You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस संकटात आपली जातिव्यवस्था डोकं वर काढतीये? - ब्लॉग
- Author, राजेश प्रियदर्शी
- Role, डिजिटल एडिटर, बीबीसी हिंदी
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
आपला सगळा संसार डोक्यावर लादून आपल्या शेकडो किलोमीटरचं अंतर पायी तुडवत आपल्या घराकडे निघालेल्या लोकांकडे पाहिल्यावर जाणवतं, की यांना सरकार किंवा समाजाकडून कोणतीही आशा नाहीये. आपल्या मनोधैर्याच्या भरवशावर हे लोक तगून आहेत आणि त्यांचा विश्वास आता स्वतःवरच आहे.
कोरोनानंतर जग कायमचं बदलेल, असं अनेकजण सांगत आहेत. 9/11नंतरही जग कसं बदललं, आपल्यातील कित्येकांनी पाहिलं आहे. कोरोनाचा परिणाम तर त्याहून अधिक आहे. त्यामुळे जग बदलणारच, ते अनेक प्रकारे बदलेल.
भारतात जे बदल होत आहेत ते समजून घेण्यासाठी दोन छायाचित्रं नीट समजून घ्यायला. एक चित्र आहे दिल्लीतील आनंद विहार बस स्थानकावर हजारोंच्या संख्येनं जमलेल्या मजुरांचं आणि दुसरं आपल्या घरातील ड्रॉइंग रुममध्ये आरामात बसून दूरदर्शनवर रामायण बघणाऱ्या लोकांची, यामध्ये केंद्रीय मंत्रीही आले.
'गरीब भारत' कोरोनाच्या काळात जी पदयात्रा करत आहे, त्यामुळे आपल्या समाजव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
थोड्या वेळासाठी जगभर काय घडतंय ते बाजूला ठेवा. विज्ञानाच्या सीमा, चीनची भूमिका हे सगळं विसरून जाऊया.
ते आणि आपण
तुम्हाला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे भेगाळलेले आणि रक्ताने माखलेले पायाचे तळवे आठवतात? मागच्या दोन वर्षांत नाल्यांची सफाई करताना मरण पावलेले ते कामगार आठवतात? सायकलवरून आपल्या पत्नीचं शव वाहून नेणारा तो कामगार आठवतो?
असे अनेक फोटो आपण पाहतो, थोडावेळ आपल्याला वाईट वाटतं, भावूक होतो. मग अशा लोकांसाठी थोडासा दानधर्म करायलाही आपण तयार होतो. पण आपल्या सामाजिक जाणीवेत त्या भेगाळलेल्या पायांच्या आजीबाई, नाला साफ करणारा कर्मचारी किंवा सायकलवर शव वाहून नेणारा कामगार हे लोक 'दुसरे' लोक आहेत. ते ना आपल्या बरोबरीचे आहेत, ना आपल्यातले आहेत. नागरिक म्हणूनही आपण त्यांना बरोबरीचा दर्जा देत नाही.
आपल्या परिभाषेत ‘आपला समाज’ म्हणजे फ्लॅटमध्ये राहणारा, मुलांना इंग्रजी माध्यमात शिकवणारा, राष्ट्रप्रेमाच्या गोष्टी करणारा, पाकिस्तानला धडा शिकवणारा, लवकरचच आपण जगात पहिल्या क्रमांकाचं राष्ट्र होऊ, असं स्वप्न बघणारा वर्ग. त्यांना आपल्या भूतकाळाचा गर्व आणि उज्ज्वल भविष्याची खात्री असते. लोकसंख्येचा मोठा हिस्सा असणारे, पण समाजाच्या तळाशी असणारे लोक यांच्या खिजगणतीतही येत नाहीत.
