कोरोना व्हायरसः क्वारंटाईनमधील अनुभव कसा असतो?

आशिष यादव आणि नेहा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आशिष यादव आणि नेहा
    • Author, सिंधुवासिनी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे तुम्हाला क्वारंटाईन केलं तर, एकटं राहायला सांगितलं तर?

सध्या कोरोना व्हायरसची सगळीकडे चर्चा सुरू आहे.

टीव्ही, वर्तमानपत्र सगळीकडेच कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठीचे उपाय सांगितले जात आहेत.

या उपायांपैकी एक आहे - क्वारंटाईन.

एखाद्या आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी रुग्णाला काही कालावधीकरता एकटं ठेवणं, याला वैद्यकीय भाषेत क्वारंटाईन असं म्हणतात.

BBC
Presentational grey line

कोरोना व्हायरस हा एक संसर्गजन्य आजार असल्यामुळे कोरोनाचे पीडित आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईन केलं जात आहे. विदेशातून भारतात आलेल्या नागरिकांना जवळपास 2 आठवडे क्वारंटाईन केलं जात आहे.

चीनहून भारता आलेल्या रुग्णाची कहाणी

काही लोकांना क्वारंटाईन केलं जात आहे. पण, क्वारंटाईनमधील आयुष्य सोपं नसतं. क्वारंटाईनच्या अवस्थेत आजाराबद्दलची भीती बळावण्याची शक्यता असते.

पण, खरंच क्वारंटाईनची प्रक्रिया किंवा एकटं राहणं अवघड आहे, हे समजून घेण्यासाठी बीबीसीनं नुकतंच चीनमधून भारतात आलेले प्राध्यापक आशिष यादव यांच्याशी संपर्क केला. चीनच्या वुहानलाच कोरोना संक्रमणाचं केंद्र म्हटलं जात आहे.

कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, EPA

आशिष हे वुहान टेक्सटाईल युनिव्हर्सिटीमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करतात. त्यांची पत्नी वुहानमध्ये कॉम्प्युटर सायन्स या विषयात पीएचडी करत आहेत.

वुहानहून भारतात परतल्यानंतर या जोडप्याला दिल्लीतल्या छावला भागातील इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्सच्या सेल्फ आयसोलोशन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं.

त्यांना तिथं 27 फेब्रुवारी ते 13 मार्चपर्यंत क्वारंटाईन करण्यात आलं. इथल्या 112 रुग्णांची चाचणी निगेटिव्ह आली, तेव्हा शनिवारी त्यांना तिथून सोडण्यात आलं.

क्वारंटाईनमधील आयुष्य

27 फेब्रुवारीला ITBPच्या या सेंटरमध्ये 112 जणांना आणलं होतं. ज्यात भारताचे 76, बांगलादेशचे 23, चीन 6, म्यानमार आणि मालदीव 2, दक्षिण आफ्रिका, मादागास्कर आणि अमेरिकेच्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश होता.

PIBच्या माहितीनुसार, तिथं 8 कुटुंबं आणि 5 मुलंही होते.

ट्वीट

फोटो स्रोत, TWITTER

पाच मजल्याच्या या कॅम्पमध्ये आशिष आणि त्यांच्या पत्नीला राहण्यासाठी एक खोली देण्यात आली. क्वारंटाईन सेंटरमध्ये लोकांची दिनचर्या सकाळी 6 किंवा साडेसहा वाजता सुरू व्हायची.

सकाळच्या चहानंतर आठ वाजता सगळ्यांना नाश्ता दिला जात असे आणि काही वेळानंतर डॉक्टरची टीम येऊन सगळ्यांचं मेडिकल चेकअप करत असे. काही अडचण जाणवल्यास संबंधितांना लगेच दवाखान्यात पाठवलं जात असत.

आशिष सांगतात, "रात्री 8च्या सुमारास आम्ही सगळे जेवणासाठी एकत्र येत. असं असलं तरी तिथं आम्हाला एकमेकांपासून विशिष्ट अंतरावर बसवलं जायचं."

निर्बंध

क्वारंटाईनमधील व्यक्तींवर काही निर्बंध लादण्यात आले होते.

आशिष सांगतात, "आम्ही तिथं इतर कुणाशी भेटू शकत नव्हतो. एखाद्या गोष्टीला हात लावला, तर लगेच आम्हाला सॅनिटायरझनं तो स्वच्छ करावा लागायचा. ठराविक कालावधीनंतर आम्ही हात धुवायचो आणि मास्क काढायचा तर प्रश्नच नव्हता. इतकंच काय तर झोपतानाही आम्ही मास्क वापरायचो."

कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, ASHISH YADAV

आशिष आणि नेहा एकाच खोलीत राहत असले, तरी संसर्गाचा धोका टाळता यावा म्हणून त्यांचे बेड मात्र दूरवर होते.

