निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशी हा न्यायाचा विजय - नरेंद्र मोदी

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

2012 साली डिसेंबर महिन्यात दिल्लीत घडलेल्या निर्भया प्रकरणात दोषी सिद्ध झालेल्या मुकेश सिंह, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि अक्षय ठाकूर यांना शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता फाशी देण्यात आली.

अखेर सात वर्ष तीन महिने आणि 4 दिवसांनंतर निर्भयाला न्याय मिळाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना हा न्यायाचा विजय असल्याचं म्हटलं आहे.

त्यांनी ट्वीट केलंय की, "हा न्यायाचा विजय आहे. महिलांचा सन्मान आणि सुरक्षा सगळ्यात महत्त्वाचं आहे. आमच्या नारी शक्तीनं प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आम्हाला एकत्रितपणे असे राष्ट्र निर्माण करावे लागेल, जेथे महिला सबलीकरणावर लक्ष केंद्रित केले जाईल, जेथे समानता आणि संधी यावर जोर देण्यात येईल."

दरम्यान, फाशी टाळण्यासाठी दोषींनी वारंवार याचिका दाखल केल्या होत्या. त्यांच्या याचिका तब्बल तीनवेळा फेटाळण्यात आल्या. शेवटच्या क्षणापर्यंत दोषींच्या वकिलांनी कोर्टात युक्तीवाद करण्याचा प्रयत्न केला. फाशीच्या 2 तास आधीपर्यंत सुप्रीम कोर्टात नेमकं काय नाट्य रंगलं हे वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

फाशी झाल्यानंतर निर्भयाची आई आशादेवी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं, "आमची मुलगी आता आमच्यात नाही आणि ती कधीच परतणार नाही. आमच्या मुलींसाठी आम्ही ही लढाई सुरू केली होती, ती अशीच सुरू राहील. मी माझ्या मुलीच्या फोटोला मिठी मारली आणि तुला न्याय मिळाला, असं म्हटलं.

चारही दोषींची डॉक्टरांनी तपासणी केली असू त्यांना मृत घोषित करण्यात आल्याचं तिहार जेलचे डायरेक्टर जनरल संदीप गोयल यांनी सांगितलं आहे.

तिहार तुरुंगाच्या बाहेर जमलेल्या लोकांनी मिठाई वाटत दोषींना फाशी देण्यात आल्याचा आनंद व्यक्त केला. यामध्ये महिला हक्क कार्यकर्त्या योगिता भायाना यादेखील सहभागी होत्या.

आजची फाशी हा सगळ्यांसाठी एक धडा असला तरी हे आधीच करता आलं असतं. आता लोकांना कळेल की आपल्याला शिक्षा होईल. कदाचित ती तारीख तुम्हाला पुढे ढकलता येईल, पण तुम्हाला अखेर शिक्षा होईलच, असं राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी ANI शी बोलताना म्हटलंय.

प्रतिक्रिया

निर्भयाच्या दोषींना फाशीची शिक्षा झाल्यानंतर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत म्हटलंय, "निर्भयाला आज न्याय मिळाला, पण जवळपास सात ते साडेसात वर्षांच्या कठोर संघर्षातून निर्भयाचं कुटुंब गेलं, हे अतिशय दुर्दैवी आहे. अशा भयंकर घटना आपल्या देशातच नव्हे, तर जगातही होता कामा नये. बलात्कार ही मोठी आणि भयानक गोष्ट आहे. माझं म्हणणं आहे की छेडछाडमुक्त देश आणि जग असावं."

"महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 'दिशा' कायद्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी ते आंध्र व तेलंगणास जाऊन माहिती घेऊन आले आहेत. कोरोना व्हायरसचे संकट दूर झाल्यानंतर दिशा कायदा राज्यात व देशात लागू करण्यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प आम्ही सर्वजण आमचे मतभेद दूर ठेवून करीत आहोत," असंही त्यांनी म्हटलंय.

अशी घडली होती घटना

6 डिसेंबर 2012 च्या रात्री 9 वाजता दिल्लीतल्या मुनारिकाजवळ चालत्या बसमध्ये 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्काराची क्रूर घटना घडली. या घटनेनं दिल्लीसह भारतभर पडसाद उमटले. आंतरराष्ट्रीय स्तरावरही ही घटना चर्चेचा विषय ठरली.

या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पीडितेला पुढे 'निर्भया' नाव देण्यात आलं. या निर्भयासाठी 16 डिसेंबरचा दिवस नरकयातनांचा होता.

झालं असं होतं, की पॅरामेडिकलची विद्यार्थिनी असलेली 'निर्भया' आणि तिचा इंजिनिअर मित्र दिल्लीतल्या साकेतमधील मॉलमधून 'लाईफ ऑफ पाय' सिनेमा पाहून परतत होते.

डिसेंबरच्या महिन्यात दिल्लीत खूप थंडी पडते आणि अंधारही लवकर पडतो. कुट्ट काळोखाला आणि बोचऱ्या थंडीला चिरफाडत रस्त्यांनी भरधाव धावणाऱ्या गाड्या वगळता, रस्त्याला कुणीच नव्हतं.

निर्भया आणि तिच्या मित्राला द्वारकाला पोहोचायचं होतं. दोघेही द्वारकाला जाणाऱ्या एका बसमध्ये मुनारिकाहून चढले. तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते.

त्या बसमध्ये आधीपासूनच चालकासह सहा जण होते.

बसचा प्रवास सुरू झाल्यावर त्या सहा जणांनी निर्भयासोबत छेडछाड करयाला सुरूवात केली. त्यावेळी तिच्या मित्रानं पटकन हस्तक्षेप केला. मात्र, आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली आणि त्यात तो बेशुद्ध पडला.

या सहा जणांनी बसमध्येच निर्भयावर बलात्कार केला. केवळ बलात्कार करून थांबले नाहीत, तर तिला अमानुष मारहाण केली आणि तिला गंभीररीत्या जखमी केलं.

त्यातला एकाने गंजलेली लोखंडी रॉड निर्भयाच्या गुप्तांगात घुसवली. या कृत्यामुळं निर्भयाच्या शरीरातील आतडी बाहेर आली. शरीरावरील अमाप आणि तीव्र जखमांनी मृत्यूशी झुंजणारी निर्भया रक्तानं माखली.

त्यानंतर त्यांनी निर्भयासह तिच्या मित्राला नग्न केलं आणि वसंत विहारजवळ चालत्या बसमधून रस्त्यावर फेकून दिलं. निर्भया रक्ताच्या थारोळ्यात रस्त्याच्या बाजूला निपचित पडली होती, तर तिचा मित्र प्राणांतिक आक्रोशानं मदतीची याचना करत विव्हळत होता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)