कोरोना व्हायरस : भिलवाडा भारतातलं इटली ठरत आहे का?

फोटो स्रोत, PTI
- Author, सौतिक बिस्वास
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
आठ मार्चला संध्याकाळी पाच वाजता राजस्थानमधल्या या शहरातील एका खाजगी रुग्णालयातील अतिदक्षता विभाग एकदम सतर्क झाला. 52 वर्षीय एक गृहस्थ न्यूमोनियाने आजारी होते आणि श्वास घ्यायलाही त्रास होत होता.
भिलवाडातील ब्रिजेश बांगर मेमोरियल हॉस्पिटलमधील 58 वर्षीय वरिष्ठ डॉक्टर अलोक मित्तल यांनी रुग्णावर प्रथेप्रमाणे उपचार सुरू केले.
त्यांनी रुग्णाला तो कुठून प्रवास करून आला, महिनाभरात कुठल्या परदेशात गेला होता का, असले प्रश्न विचारले नाहीत. रुग्णानेही स्वत:हून काही सांगितलं नाही. या रुग्णाव्यतिरिक्त आणखी सहाजण अतीदक्षता विभागात होते.
इथल्या उपचारांनी रुग्णाच्या तब्येतीत फारसा फरक पडला नाही. त्यामुळे दोन दिवस वाट पाहून अखेर त्यांना 250 किलोमीटर दूर जयपूरमध्ये दुसऱ्या खाजगी रुग्णालयात हलवण्याचा निर्णय झाला. जयपूरमध्येही एकूण दोन रुग्णालयात या रुग्णावर उपचार झाले.

- वाचा - महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग; पाहा सर्व ताजे अपडेट्स
- वाचा - कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसची लक्षणं दिसायला किती दिवस लागतात?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात
- वाचा - कोव्हिड-19 पँडेमिक जाहीर, पण याचा नेमका अर्थ काय?

"पुढे काय वाढून ठेवलंय याची आम्हाला कल्पनाही नव्हती. आम्ही पद्धतीप्रमाणे उपचार केले," आधीच्या भिलवाडा रुग्णालयात या रुग्णावर उपचार करणारे परिचारक शांतीलाल आचार्य यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
जयपूरमध्येही या रुग्णावर कोरोना व्हायरसची चाचणी करण्याचा विचार तिथल्या रुग्णालयाने केला नाही. रुग्णाची तब्येत खालावत गेली. आणि शेवटी 13 मार्चला त्यांचा मृत्यू झाला. निधनाची बातमी भिलवाडाचे डॉक्टर अलोक मित्तल यांना कळवण्यात आली.

फोटो स्रोत, SHAUKAT AHMED
भिलवाडामध्येच या रुग्णाला संसर्ग झाला असावा असा अंदाज तेव्हा व्यक्त करण्यात आला.
पण, आश्चर्य म्हणजे एवढं सगळं होऊनही तेव्हा डॉक्टरना संभाव्य धोका कळला नाही. देशावर कोरोना व्हायरसच्या साथीचे ढग तेव्हाही होते. कधी ना कधी हा व्हायरस देशात शिरकाव करणार असं बोललं जात होतं. आता तर हा धोका वाढला आहे.
कारण, देशात शेकड्याने लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. आणि अकरा लोक मरण पावले आहेत. पण, अजूनही पुरेशा चाचण्या होत आहेत की नाही यावर प्रश्नचिन्हच आहे. 9 मार्चला डॉक्टर मित्तल आणि त्यांचे काही मित्र उदयपूरला गेले होते. तिथे एका होळी सोहळ्यात त्यांनी भाग घेतला. डॉक्टर मित्तलांशी संपर्क करण्याचा आम्ही वारंवार प्रयत्न केला. पण, त्याला यश आलं नाही.
न्यूमोनियाग्रस्त रुग्णाच्या निधनानंतर लगेचच डॉक्टर मित्तल आणि त्यांचे काही मित्र सरकारी रुग्णालयाने सुरू केलेल्या अलगीकरण वॉर्डमध्ये दाखल झाले. पुढच्या काही दिवसांत भिलवाडा रुग्णालयातील काही लोक तिथे पोहोचले. डॉ. मित्तल यांच्यासह बारा जणांना कोविड-19 रोग झालेला होता.