मानसिक ताण आणि भीती

वुहानहून परतल्यानंतर मी आणि माझी पत्नी भीतीच्या छायेत होते, असं आशिष सांगतात.

ते म्हणतात, "सुरुवातीला आमच्या काही चाचण्या करण्यात आल्या. त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर आमची भीती थोडी कमी झाली. सेंटरमध्ये काही लोकांना बाथरूम आणि टॉयलेट शेयरिंगमध्ये दिले होते. कॅम्पमधील सगळे जण एकमेकांकडे पाहून हाच विचार करायचे की, पुढच्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह यायला नको."

कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, ASHISH YADAV

आशिष यांना सगळ्यात जास्त भीती जेव्हा ते जेवण करण्यासाठी डायनिंग हॉलमध्ये जात तेव्हा वाटत होती.

ते म्हणतात, "आम्हाला खोलीत काहीच खाण्याची परवानगी नव्हती, त्यामुळे सगळे जण हॉलमध्ये एकत्र येत. तिथं आम्ही एकमेकांपासून ठराविक अंतरावर बसत असलो, तरी एखाद्याला शिंक जरी आली, तरी सगळे घाबरायचे."

झोप न येणं आणि चिडचिड वाढणं

सुरुवातीच्या काळात भीतीमुळे झोप लागायची नाही, असं नेहा सांगतात.

त्या म्हणतात, "बऱ्याच रात्री मी आणि आशिष फक्त चर्चा करत असू. कुणाशीही फोनवर बोलायची इच्छा होत नव्हती. या कॅम्पमध्ये एक 23 वर्षांचा तरुण होता, ज्याचा रक्तदाब मोठ्या प्रमाणावर वाढत असे. या तरुणाला ताब्यात आणण्यासाठी डॉक्टरांना खूप मेहनत घ्यावी लागायची. कॅम्पमध्ये मानसोपचारतज्ज्ञ होते, जे गरजेनुसार संशयितांची मदत करत असत."

क्वारंटाईनची व्यवस्था

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, क्वारंटाईनची व्यवस्था

वेळ कसा घालवायचा?

आशिष सांगतात की, "आम्ही सगळेच भीतीच्या छायेत होतो. त्यामुळे ताण आणि चिडचिड वाढायची. पण, चांगली गोष्ट ही होती की, तिथं आमच्यासाठी मानसोपचारतज्ज्ञ उपलब्ध होते. त्यांना बोलवण्यासाठी आम्हाला फक्त एक फोन करावा लागत असे, त्यानंतर लगेच ते यायचे आणि आमच्याशी गप्पा मारायचे."

आम्ही एकत्र नसतो तर आमच्यासाठी वेळ घालवणं अवघड झालं असतं, असं आशिष आणि नेहा या दोघांनाही वाटतं.

क्वारंटाईनमध्ये 14 दिवस घालवल्यानंतर आता ते दोघं उत्तर प्रदेशातल्या एका गावात पोहोचले आहेत. काळजीच्या दृष्टीनं त्यांना 10 ते 12 दिवस वेगळं ठेवण्यात आलं आहे.

आशिष यादव आणि नेहा

फोटो स्रोत, ASHISH YADAV

"सध्या आम्ही दोन स्वतंत्र खोल्यांमध्ये राहत आहोत आणि स्वतंत्र वॉशरूम आणि टॉयलेट वापरत आहोत. आम्ही ना बाजारात जात आहोत ना दुसरीकडे कुठे. कुटुंबीयांजवळही आम्ही क्वचितच जात आहोत," आशिष सांगतात.

कोणतीही अडचण जाणवल्यास जिल्ह्यातील आरोग्य अधिकाऱ्यांना संपर्क करायचं त्यांना सांगण्यात आलं आहे.

क्वारंटाईनला घाबरायचं?

दोघांना आता पहिल्यापेक्षा बरं वाटत आहे आणि लोकांनी क्वारंटाईन किंवा आयसोलेशनच्या नावाखाली भीती बाळगायची गरज नाही, असं ते सांगतात.

आशिष म्हणतात, "तुम्ही यासाठी स्वत:ला मानसिकरित्या तयार केलं, तर क्वारंटाईनबदद्ल भीती बाळगण्याची अजिबात गरज नाही, असं आम्ही आमच्या अनुभवावरून सांगतो. सुरुवातीला एकटेपणा आणि ताण जाणवू शकतो, पण काही कालावधीनंतर सगळं ठीक होतं."

कोरोना व्हायरस

आता वुहानला परत जाणार नसल्याचं ते सांगतात.

ते म्हणतात, "मी सध्या वुहान युनिव्हर्सिटीत राजीनामा सादर केलेला नाही. पुढचे काही महिने मी भारतात नोकरी शोधेन आणि मग वुहानमध्ये राजीनामा सुपूर्द करेन."

नेहासुद्धा आता भारतात राहून त्यांची पीएचडी पूर्ण करणार आहेत.

हेही नक्की वाचा -

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)