लोकांची अल्पकालीन स्मरणशक्ती
हातावर पोट असणारे, सकाळी कमावलं तर रात्री खाऊ शकणारे, पुलाच्या खाली राहणारे, झोपडपट्टीत निवारा शोधणारे अशिक्षित असे हे लोक आपल्यासाठी 'इतर' आहेत... 'अदर्स' आहेत. 'एक भारत, श्रेष्ठ भारत'च्या प्रवासात खरं तर ते पण आपल्यासोबत आहेत. ते आपलं ओझं वाहतात, आपल्यासाठी भाजी आणतात, पण ते आपल्या समाजाचा भाग नव्हेत.
टीव्हीवर रामायण बघणाऱ्या लोकांना हळूहळू आनंद विहारमध्ये कामगारांनी केलेल्या गर्दीचा विसर पडला तर आश्चर्य वाटायला नको. महाराष्ट्रातले शेतकरी जेव्हा रक्ताळलेल्या पावलांनी रस्ता तुडवत होते तेव्हाही टीव्ही वाहिन्यांनी मोहम्मद शमी आणि त्याच्या पत्नीमधील वाद दाखवला होता, कारण स्पष्ट आहे. वृत्तवाहिन्याही ‘ठराविक’ लोकांसाठी आहेत, 'त्यांच्यासाठी' नाहीत.
सोशल मीडियावर कामगारांच्या हालअपेष्टा दाखवणाऱ्या बातम्यांचा पूर आल्यावर शेवटी वृत्त वाहिन्यांनीही तिकडे आपला रोख वळवला. पण या बातम्या देतानाही 2-3 मुद्दे असे होते...
'लॉकडाऊनचा काही उपयोग होणार नाही. कोरोना व्हायरसचा प्रसार आणखी जोमाने होईल. हे लोक बेजबाबदार आहेत. असं कसं करू शकतात? जिथे होते, तिथे पडून राहायला यांना काय होतं?' अशा प्रकारचे प्रश्न या वाहिन्या विचारत होत्या.
पण पोटाच्या चिंतेनं बाहेर पडलेल्या लोकांचे प्रश्न त्यांना दिसत नव्हते.
सरकार आणि समाज
आपण भारतीयांनी स्वातंत्र्याच्या गप्पा कितीही मारल्या, तरी आपल्या मानसिकतेमध्ये भेदभावावर आधारित प्राचीन वर्णव्यवस्थाच रुजलेली आहे. गरीब, शोषित, दलित आणि वंचित वर्गाप्रति आपली जी वागणूक आहे, त्याचच प्रतिबिंब सरकारी धोरणांमध्येही दिसते. सरकार कुठलंही असले तरी मतं कुठून येतात त्यांना माहीत आहे आणि त्याप्रमाणेच त्यांची धोरणं बदलतात.
आता कोरोना व्हायरसच्या उद्रेकावेळी परदेशात अडकलेल्या लोकांना आणण्यासाठी आपण खास विमानं पाठवली जातात. पदयात्रा करणारे कामगार मात्र तीन दिवस वाऱ्यावर सोडलेले असतात.
सोशल मीडियावर खूपच गाजावाजा झाल्यावर काही राज्यांनी त्यांच्यासाठी बसची सोय केली. नंतर काही लोक असंही म्हणत होते, की बस पाठवणं चुकीचं होतं. कारण लोकांनी फुकट प्रवासाच्या अपेक्षेनं गर्दी केली आणि त्यामुळे व्हायरसच्या संसर्गाचा धोका वाढला.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अशा मजुरांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर केलं. याच उत्तर प्रदेशमध्ये पीलिभीतचे एसपी आणि डीएम ‘जनता कर्फ्यू’च्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता जुलूस काढतात. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाचा चुकीचा अर्थ काढत रस्त्यावर गर्दी करतात.