फोटो स्रोत, SHAUKAT AHMED
संसर्गाची ही बातमी स्थानिक पातळीवर वाऱ्यासारखी पसरली. एरवी भिलवाडामधील हे खाजगी रुग्णालय लोकप्रिय होतं. खासकरून इथल्या ओपीडी सेवेचं लोक कौतुक करायचे. पण, आता तिथल्या डॉक्टरांवर कोरोना व्हायरसचा संसर्ग पसरवल्याचा आरोप होऊ लागलाय. स्थानिक प्रशासनानेही झाल्या गोष्टीची दखल घेतली.
भिलवाडा गावात बाहेरच्यांना प्रवेश नाकारण्यात आला. आणि इथून बाहेर जाण्यावरही बंदी घालण्यात आली.
स्थानिक पातळीवर 'नागरी संचारबंदी' लागू करण्यात आली. सार्वजनिक कार्यक्रम बंद आणि घराबाहेर पडू नका अशा इशारा गावकऱ्यांना देण्यात आला.
शाळा, कॉलेज, कार्यालयं आणि जिल्ह्याच्या सीमाही बंद करण्यात आल्या. ज्या खाजगी रुग्णालयातून हा प्रकार सुरू झाला तेही बंद करण्यात आलं. तिथले 88 रुग्ण इतर ठिकाणी हलवले आहेत.
'स्थानिक प्रशासनाने धोका ओळखला होता. आणि इथून कोरोना विषाणूचा उद्रेक होऊ शकतो असा इशाराने त्यांनी दिला,' असं स्थानिक पत्रकार प्रमोद तिवारी यांनी आम्हाला सांगितलं.
थोडक्यात, उर्वरित भारताने जे पुढच्या काही दिवसांत केलं, ते भिलवाडाने आधीचं सुरू केलं. चार लाख लोकवस्तीचं हे शहर देशातील एक प्रमुख वस्त्रोद्योग केंद्र आहे. आता कोरोना व्हायरसचा भारतातील पहिला हॉटस्पॉट म्हणूनही कदाचित लोकांच्या लक्षात राहील.
या शहरातील 69 लोकांवर कोरोना व्हायरससाठी चाचण्या झाल्या. रविवारपर्यंत यातले तेरा लोक कोविड-19 आजाराने ग्रस्त असल्याचं समोर आलंय. यात डॉक्टर आणि पॅरामेडिकोंचाही समावेश आहे. हे सगळे 24 ते 58 या वयोगटातील आहेत.
याशिवाय आणखी 31 लोक अलगीकरण वॉर्डात राहतायत. हे सगळे रुग्णसेवेशी संबंधित आहेत. म्हणजे भिलवाडातील त्या रुग्णालयाशी त्यांचा कामाच्या निमित्ताने संबंध आलेला होता. त्यातल्या त्यात चांगली गोष्ट ही की, हे सगळे बरे होतील असा विश्वास राज्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी अरुण गौर यांनी बीबीसीशी बोलताना बोलून दाखवलाय.

फोटो स्रोत, SHAUKAT AHMED
ते बरे होतील हे चांगलंच आहे. पण, गोष्टी इथं संपत नाहीत. कारण धोका संपत नाही.
20 फेब्रुवारीपासून अलगीकरण सुरू होईपर्यंत डॉक्टर मित्तल आणि त्यांच्या टीमने राजस्थानातील 13 जिल्ह्यांमधून आलेले 6 हजार 192 रुग्ण तपासले.
शिवाय इतर चार राज्यातील 39 रुग्णही त्यांच्या संपर्कात आले. चीन आणि इटलीचा संदर्भ घेतला तर रुग्णालयातून कोरोना व्हायरस पसरण्याचा धोका सर्वाधिक असल्याचं दिसतं.
सार्स आणि मर्स या पूर्वी पसरलेल्या साथीच्या आजारातही हेच समोर आलं होतं. म्हणूनच भिलवाडा रुग्णालयातून कोरोना व्हायरसचं समूह प्रसारण म्हणजे सोशल ट्रान्समिशन होण्याचा धोका खूप जास्त आहे. प्रशासनालाही तीच भीती वाटते.
आता भिलवाडा शहरात हा व्हायरस नेमका आला कसा? सुरुवातीच्या रुग्णाने त्यासाठी वाहकाचं काम केलं. की इतर जे 80 पेक्षा जास्त रुग्ण त्यावेळी इथं उपचार घेत होते त्यांच्या मार्फत तो इथं आला?
पहिल्या रुग्णाबरोबर अतीदक्षता विभागात असलेल्या रुग्णांचं योगदानही नाकारता येत नाही. किंवा रुग्णालयात काम करणारा एखादा डॉक्टरही कळत नकळत संसर्गग्रस्त असू शकतो.
जोपर्यंत चौकशी आणि चाचण्या, निदान, तपासणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत या प्रश्नाचं खरं उत्तर मिळणार नाही. आणि हे उत्तर माहीत नसणं हेच जास्त भीतीदायक आहे.

