You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस : जनता कर्फ्यूमुळे 3700 रेल्वेगाड्या रद्द, तर मास्क-सॅनिटायझरच्या किंमती निश्चित, #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. जनता कर्फ्यू: रविवारी 3,700 रेल्वेगाड्या रद्द
जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर रविवारी म्हणजेच 22 मार्चला देशातील 3700 रेल्वे रद्द करण्याचं रेल्वे मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिली आहे.
शनिवारी रात्री 12 वाजेपासून रविवारी रात्री 10 वाजेपर्यंत देशातल्या कोणत्याही रेल्वे स्थानकावरून कोणतीही रेल्वे सुटणार नाही, असं मंत्रालयानं म्हटलं आहे.
तर आधीच प्रवासात असलेल्या रेल्वेगाड्यांना थांबवण्यात येईल आणि प्रवाशांना प्रवासी कक्षात ठेवण्यात येईल, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
दरम्यान, येत्या रविवारी, 22 मार्चला 'जनता कर्फ्यू' पाळूया. हा जनतेने जनतेसाठी लावलेला कर्फ्यू असले, त्या दिवशी सकाळी 7 ते रात्री 9 घराबाहेर पडायचं नाही, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे.
- महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग; पाहा सर्व ताजे अपडेट्स
- वाचा-कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?
- वाचा -कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा -कोरोना व्हायरस : वाचण्याची शक्यता असलेल्यांवरच होत आहेत उपचार
- वाचा -कोरोना व्हायरस महाराष्ट्रात असा पसरला
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात
तसंच केंद्र सरकारने आता मास्क आणि हँड सॅनिटायझरच्या किमती निश्चित केल्या असून त्याहून अधिक भावानं विकणाऱ्या विक्रेत्यांवर जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. ही माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी दिली आहे.
जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत दुहेरी आणि तिहेरी मास्कमध्ये वापरण्यात येणाऱ्या फॅब्रिकची किंमत 12 फेब्रुवारी 2020ला जेवढी होती तेवढीच असणार आहे. दुहेरी मास्कची किंमत 8 रुपये आणि तिहेरी मास्कची किंमत 10 रुपयांपेक्षा अधिक नसेल.
तर 200 ML इतक्या क्षमतेच्या हँड सॅनिटायझर बाटलीची किंमत 100 रुपयांपेक्षा अधिक असणार नाही, असंही पासवान यांनी सांगितलं.
30 जून 2020 पर्यंत या किमती देशभरात लागू राहतील, असंही ते म्हणाले आहेत.
2. रेशन दुकानांना 3 महिन्यांचं धान्य वाटप - अजित पवार
राज्यातल्या रेशन दुकानांना 3 महिने पुरेल इतके धान्य, कांदे, बटाटे देण्याचे निर्देश राज्य सरकारनं दिले आहेत. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी पत्रकारपरिषदेत ही माहिती दिली आहे. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिली आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी राज्याकडे पुरेसा निधी आहे, असंही त्यांनी म्हटलंय.
राज्यातल्या जनतेनं लग्न, अंत्यसंस्कार यासारख्या कार्यक्रमांना गर्दी करू नये. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनाबाबत भावनिक मुद्दे आणून अडथळे निर्माण करू नये, असंही ते म्हणाले आहेत.
3. देशभरात 2018मध्ये 501 बालविवाह
2018 मध्ये देशभरात 501 बालविवाह झाल्याची नोंद झाली असून त्यातले बहुसंख्य आसाममधील असल्याची माहिती केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभेत दिली. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली.
आसाममध्ये सर्वाधिक 88, त्याखालोखाल कर्नाटकमध्ये 73, पश्चिम बंगालमध्ये 70, तर तामिळनाडूमध्ये 67 बालविवाह झाल्याची माहिती त्यांनी दिली.
गेल्या काही वर्षांत बालविवाहांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे का, या प्रश्नाच्या लेखी उत्तरात इराणी यांनी सांगितलं, "18 वर्षांखालील महिलांच्या विवाहाचे प्रमाण कमी झाले आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-3 नुसार 2005-06मध्ये बालविवाहाचे प्रमाण 47.4 टक्के इतके होते, तर 2015-16मध्ये ते मध्ये 26.8 टक्के इतके झाले आहे."
4. 'माझ्याही मुलीला लवकरात लवकर न्याय द्या'
निर्भयाला न्याय मिळाला त्याचा आनंद होत आहे. आता माझ्याही मुलीला लवकरात लवकर न्याय मिळावा, अशी मागणी हिंगणघाट जळीत कांडातील तरुणीच्या आईनं सरकारकडे केली आहे. झी 24 तासनं ही बातमी दिली आहे.
महिलांवर अत्याचार करणाऱ्यावर कडक कायदा झाला पाहिजे, असंही त्या म्हणाल्यात.
वर्ध्यातील हिंगणघाटमध्ये तरुण शिक्षिकेला जाळण्यात आलं. याप्रकरणी आरोपी विकेश नगराळे याला अटक करण्यात आली आहे. हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
दरम्यान, दिल्ली निर्भया बलात्कार घटनेतल्या 4 दोषींना 10 मार्चला फाशी देण्यात आली.
5. पीटर मुखर्जींची 4 वर्षांननंतर तुरुंगातून सुटका
शीना बोरा हत्याप्रकरणातील आरोपी पीटर मुखर्जी यांची 4 वर्षांनी आर्थर रोड तुरुंगातून सुटका झाली आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे.
मुखर्जी यांना जामीन मंजूर करताना मुंबई उच्च न्यायालयानं सीबीआयला अपीलासाठी 6 आठवड्यांचा अवधी दिला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल न केल्याने मुखर्जी यांची सुटका झाली आहे.
6 फेब्रुवारीच्या सुनावणीदरम्यान पीटर हे या प्रकरणातील मुख्य आरोपी किंवा प्रथम दर्शनी पुरावा नसल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला होती. शुक्रवारी पीटर यांच्या वकिलाने सुटकेची विनंती केली. सीबीआयकडून कुठलेही पाऊल न उचलल्याने त्यांची कारागृहातून सुटका करण्यात आली. शिवाय त्यांना देश सोडून जाता येणार नाही, असे निर्देश देण्यात आले.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)