You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मंत्रालयात आग, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या शेजारचं केबिन जळालं : #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1) मुंबई : मंत्रालयातल्या चौथ्या मजल्यावर आग
मुंबईतल्या मंत्रालयाच्या इमारतीत सोमवारी (30 मार्च) रात्री साडेआठ-नऊ वाजण्याच्या सुमारास आगीची घटना घडली. सात मजली मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर आग लागली होती. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिलीय.
मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचं कार्यालय आहे. या कार्यालयाशेजारीच ही आग लागली होती.
आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि काही वेळातच आग आटोक्यात आणली. त्यामुळं मोठा अनर्थ टळला.
या आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाहीय.
कोरोनाबद्दल अधिक माहिती-
- वाचा - कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?
- वाचा- कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसची लक्षणं दिसायला किती दिवस लागतात?
- वाचा - कलम 144 म्हणजे नेमकं काय?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात
- वाचा - कोव्हिड-19 पँडेमिक जाहीर, पण याचा नेमका अर्थ काय?
दरम्यान, यापूर्वीही म्हणजे 2012 सालच्या जून महिन्यातही मंत्रालयात आगीची घटना घडली होती. त्यावेळी अनेक कागदपत्र जळून मोठं नुकसान झालं होतं.
2) 'कोरोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी 25 हजार कोटींचं पॅकेज द्या'
कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी लॉकडाऊन केल्यानं अर्थव्यवस्था ठप्प झालीय. या पार्श्वभूमीवर कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी तातडीनं 25 हजार कोटींचं पॅकेज द्या, अशी मागणी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारकडे केलीय. लोकमतनं ही बातमी दिलीय.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण, नितीन गडकरी आणि प्रकाश जावडेकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्र लिहून विशेष आर्थिक पॅकेजची मागणी केलीय.
गेल्या अनेक महिन्यांपासून केंद्राकडून प्रलंबित असलेली 16 हजार 654 कोटींची थकबाकीसुद्धा येत्या 31 मार्चपर्यंत मिळावी, असंही या पत्रातून अजित पवारांनी केंद्राला कळवलंय. तसंच, राज्यासमोरील आव्हानं आणि त्यामुळं निर्माण झालेली आर्थिक स्थितीही त्यांनी या पत्रात मांडलीय.
3) मृतदेहाचं फक्त दहन करण्याचा BMC चा आदेश तासाभरात मागे
कोरोना व्हायरसमुळे निधन झाल्यास मृतदेहाचं केवळ दहन करता येईल, मग तो कोणत्याही धर्माचा असो, असा आदेश मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी काढला. मात्र, महापालिकेच्या परिपत्रकावर प्रश्न उपस्थित होऊ लागल्यानंतर तासाभरातच आदेश मागे घेतला गेला. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिलीय.
आयुक्त प्रवीण परदेशी यांनी तासभरानंतर सुधारित परिपत्रक काढलं. या नव्या परिपत्रकानुसार, कोरोना व्हायरसमुळं मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीला मोठ्या जागेतील कब्रस्तानात दफन करता येईल.
आधीच्या परिपत्रकानुसार, कोरोना व्हायरसनं मृत्यूमुखी पडल्यास त्या मृतदेहाचं केवळ दहन होईल आणि अंत्यसंस्कारावेळी केवळ पाचच लोकांना उपस्थित राहता येईल, असं म्हटलं होतं. शिवाय, महापालिकेच्या हद्दीबाहेर दहन करावं लागेल, असंही त्यात आदेश होता.
दुसरीकडे, पुणे पोलिसांनीही कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी कडक पावलं उचलण्यास सुरूवात केली आहेत. शहरातील नाकाबंदी कडक करण्यात आलीय. तसंच, मॉर्निंग किंवा इव्हिनिंग वॉक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा पुणे पोलिसांनी दिलाय. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय.
4) दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमात सहभागी 6 जणांचा तेलंगणात मृत्यू
दिल्लीच्या निजामुद्दीनमध्ये झालेल्या कार्यक्रमामुळे कोरोना व्हायरसबाबतची चिंता गडद झालीय. या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांपैकी 6 कोरोना व्हायरस बाधितांचा तेलंगणात मृत्यू झालाय. एनडीटीव्हीनं ही बातमी दिलीय.
तेलंगणाच्या मुख्यमंत्री कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीस्थित निजामुद्दीन इथं 13 ते 15 मार्चदरम्यान धार्मिक कार्यक्रम झाला. यात अनेक लोक सहभागी झाले होते. त्यातील 6 जणांचा तेलंगणात मृत्यू झाला.
दुसरीकडे, तेलंगणा सरकारनं कोरोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी लॉकडाऊनसोबतच आणखी पावलंही उचलण्यास सुरूवात केलीय. या विषाणूविरोधात लढण्यासाठी कुठलीच आर्थिक चणचण भासू नये म्हणून तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राज्य सरकारी कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या वेतनात 10 ते 75 टक्के कपात केलीय. हिंदुस्तान टाइम्सनं ही बातमी दिलीय.
तेलंगणात आतापर्यंत 77 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे समोर आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री केसीआर यांनी खबरदारी घेण्याचं आवाहनही केलंय.
5) कोरोना व्हायरस : गायिका कनिका कपूरची चौथी चाचणीही पॉझिटिव्ह
प्रसिद्ध गायिका कनिका कपूर हिची कोरोना व्हायरसची चौथी चाचणीही पॉझिटिव्ह आढळली आहे. त्यानंतर कनिका कपूरनं इन्स्टाग्रामवर काहीशी भावनिक पोस्ट करत, यातून आपण बाहेर येऊ, अशी खात्रीही व्यक्त केलीय. इकॉनॉमिक टाइम्सनं ही बातमी दिलीय.
कनिका कपूर 20 मार्च 2020 रोजी पहिल्यांदा कोरोना व्हायरसच्या चाचणीत पॉझिटिव्ह आढळली होती. त्यानंतर तिला लखनौमधील संजय गांधी पोस्टग्रॅज्युएट इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्समध्ये उपचारासाठी भरती करण्यात आलं.
21 मार्च रोजी कनिकावर हलगर्जीपणाचा गुन्हा उत्तर प्रदेश पोलिसांनी दाखल केला. कारण कनिकानं परदेशातून परतल्यानंतर चाचणी न करताच विविध कार्यक्रमात सहभाग घेतला होता.
दरम्यान, कनिकाच्या सलग चारही चाचण्या पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. याआधी 24 मार्च रोजी दुसरी आणि 28 मार्च रोजी तिसरी चाचणी घेण्यात आली होती.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)