फोटो स्रोत, Getty Images
कारण, इथंही सुरुवातीला माहिती उपलब्ध झाली नाही. त्यामुळे गावभर अफवांचं पीक आलं. स्थानिक मीडियाने इथपर्यंत लिहिलं की एका डॉक्टरकडे सौदी अरेबियातून काही मित्र आले होते आणि तिथून त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यांच्याकडून हा व्हायरस इतर रुग्णांपर्यंत पोहोचला.
डॉ. नियाझ खान यांना ही अफवा खोडून काढण्यासाठी एक मोबाईल रेकॉर्डिंग बाहेर पाठवावं लागलं. ते स्वत: तेव्हा उपचार घेत होते. त्यांनी या मोबाईल व्हीडिओमध्ये सांगितलं की, सौदी अरेबियात त्यांचे कुणी नातेवाईक किंवा मित्र नाहीत. त्यांना पत्नी आणि एक मुलगा आहे. पण, त्यांना कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. मीडियात जे बोललं जातंय त्यावर विश्वास ठेवू नका, असं आवाहन या व्हीडिओतून त्यांनी केलं.
आणखी एका डॉक्टरचं असं म्हणणं पडलं की लोकांनी रुग्णालयावर दोषारोप करू नयेत. "अतीदक्षता विभागात रुग्ण दोन दिवस होता. त्यांनी आपण परदेशातून आल्याची माहिती लपवली. आम्हाला फसवलं," असं या डॉक्टरनी सांगितलं.
डॉक्टर मित्तल आणि त्यांच्या पत्नीला कोविड-19 आजार झालाय. पण, ते बरे होत आहेत असंही या डॉक्टरनी सांगितलं.
लोकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन केलं जात आहे.
पण, हे सांगणं सोपं आहे.
परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने स्वयंसेवकांचे तीनशे ताफे शहरभर पाठवले आहेत. भिलवाडा शहरातील 78,000 घरांमध्ये फिरून ही पथकं माहिती घेत आहेत.
कुणाकडे परदेशातून पाहुणे आले आहेत का? घरातील कुणी रुग्णालयात उपचार घेत आहे का? कुणावर पूर्वी कोविड-19 आजारासाठी चाचणी झाली आहे का? असे प्रश्न हे कार्यकर्ते या लोकांना विचारतात.
18 मार्चला हे सर्वेक्षण सुरु झालं. आणि ते 25 मार्चपर्यंत संपेल अशी अपेक्षा आहे. '"सर्दी, खोकला आणि ताप यापैकी कशाचा त्रास होत आहे का, असे प्रश्न या सर्वेक्षणात विचारतात. आणि पुढे जरी त्रास जाणवू लागला तर प्रशासनाला कळवा असं आवाहनही केलं जातं," असं एका स्थानिक व्यक्तीने आम्हाला सांगितलं.
या तीनशे पथकांव्यतिरिक्त 1900 नवी पथकं भिलवाडा शहराच्या आजूबाजूच्या गावांमध्ये पाठवण्यात आली आहेत. भिलवाडाच्या अवतीभवतीच्या खेड्यांमध्ये 25 लाखच्या आसपास लोक राहतात. जिथे संशयित रुग्ण आढळतात त्यांचं विलगीकरण करण्यात येत आहे. आतापर्यंत असे सात हजार रुग्ण आढळले आहेत.
संसर्ग वाढण्याची भीती लक्षात घेऊन 30 खाटा असलेल्या अलगीकरण वॉर्डात आणखी वीस खाटा युद्ध पातळीवर वाढवण्यात आल्या आहेत.
सहा खाजगी रुग्णालयांनी आणखी 35 रुग्णांची अलगीकरणाची सोय करण्याचं आश्वासन दिलं आहे. तेरा अशा जागा निश्चित करण्यात आल्या आहेत जिथे 450 विलगीकरण केलेल्या रुग्णांची सोय होऊ शकेल. इथली क्षमता गरज पडल्यास दोन हजार पर्यंत वाढवण्यात येणार आहे.
"हे एखादं युद्ध लढण्यासारखंच आहे. पण, आम्ही सतर्क आहोत. आणि सज्ज आहोत," जिल्ह्याचे वरिष्ठ आरोग्य अधिकारी राजेंद्र भट्ट यांनी आम्हाला सांगितलं.
उर्वरित भारताप्रमाणे भिलवाडामध्येही लोकांनी लॉकडाऊन आणि संचारबंदी सुरू केली आहे. कम्प्युटर सायन्सचे प्राध्यापक राजकुमार जैन आपल्या दुमजली घरात इतर 14 नातेवाईकांबरोबर अडकून पडले आहेत.
"आम्हाला प्रचंड भीती वाटते आहे. भिलवाडा हे भारताचं इटली होईल असं लोक आम्हाला सांगतायत" अशा भावना बीबीसीशी बोलताना त्यांनी व्यक्त केल्या.
हे नक्की वाचा
हे आवर्जून पाहा
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























