‘हे सर्व 3 आठवड्यात संपेल असं नाही, पुढची तयारी ठेवायला हवी’ : #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वर्तमानपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

1. ‘हे सर्व 3 आठवड्यात संपेल असं नाही, पुढची तयारी ठेवायला हवी’

“कोरोना विषाणूच्या नियंत्रणासाठी देशभरात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, पुढील 3 आठवड्यांमध्ये हे सर्व संपेल असंही नाही. पुढची तयारी ठेवावी लागेल,” असं मत अन्न, नागरी पुरवठा मंत्री आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं आहे. TV9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

“नागरिक किती वस्तूंचा घरात साठा करणार आहेत? माझं त्यांना सांगणं आहे की अन्नधान्य, औषधं, दूध-भाजीपाल्याचा साठा करण्याची गरज नाही. या वस्तू तुमच्या जवळच्या वितरण केंद्रावर पोहचवण्याची पूर्ण खबरदारी आम्ही घेणार आहोत,” असं आश्वासनही छगन भुजबळ यांनी दिलं.

महाराष्ट्रात अन्नधान्याचा अजिबात तुटवडा नाही. 6 ते 8 महिने पुरेल इतकं अन्नधान्य आपल्या कोठारांमध्ये आहे, असंही छगन भुजबळ यांनी नमूद केलं.

2. कोरोनावर इलाज म्हणून विनाकारण हायड्रॉक्सीक्लोरिक्वीन घेऊ नका- केंद्राचा सल्ला

कोरोना विषाणूच्या संसर्गावर प्रभावी इलाज म्हणून काही जणांनी मलेरियावर उपचारासाठी वापरण्यात येणारे हायड्रॉक्सीक्लोरिक्वीन हे औषध स्वतःहून घ्यायला सुरुवात केली आहे. अनेकांकडून औषधांच्या दुकानात या औषधाची मागणी केली जात आहे.

पण अशा पद्धतीने अकारण मलेरियावरील औषध कोणीही घेऊ नये, असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. हिदुस्तान टाईम्सनं ही बातमी दिली आहे.

कोणत्याही औषध विक्रेत्यानं डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय असे औषध देऊ नये, असंही सरकारने स्पष्ट केलं आहे.

कोरोना विषाणुला अटकाव करण्यासाठी केंद्र सरकारने सध्याच्या परिस्थितीत हायड्रॉक्सीक्लोरिक्वीन हे औषध सुचविलं आहे. पण ते केवळ कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर्स, नर्स, आरोग्यसेविका यांच्यासाठी आहे. त्याचबरोबर बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांसाठीही हे औषध सुचविण्यात आले आहे.

3. लॉकडाऊनच्या काळात स्वस्त दरात धान्यपुरवठा

देशभरात लॉकडाऊन असल्यामुळे गरीब, ज्यांचा रोजगार बुडत आहे, अशा नागरिकांना जीवनावश्यक साहित्य कसं मिळणार याबद्दल चिंता व्यक्त केली जात होती.

केंद्र सरकारनं त्यासंबंधी तातडीची पावलं उचलत दोन रुपये प्रतिकिलो दराने गहू आणि 3 रुपये किलो दराने तांदूळ पुरवण्याची व्यवस्था करण्यास केंद्रीय कॅबिनेटमध्ये मंजुरी दिली आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

जीवनावश्यक वस्तूंची दुकानं खुली राहतील तसंच तीन महिन्याचं अन्न-धान्य नागरिकांना आधीच दिलं जाणार आहे, अशी माहितीही केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

4. कोरोनामुळे देशातील टोल नाक्यांवरील वसुली बंद

कोरोनामुळे देशातील टोल नाक्यांवरील वसुली बंद करण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. महाराष्ट्र टाईम्सनं ही बातमी दिलीये.

देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यात टोल नाक्यांमुळे काही प्रमाणात विलंब होत आहे. याची दखल घेत नितीन गडकरी यांनी टोल नाक्यांवरील वसुली बंद करण्याचा निर्णय घेतलाय. ट्वीट करून त्यांनी यासंबंधीची माहिती दिली.

या निर्णयामुळे अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यात होणार विलंब कमी होईल, अशी अपेक्षा गडकरींनी व्यक्त केली.

5. होम क्वारंटाईन असतानाही बाहेर फिरणाऱ्या तिघांवर गुन्हा

घरात राहण्याचे आदेश असूनही बाहेर फिरणाऱ्या तिघांवर रायगड पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. हे तिघेही परदेशातून भारतात आले होते. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील खारशेत भावे येथील होम क्वारंटाइनचे शिक्के असणाऱ्या तीन जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. क्वारंटाइनचे शिक्के असणाऱ्यांवर गुन्हा दाखल होण्याची ही जिल्ह्य़ातील पहिलीच घटना आहे.

या तिघांपैकी दोघे जण दुबईमधून तर एक जण सौदी अरेबियामधून परतला आहे. त्यांच्यात सध्या तरी कोरोनाची कोणतीही लक्षणं नसली तरी नियमानुसार त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे. तरीही ते बाहेर फिरत असल्यामुळे त्यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचं उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)