You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस: टाळ्या वाजवल्यानं किंवा घंटानाद केल्यानं विषाणू मरतात का?
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याकरता वैद्यकीय क्षेत्रातील तसंच अत्यावश्यक सेवांमधील कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी टाळ्या वाजवा तसंच घंटा वाजवण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं.
यावरून टाळ्या वाजवणं, शंखनाद करणं, घंटानाद करणं हे कोरोना विषाणूचा नायनाट करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतं असे मेसेज फिरू लागले होते.
कोरोना व्हायरच्या प्रसाराला रोखण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्च रोजी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत 'जनता कर्फ्यू' जाहीर केला.
अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त करण्याचेही मोदींनी आवाहन केलं. त्यासाठी त्यांनी 22 मार्चला संध्याकाळी 5 वाजता 5 मिनिटं देशवासियांनी दरवाजा, खिडकी किंवा गॅलरीत येऊन टाळ्या वाजवा, थाळी वाजवा किंवा घंटनाद करा, असं आवाहन मोदींनी केलं.
खरंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी हे आवाहन केलं होतं. मात्र, अनेकांनी सोशल मीडियावरून या आवाहनाच्या अनुषंगानं काही अफवा पसरवल्या.
"रविवारी संध्याकाळी थाळी किंवा टाळीच्या मदतीनं घंटनाद केल्यास व्हायरस नष्ट होईल. शंख वाजवणं हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे," अशा आशयाचे संदेश सोशल मीडियावर पसरवले जात आहेत.
सोशल मीडियावरून पसरवल्या जाणाऱ्या या मेसेजमध्ये किती तथ्य आहे, याची बीबीसी मराठीनं या क्षेत्रातल्या तज्ज्ञांशी बोलून पडताळणी केली.
'टाळ्या वाजवून, घंटनाद करून विषाणू नष्ट होत नाहीत'
याबाबत प्रख्यात सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. आनंद देशपांडे यांच्याशी आम्ही बातचीत केली. डॉ. आनंद देशपांडे हे वेटनरी महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
डॉ. देशपांडे सांगतात, "टाळ्या वाजवून, थाळ्या वाजवून किंवा घंटनाद करून कुठले विषाणू नष्ट होतात, असं कुठेही संशोधनात आढळून आलं नाही. आवाज किंवा कंपनांमुळे एखादा विषाणू मरतो, असं कुठेच सिद्ध झालं नाही. किंबहुना, तसं काही संशोधनच कुठे करण्यात आलेलं नाही."
- वाचा - कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?
- वाचा -कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसची लक्षणं दिसायला किती दिवस लागतात?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा -मास्कची विल्हेवाट कशी लावायची? नवं संकट टाळण्यासाठी ‘हे’ नक्की करा
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात
मुळात विषाणूवर कुठलाच उपाय होऊ शकत नाही, असं सांगत डॉ. देशपांडे पुढे म्हणतात, "आपण एखाद्या विषाणूला प्रतिबंधित करू शकतो, पण त्यावर इलाज नसतो. मग ते पोलिओ असो वा HIV/AIDS असो. त्यामुळं टाळ्या वाजवणं वगैरे हा उपाय कधीच असू शकत नाही."
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही विषाणू नष्ट करण्यासाठी टाळ्या वाजवा किंवा घंटानाद करा, असं सांगितलं नाही. वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सलाम करण्यासाठीच त्यांनी हे आवाहन केलंय, असं डॉ. देशपांडे सांगतात.
याचवेळी आम्ही डॉ. आनंद देशपांडे यांच्याशी 'जनता कर्फ्यू'च्या वेळ मर्यादेबाबतही चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंतच 'जनता कर्फ्यू' जारी केलाय. या मर्यादित वेळेनं काय साध्य होईल, याचीही माहिती डॉ. देशपांडेंकडून जाणून घेतली.
विषाणूच्या प्रसाराची साखळी तोडण्यासाठी 'जनता कर्फ्यू' महत्त्वाचा - डॉ. देशपांडे
शिंकल्यानंतर बाहेर पडणारे काही थेंब आपल्याला दिसतात, तर काही दिसतही नाही. त्या थेंबात असलेले विषाणूही आपल्याला दिसत नाहीत. अगदी साध्या सूक्ष्मदर्शिकेखालीही विषाणू दिसत नाहीत. ते अल्ट्रा-मायक्रोस्कोपिंग असतात.
याबाबत अधिक विस्तृतपणे डॉ. देशपांडे सांगतात. ते म्हणता, "पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या मर्यादित वेळेचा काही प्रमाणात निश्चितच फायदा होईल. कारण विषाणू जिवंत राहण्याचा काळ मर्यादित असतो."
"एसीच्या 20 ते 28 अंशाच्या वातावरणातही कुणी शिंकला, तरी त्यातून बाहेर पडणाऱ्या थेंबात विषाणू असेल, तर ते 8-9 तासच जिवंत राहू शकतात. उन्हात थेंब दोन तासात वाळून जातो. त्यामुळं विषाणू पसरण्याची साखळी तोडण्यासाठी 'जनता कर्फ्यू'ची वेळ नक्कीच काही प्रमाणात मदत करेल, असं डॉ. देशपांडे सांगतात.
"अशा छोट्या-मोठ्या गोष्टीतून कोरोना व्हायरसचा प्रसार रोखणं हे अधिक आपल्या हातात आहे. याचं कारण आपल्या देशातील आरोग्य व्यवस्था मोठ्या प्रमाणातील रुग्णांना उपचार देऊ शकेल इतकी सक्षम नाहीये," असं डॉ. देशपांडे सांगतात.
PIB च्या फॅक्ट चेक टीमकडून अफवांचं खंडन
दरम्यान, भारत सरकारच्या प्रेस इन्फर्मेशन ब्युरो (PIB) च्या फॅक्ट चेक ट्विटर हँडलवरूनही सोशल मीडियावर पसरणाऱ्या या संदेशांबाबत स्पष्टीकरण देण्यात आलंय.
"टाळ्या वाजवल्यानं कोरोना व्हायरसचे विषाणू नष्ट होत नाहीत. देशावरील या संकटसमयी रांत्रदिवस काम करणाऱ्या वैद्यकीय आणि इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी, त्यांचा आदर करण्यासाठी टाळ्या वाजवण्याचं आवाहन करण्यात आलंय," असं पीआयबी फॅक्ट चेकनं म्हटलंय.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)