुवारीला कोरोना व्हायरसचा धोका असल्याचा इशारा दिला होता, पण सरकारने त्याकडे दुर्लक्ष केलं."

तर तबलीगी जमातने कोणत्याही नियमांचं उल्लंघन केलं नसल्याचं 'द क्विंट'चे पत्रकार आदित्य मेनन म्हणतात. "13 मार्चच्या दिल्ली सरकारच्या नियमांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचा समावेश नव्हता, तबलीगी जमातचा कार्यक्रम 15 मार्चला झाला आणि 16 मार्चला याविषयीची ऑर्डर काढण्यात आला," असं त्यांनी ट्वीट केलंय.

निझामुद्दीनमधून हॉस्पिटलला नेलं जात असताना हा व्हायरस पसरवण्यासाठी काहीजण बसमधून मुद्दाम बाहेर थुंकल्याचं सांगणारी माहिती आणि त्यासोबत 'आज तक' वाहिनीचा व्हीडिओही ट्विटरवर अनेकांनी शेअर केलाय.

तर याला उत्तर देताना अनेकांनी मध्य प्रदेशातल्या राजकीय घडामोडींचे आणि गर्दीचे फोटो टाकत, "हे देखील निझामुद्दीन होतं का?" असा सवाल केलाय.

"अगदी 9 दिवसांपूर्वीच आपण टाळ्यांचा गजर करत आपल्या आरोग्यसेवकांचे आभार मानले. वैद्यकीय अधिकाऱ्यांपासून ते सफाई कर्मचाऱ्यांपर्यंत सध्या कोरोना व्हायरसशी लढणारे सगळे हे विविध धर्मांचे आहेत, ही वेळ जातीय तेढ वाढवण्याची वा TRPचं गणित साधण्याची नाही," असं म्हणत काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी या व्हायरसच्या प्रादुर्भावाचा जातीय संबंध लावणाऱ्यांची निंदा केलीय.

तर निझामुद्दीनमधला धार्मिक कार्यक्रम कायद्याच्या दृष्टीने का चुकीचा होता, याविषयी आम आदमी पार्टीच्या अक्षय मराठे यांनी ट्वीट केलंय. ते म्हणतात "या कार्यक्रमासाठी परदेशातून लोक आले, या कार्यक्रमात देशभरातून लोक सहभागी झाले आणि हे सगळेजण देशाच्या विविध भागात परतणार होते आणि यामुळे देशभरात कोरोना व्हायरसचा उद्रेक झाला."

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)