कोरोना व्हायरस : महाराष्ट्रात तब्बल 2200 केंद्रावर होणार चाचणी : #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

आज सकाळी वेबसाइट्स आणि वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

1. राज्यातील कोरोना चाचणी केंद्रांची क्षमता 100 वरून 2200 वर

कोरोना रुग्णांची राज्यातील वाढती संख्या लक्षात घेऊन राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आणि खाजगी केंद्रांच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत करोना व्हायरच्या तपासण्यांची क्षमता शंभराहून बावीसशेपर्यंत वाढविण्यात येत आहे, अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

कोरोनाच्या रुग्णांची चाचणी करण्याकरीता अधिक चाचणी केंद्रं उपलब्ध व्हावीत, या दृष्टीने वैद्यकीय शिक्षण विभागाने डिपार्टमेंट ऑफ हेल्थ रिसर्च अँड इंडियन काऊंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकडे आणखी केंद्रांना नव्याने मान्यता देण्याची विनंती राज्य सरकारने केली होती.

या मागणीनुसार मुंबईतील परळ येथील हाफकिन इन्स्टिट्यूट आणि पुण्यातील बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून जनरल हॉस्पिटल यांना करोना चाचणी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

दरम्यान, परदेशातून परतलेल्या आणि 14 दिवस होम क्वारंटाईन करण्याचे निर्देश दिलेल्या नागरिकांना शोधण्याचं कामही पोलिसांवर येऊन पडलं आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे. या शोध मोहिमेसाठी पोलिसांची १३ पथकं तयार करण्यात आली आहेत.

2. भारतातले 200 विद्यार्थी जॉर्जियात अडकले

कोरोनाच्या साथीमुळे घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे जॉर्जिया देशातील तिबिलिसी शहरात उच्च शिक्षण घेत असलेले भारतातील शेकडो विद्यार्थी अडकून पडले आहेत. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

कोरोनामुळे संपूर्ण जॉर्जियात अघोषित निर्बंध घालण्यात आले असून विमानसेवाही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे भारतात परतण्याचे मार्ग बंद झाले आहेत.

अडकून पडलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची खाण्या-पिण्यापासून ते कोरोनापासून बचाव करण्यापर्यंत प्रत्येक बाबतीत प्रचंड गैरसोय होत आहे.

संपूर्ण युरोपात सध्या करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने या विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली आहे. या विद्यार्थ्यांना तत्काळ भारतात परत आणण्याची मागणी पालक आणि विद्यार्थ्यांकडून होत आहे.

3. दिल्लीला न जाण्याचं शरद पवारांचं खासदारांना आवाहन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून नागरिकांना प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील पक्षाच्या खासदारांना दिल्लीला न जाता आहात तिथेच थांबा! अशा सूचना दिल्या आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठीनं ही बातमी दिलीय.

शरद पवारांनी ट्विटच्या माध्यमातून खासदारांना ही सूचना केली आहे. लोकसभा आणि राज्यसभेच्या पक्षाच्या खासदारांनी सद्य परिस्थितीत दिल्ली जाणे टाळावे. कोरोनाशी लढा देण्यासाठी आपल्याला सरकारी संस्थाना सहकार्य करायचे आहे, असं शरद पवारांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

4. सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज आठवड्यातून दोन दिवस

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयानेही आपलं कामकाज येत्या काही दिवसांसाठी आठवड्यातून केवळ दोन दिवस करण्याचा निर्णय घेतला आहे. द इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी रविवारी (22 मार्च) अन्य न्यायाधीशांसोबत चर्चा केली आणि न्यायालयाचं कामकाज सोमवार आणि बुधवारीच चालेल, असं स्पष्ट केलं आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयातील 4 कोर्टांमधील कामकाज सुरू राहील, असं स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र नवीन निर्णयानुसार सोमवारी केवळ 1 नंबरच्या कोर्टमधील, जिथे स्वतः सरन्यायाधीश उपस्थित असतात, तिथंच कामकाज होईल.

5. सुकमामध्ये नक्षलवादी हल्ला, 17 जवानांचा मृत्यू

देशासमोर कोरोनाचं आव्हान असताना छत्तीसगडच्या सुकमामध्ये नक्षलवादी हल्ल्यात 17 जवानांचा मृत्यू झाला आहे, तर 14 जण जखमी झाले आहेत. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

शनिवारी (21 मार्च) दुपारी सुकमामधील चिंतागुफा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नक्षलवाद्यांनी सुरक्षारक्षकांवर हल्ला चढवला. हे जवान शोध मोहिमेवरून परतत होते.

मृत्युमुखी पडलेल्या 17 जवानांपैकी 12 जवान डीआरजीचे तर 5 जवान हे एसटीएफचे असल्याची माहिती आहे. जखमी जवानांना एअरलिफ्ट करून रायपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती आहे. सुमारे 300 डीएआरजी आणि एसटीएफचे जवान या भागात एका कामगिरीवर निघाले होते.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)