कोरोना व्हायरस: महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात नेमकं काय सुरू आहे?

    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

"रात्री झोपणारा कायमचाच झोपेन आणि जागणारा जिवंत राहील" - कोरोना व्हायरससंबंधीच्या या अफवेमुळे महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात माणसं रात्री जागून काढत आहे.

चार दिवसांपूर्वी मी आईला फोन केला तर ती शेतात होती. सरकार घरीच थांबा असं सांगताना असतानादेखील तू शेतात काय करतेय, असं विचारल्यावर ती म्हणाली, "करोनाची बिमारी आली आहे. शेतात आल्यावर करोना होत नाही, म्हणून मग मी दादाच्या लेकरांना घेऊन शेतात आले आहे."

आईचं उत्तर ऐकून मला आश्चर्य वाटलं. ज्या कोरोनाची जगभरात चर्चा सुरू आहे, ज्यामुळे अनेकांचा जीव जात आहेत, त्या कोरोनाविषयी गावाकडे काय स्थिती आहे, हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला. तेव्हा लक्षात आलं की, ग्रामीण भागात एकीकडे कोरोनाबाबत प्रचंड भीतीचं वातावरण आहेच, तर दुसरीकडे अजूनही लोक निर्धास्तही आहेत.

अफवांचं पेव आणि भीती

आज रात्री झोपणारा झोपेन आणि जागणारा जागेन, कोरोना व्हायरसंबंधीची ही अफवा राज्यातल्या एका गावातून दुसऱ्या गावात वाऱ्यासारखी पसरत आहे. या अफवेमुळे राज्यातल्या लातूर, नांदेड, बीड, परभणी, बुलडाणा, अहमदनगर या जिल्ह्यांतील गावांमधील माणसं अख्खी रात्र जागून काढत आहे.

मंगळवारी ही अफवा अहमदनगरमधल्या तांबे वस्तीत पसरली आणि अख्ख्या वस्तीतली माणसं रात्रभर झोपली नाही.

तांबे वस्तीतल्या आदिनाथ गाढेनं याविषयी आम्हाला सांगितलं की, "कुण्यातरी एका बाईची डिलिव्हरी झाली आणि जन्माला आल्याआल्या मुलीनं म्हटलं, 'आज रात्री जो झोपेल, तो कायमचाच झोपेल आणि जो जागी राहील, तो जिवंत राहील. अशी अफवा आमच्या वस्तीत पसरली. त्यामुळे मग वस्तीतील सगळे जण एकत्र जमले आणि रात्रभर गप्पा करत बसले. कुणीच झोपलं नाही."

हीच अफवा बुधवारी रात्री परभणी जिल्ह्यातल्या पालममधील शनिवार बाजारात ऐकायला मिळाली आणि आणि इथल्या अख्ख्या परिसरानं बुधवारची रात्र जागून काढली.

या परिसरातील देवानंद हत्तीअंबीरेनं बीबीसीला सांगितलं, "बुधवारी रात्री 3 वाजता गल्लीतल्या एका माणसाला नातवाईकाचा फोन आला की, कोणत्या तरी गावात एक लहान मूल जन्माला आलं आणि म्हणालं, कोरोना व्हायरस आला आहे. आज रात्री झोपणारा कायमचाच झोपेन आणि जागणारा जिवंत राहील. फोनवर हे ऐकल्यानंतर या माणसानं गल्लीतल्या सगळ्यांना उठवलं आणि झोपू नका म्हणून सांगितलं. यामुळे आमच्या परिसरातील माणसं बुधवारी रात्रभर जागी होती."

बुधवारच्या रात्री ही अफवा माझ्याही गावात (सिनगाव जहांगीर, जि. बुलडाणा) पसरली आणि गावातल्या झोपडपट्टीतली माणसं रात्रभर झोपली नाही.

ग्रामीण भागात या आणि अशा अनेक अफवांमुळे भीतीचं वातावरण तयार झालं आहे.