आदर्श भारतीय नागरिकाची व्याख्या
उत्तर प्रदेशमध्ये कावडियांच्या जत्रेत वरिष्ठ पोलीस अधिकारी सहभागी होतात. बढती मिळेल या आशेनं कावड यात्रा करणाऱ्यांचे पाय चेपतानाचे फोटो काढून छापतात. इथं हेलिकॉप्टरमधून कावड यात्रा करणाऱ्यांवर पुष्पवृष्टी करण्याची प्रथा आहे. अयोध्येत तर शेकडो लीटर तेल जाळून दिपमाळा लावल्या जातात.
रोजंदारी बंद झाली तर मजूर वर्गावर घरी परतण्यावाचून पर्याय उरणार नाही हे सरकारला माहीत नव्हतं का?
काही सुशिक्षित लोक तर कामगारांच्या या पदयात्रेला ‘कोरोना पिकनिक’ म्हणून संबोधत होते. हे असे नागरिक आहेत ज्यांना वाटतं, की सगळ्यांनी त्यांच्यासारखं रहावं. आदर्श भारतीयाची एक प्रतिमा त्यांच्या मनात तयार आहे. त्यांच्यासाठी समाज म्हणजे शहरी, स्वच्छ, धार्मिक, देशभक्त वगैरे वगैरे...
दुसरे किंवा बाहेरचे लोक या समाजाला खुपतात. ते अशिक्षित, खेडवळ आहेत. त्यांच्यात सुधारणा होऊ शकत नाही आणि आपल्या इच्छेनं ते असे राहतात असाच या समाजाचा अविर्भाव असतो.
कोरोनाचा प्रादूर्भाव वाढला तर आपला समाज या गरीब वर्गालाच दूषणं देणार. या ‘मूर्ख’ लोकांमुळेच व्हायरसचा प्रसार झाला, नाहीतर आम्ही आमच्या घरी बसून रामायण बघत होतो, देवासमोर दिवे लावत होतो.
ज्यांच्यावर व्हायरस पसरवण्याचा आरोप आपण करत आहोत, त्या लोकांना 21 दिवस जिवंत ठेवण्यासाठी काय उपाय केले, हा प्रश्न या समाजाला पडणार नाही.
देशाच्या पंतप्रधानांनी आरोग्य सेवा पुरवणाऱ्या लोकांचे आभार मानण्यासाठी संध्याकाळी पाच वाजता टाळ्या आणि थाळ्या वाजवण्याचं आवाहन केलं. पंतप्रधानांच्या आवाहनातून एक गोष्ट स्पष्ट झाली, की त्यांना अभिप्रेत असलेला भारत बाल्कनी आणि टेरेसवाल्या घरांमध्ये राहतो.
आपण सर्व खरंच समान आहेत?
भारतीयांमधील हा जो भेदभाव आहे त्याला लोक ईश्वरी संकेत मानतात. गरिबांना आपण थोडीफार मदत करतो, पण या लोकांना आपण स्वीकारलेलं नाही. हे लोक ‘आपल्या’ समाजाचा भाग नाहीत आणि हेच सत्य आहे.
या मानसिकतेची मूळं आपल्या वर्ण व्यवस्थेत आहेत आणि सरंजामशाही आपल्या स्वभावात भिनलेली आहे.
या असहाय्य कामगार लोकांमध्ये सगळ्या जातीचे लोक आहेत. आपण जातिभेदाबद्दल बोलतच नाहीये. अर्थात, हेही खरं आहे, की अनेक मजूर हे मागास जातीतलेच आहेत. पण आता आपण समाजात अतिशय सहजपणे होणाऱ्या भेदभावबद्दल बोलत आहोत.
पाचही बोटं सारखी नसतात, असं म्हणून या भेदभावाला स्वाभाविक ठरवण्याचा प्रयत्न होतो. या व्यवस्थेत बदल करण्याचा विचारही कुणी करत नाही आणि या व्यवस्थेचा फायदा घेणाऱ्या लोकांना असा बदल हवा तरी असेल का?