ग्रामीण भागातील या काही अफवा ज्या सर्रास कुणाच्याही तोंडून ऐकायला मिळतात -

  • बाईला जितके लेकरं, तितके दिवे तिनं देवासमोर लावले तर कोरोना होत नाही.
  • कोरोनापासून ज्यांना बरं वाटलं नाही, त्यांना इंजेक्शन देऊन मारून टाकलं जात आहे.
  • सरकारने अजून करोनाग्रस्तांचा खरा आकडा सांगितला नाही. आपल्यापासून तो लपवला जात आहे.
  • कोरोना आलाय, आता लवकरच या जगाचा अंत होणार आहे.
  • सरकार लवकरच विमानातून औषध फवारणी करणार आहे.
  • कोरोनाचा विषाणू जमिनीवरून चालतो.

'गावाकडे कोरोना येत नाही'

ग्रामीण भागात एका बाजूला अशापद्धतीचं भीतीमय वातावरण असलं, तरी दुसरीकडे मात्र एक प्रकारचा निर्धास्तपणा जाणवतो.

गावात अजूनही मुलं एकत्र येऊन क्रिकेट खेळतात, कॅरम खेळतात, शेतात गहू आणि हरभऱ्याची मळणी सुरू आहे. कोरोनाविषयी पाहिजे तितकं गांभीर्य अजून ग्रामीण भागात जाणवत नसल्याची खंत आदिनाथ बोलून दाखवतो.

औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यातली उपळी गावात राहणाऱ्या विकास शेजूळचाही अनुभव असाच आहे.

"गावाकडे कोरोनाला पाहिजे तितका गांभीर्यानं घेतलं जात नाही. दररोज सकाळी गावातली तरुण मंडळी टोळक्यानं गप्पा मारताना दिसून येते. दुपारी पत्ते खेळताना दिसून येते. गावाकडे कोरोना येत नाही, आमचा बातम्यांवर विश्वास नाही, असं ते म्हणतात. याशिवाय कुरडया, पापडं, शेवया बनवण्यासाठी महिला एकत्र जमत आहेत," विकास सांगतो.

शेतात राहायला प्राथमिकता

कोरोनाच्या भीतीमुळे शहरातील अनेक जण गावाकडे परतले आहेत. पण गावातच वास्तव्यास असणाऱ्या मंडळीपैकी काहींनी आपलं बस्तान गावातून शेतात हालवलं आहे. याशिवाय गावातील काही जण दिवसभर शेतात थांबून संध्याकाळी जेवायला तेवढे घरी येत आहेत.

जालना जिल्ह्यातील गोंदेगावमधील दीपक वाघनं सांगितलं की, "पुणे-मुंबईतील अनेक जण गावात आल्यामुळे गावातल्या काही लोक शेतात राहायला गेले आहेत."

तर लातूर जिल्ह्यातल्या नायगावमधील ऋषीकेश देशमुखनं सांगितलं, "आमच्या गावातील काही कुटुंब शेतात राहायला गेली आहेत. शेतात गेल्यावर कोरोनाचा संसर्ग होणार नाही, आपण सुरक्षित राहू, असं या लोकांना वाटतं."

गावंही लॉकडाऊन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र लॉकडाऊन केल्यानंतर राज्यातील काही गावंही लॉकडाऊन करण्यात आली आहे. यामुळे दुसऱ्या गावातील कुणीही व्यक्ती संबंधित गावात प्रवेश करू शकत नाही.

रायगड जिल्ह्यातल्या वावंढळ गटग्रामपंचातीनंही गाव लॉकडाऊन केलं आहे.

या गावातल्या प्रसाद अटकनं बीबीसीला सांगितलं, "24 मार्चपासून आमचं गाव लॉकडाऊन करण्यात आलं आहे. आता बाहेरगावचे कुणीच आमच्या गावात येऊ शकत नाही. नातेवाईंकानासुद्धा एंट्री बंद करण्यात आली आहे. मुंबई-पुण्यावाल्यांनाही प्रवेश बंदी करण्यात आली आहे."

राज्यात मुंबई आणि पुण्यात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या जास्त आहे. असं असलं तरी फक्त मुंबई-पुणे शहरांजवळील जिल्ह्यांनीच नव्हे, तर विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांतील गावांनाही लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे.

यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील गारगुंडी, लातूर जिल्ह्यातील नायगावचाही समावेश होतो.

नायगावचे सरपंच रमेश मोगले यांनी बीबीसीला सांगितलं, "आम्ही बाहेर गावाहून आलेल्या लोकांची एक यादी बनवली आहे. या लोकांची आधी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन तपासणी केली जात आहे आणि मग पुढचे 15 दिवस त्यांना त्यांच्या घरातच आयसोलेशनमध्ये ठेवलं जात आहे. सध्या बाहेरगावच्या लोकांना गावात प्रवेश दिला जात नाही. "

जंतूनाशकांची फवारणी

कोरोना रोखण्यासाठी गावांमध्ये जंतूनाशकांची फवारणी केली जात आहे. यासंबंधीची माहिती अनेक जण सोशल मीडियावर शेयर करत आहेत.

कोरोना रोखण्यासाठी काय प्रयत्न करत आहात, असं विचारल्यावर सरपंच मोगले म्हणाले, "घरातून बाहेर पडू नका, अशी घोषणा सकाळ-दुपार-संध्याकाळ अशा तीन वेळेस गल्लोगल्ली फिरून लाऊडस्पीकरच्या माध्यमातून केली जात आहे. कोरोना विषाणू पसरू नये म्हणून गावातील सार्वजनिक ठिकाणी जंतूनाशकांची फवारणी केली जात आहे."

आशा वर्कर आणि पोलीस तैनात

ग्रामीण भागात घरोघरी जाऊन कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची नोंद घेण्याचं काम आशा वर्कर करत आहेत.

पुणे जिल्ह्यातील वाल्हे येथील आशा वर्कर रोहिणी पवार यांनी याबाबत सांगितलं की, "आशा वर्कर गावात घरोघरी जाऊन लोकांच्या आरोग्याविषयीची माहिती घेत आहेत. एखाद्या घरी बाहेरगावावरून कुणी व्यक्ती आली का, ते पाहत आहेत. कुणाला सर्दी, खोकला किंवा ताप असेल तर त्याची नोंद ठेवली जात आहे. आणि दररोजचा रिपोर्ट प्राथमिक आरोग्य केंद्रात सबमिट केला जात आहे."

याशिवाय पोलिसांचं पथक दिवसातून दोन ते तीन वेळा गावांमध्ये पाहणी करत असल्याचं चित्र आहे.

जालना जिल्ह्यातील सिपोरा-अंभोरा येथील रहिवासी कैलाश शेवाळे यांनी बीबीसीला सांगितलं, "दिवसातून तीन वेळा पोलिसांची गाडी गावात येत आहे. घरातच थांबा, स्वच्छता पाळा, नेहमी हात धुवा, असं पोलीस गावातल्या लोकांना सांगत आहेत. तसंच मुंबई-पुण्याहून आलेल्या लोकांची माहिती द्या, असंही आवाहन करत आहेत."

अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल – आरोग्य राज्यमंत्री

ग्रामीण भागातील परिस्थिती जाणून घेतल्यानंतर आम्ही महाराष्ट्राचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांच्याशी संपर्क साधला.

ग्रामीण भागातील अफवांविषयी विचारल्यावर यड्रावकर यांनी सांगितलं, "कुणीही अफवांवर विश्वास ठेऊन घाबरून जायचं काम नाही. जिथं जिथं बोगस अफवा पसरवल्या जात आहेत, तिथं तिथं व्हॉट्सअपच्या ग्रुप अॅडमिनवर कारवाई सुरू केली आहे. त्यांच्यावर गुन्हेसुद्धा नोंदवण्यात आले आहेत."

आजही ग्रामीण भागात काही जण कोरोनाविषयी गंभीर नसल्याचं जाणवतं, यावर यड्रावकर यांनी म्हटलं, "आवश्यक नसताना कुणीही गावात फेरफटका मारू नये. आपल्या जीवाची काळजी आपण घेतली तरच यातून मार्ग काढू शकतो. 'मीच माझा रक्षक' ही मोहीम सरकारनं यासाठीच सुरू केली आहे. प्रत्येकानं घरात थांबून सरकारला सहकार्य करावं."

तसंच पोलीस आणि आरोग्य कर्मचारी यांनाही ग्रामीण जनतेनं सहकार्य करावं, असं त्यांनी म्हटलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)