आपलं सामाजिक वर्तन
तिरुपती पासून ते वैष्णोदेवी मंदिरात लोक हजारो लाखो रुपयांचा दानधर्म करतात. मोठ्या मूर्ती उभारण्यासाठी, भव्य मंदिरं बांधण्यासाठी पाहिजे तितका पैसा गोळा होतो. पण तोच पैसा मजूर आणि कामगारांसाठी हवा असेल तर? देणाऱ्याचा हात नेहमी आखडता असतो.
सध्याचा काळ कठीण आहे. आपल्यासमोरचं आव्हान मोठं आहे. अशावेळी हे लिखाण काहीजणांना झोंबेल. पण भारताच्या एकूण सामाजिक-सांस्कृतिक सुंदरतेत विराट हिंदू संस्कृतीचा जितका वाटा आहे, तितकीच महत्त्वाची भूमिका भारताच्या सामाजिक कुरूपतेमध्येही आहे.
ही वेळ कुणाला दूषण देण्याची नाही. पण विचार करण्याची नक्कीच आहे. बहुसंख्याक समाजाला आपल्या सामाजिक जीवनशैलीवर विचार करणं आवश्यक आहे.
शीख समुदायात गुरू नानकांच्या सच्चा सौद्यापासून परोपकाराची बीजं रुजलेली आहेत. मुस्लिम धर्मीयही जकात आणि खैरातच्या स्वरूपात इतरांना मदत करतात.
हिंदू धर्मीयही दानधर्म करतात, पण त्यात सत्पात्री दान किती असतं? मंदिराबाहेर बसलेल्या भिकाऱ्याला रुपया-दोन रुपये देऊन आपण केवळ मानसिक समाधान मिळवतो.
आपण चर्चेसाठी तयार आहोत?
कोरोनाच्या निमित्तानं हे पुन्हा एकदा दिसून आलं, की सरकार-समाजाच्या निर्णय प्रक्रियेत वर्ण व्यवस्थेचा पगडा मोठा आहे. समाज म्हणून आपण बदलायला तयार आहोत का? लोकशाहीत ज्याप्रमाणे प्रत्येक मताला समान किंमत आहे, त्याप्रमाणे प्रत्येक नागरिकाला समान प्रतिष्ठा नाही मिळू शकणार का? यावर चर्चा करायला आपण तयार आहोत का?
कोरोना संपल्यावर आपण राजकीय क्षुद्रपणा सोडून देशातील सगळ्या लोकांसाठी स्वस्त आणि चांगली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, शाळा, कॉलेज, विद्यापीठ यांची मागणी आपण करणार का? सरकारचा पैसा योग्य कारणावर खर्च करण्यासाठी आपण दबाव आणणार का?
देशात मोठमोठे पुतळे उभारण्यावर चर्चा होईल, तेव्हा तुम्ही देशात हजार लोकांमागे किती डॉक्टर आहेत, रुग्णालयांमध्ये किती खाटा आहेत, किती लोक कुपोषित आहेत, पिण्याचं पाणी सगळ्यांना मिळतं का, लोकांना रोजगार आहे का, तरुणांकडे रोजगारच्या संधी आहेत का, या प्रश्नांचा आपण विचार करत आहोत का?
कोरोना जगभर पसरला होता, भारतातही त्याचा शिरकाव झालेला होता, तेव्हा आपण अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या स्वागताची तयारी करत होतो.
मध्य प्रदेशमध्ये नवीन सरकार स्थापन होण्याचा जल्लोष सुरू होता. या गोष्टी आपल्याला सलत नव्हत्या.
आपल्या नागरिकांचं आरोग्य, शिक्षण आणि त्यांना मिळणाऱ्या सुविधा यांना सोडून गोष्टींसाठी देशाचा पैसा खर्च होणार असेल आणि आपणही नागरिक म्हणून त्यात धन्यता मानणार असू तर कोरोनापेक्षा हे संकट जास्त मोठं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)