कोरोना व्हायरस : जगाच्या तुलनेत भारतातील रुग्णांची संख्या कमी का?

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

कोरोना व्हायरसची लागण झालेले जगभरात सव्वा लाखहून अधिक रुग्ण आहेत आणि 5500 हून अधिक रुग्णांचा यात मृत्यू झालाय. भारतातही कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या दररोज वाढत चालली आहे.

वृत्तसंस्था पीटीआयनुसार, भारतात सध्या कोरोनाग्रस्त असेलेली 107 प्रकरणं समोर आली आहेत. दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. पण जगातील 120 देशांमध्ये ज्या तीव्रतेने कोरोना व्हायरस पसरला आहे, त्या तुलनेत भारतातील रुग्णांची संख्या कमी आहे. याला नेमकं काय कारण आहे?

तज्ञ्जांच्या मते, कोरोना व्हायरस चाचणीला भारतात अधिक गांभीर्याने घेण्याची गरज आहे. 125 कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या देशात अशा पद्धतीने कोरोना व्हायरसचे स्क्रिनिंग आणि नमुने तपासले जाणं हे पुरेसं नाही. कधी परदेशात न गेलेल्या तसंच कधी कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात न आलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यास ही परिस्थिती धोकादायक ठरू शकते.

उदाहरणार्थ, दक्षिण कोरियाची एकूण लोकसंख्या 5.1 कोटी इतकी आहे. तिथे 20 जानेवारीपासून आत्तापर्यंत 2.5 लाखांहून अधिक लोकांची कोरोना चाचणी करण्यात आलीय. त्यासाठी विशेष चाचणी परीक्षण केंद्र तयार करण्यात आलेत, जेणेकरुन या जागतिक पातळीवरील साथीच्या रोगाचा सामना करता येईल.

भारतात कोरोना चाचणी केंद्र कमी?

भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेनं पाहिलं तर कोरोना व्हायरसची चाचणी केंद्र कमी आहेत. कोरोना व्हायरसची चाचणी करण्यासाठी भारतात प्रत्येक राज्यात मोजक्या रुग्णालयांमध्येच तपासणी केंद्र तयार करण्यात आले आहेत.

हफपोस्ट इंडियासोबत चर्चा करत असताना 'नॅशनल हेल्थ सिस्टम रिसोर्स सेंटर'चे माजी संचालक आणि सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ टी. सुंदररमन यांनी सांगितलं की, भारतात कोरोना व्हायरसचे रुग्ण आता वाढत आहेत. एकदा व्हायरसने पसरायला सुरुवात केली, तर रुग्णांच्या आणि अडचणींच्या संख्येत वाढ होईल.

त्यांनी सांगितलं, "जगातील सर्व देश जिथं-जिथं कोरोनाची प्रकरणं समोर आली आहेत, त्यांच्या तुलनेत भारतात कमी नागरिकांची चाचणी करण्यात आली आहे. आत्तापर्यंत आम्ही केवळ 7 हजार लोकांच्या चाचण्या केल्या आहेत. जर दक्षिण कोरियाचं उदाहरण पाहिलं, तर त्यांची लोकसंख्या तामिळानाडूपेक्षाही कमी आहे. पण त्यांच्याकडे आत्तापर्यंत अडीच लाखाहून अधिक लोकांची चाचणी करण्यात आली आहे."

"सरकार केवळ परदेशाहून आलेल्या आणि अशा लोकांच्या संपर्कात आलेल्या लोकांचीच चाचणी करत आहे. सरकारने हाच मापदंड ठरवला आहे. अशात जर सामान्य नागरिक साधा ताप असला आणि चाचणीसाठी आल्यास त्याची तपासणी केली जाणार नाही. त्यामुळे नेमक्या कुणाला या व्हायरसची लागण झालीय आणि तो किती पसरलाय हे आपण ठरवू शकणार नाही," सुंदररमन सांगतात.

कोरोना व्हायरसच्या तपासणीसाठी देशभरात एकूण 52 प्रयोगशाळा तयार करण्यात आल्या आहेत. लोकसंख्या पाहता या फारच कमी आहे. सुंदररमन यांच्या मते, देशात 600 हून अधिक चाचणी केंद्र हवेत,

पावसाळ्यात अडचणी वाढणार?

देशभरात हजारो लोकांना या क्षणी व्हायरल ताप आणि खोकला असेल. देशात केवळ 52 केंद्र आहेत, ज्यातही काही केंद्र बंद असू शकतात. जगभरात पाहिलं तर राजकीय नेते, कलाकार असे अनेक कोरोना पीडित असल्याचं समोर आलं आहे. कारण ते आपली चाचणी करून घेत आहेत. शिवाय, त्याठिकाणाचं सरकार स्वत:हून चाचणी करुन घेत आहे, जेणेकरुन वेळीच याला थांबवलं जाऊ शकेल.

ज्या व्यक्तीला कोरोना व्हायरसची लक्षणं नाहीत, त्याची तपासणी गरजेची नाही. पण ज्या कुणालाही सतत ताप, खोकला, श्वास घेण्यास ञास होत असेल तर अशा सगळ्यांची तपासणी होणं गरजेचं आहे.

टी.सुंदररमन यांच्यानुसार, सरकारनं मोठ्या पातळीवर कोरोना व्हायरसची चाचणी करण्याची मोहीम सुरू करायला हवी, जेणेकरुन भविष्यात येणाऱ्या मोठ्या संकटावर आपण वेळीच मात देऊ. सोबतच विलगीकरण कक्षांची संख्या वाढवायला हवी. जर का हा व्हायरस ग्रामीण भागात पोहचला तर उपचार करणं आणि व्हायरस पसरण्यापासून थांबवणं अधिक आव्हानात्मक होईल.

कोणत्या सुविधांची गरज?

कोरोना व्हायरसची चाचणी फार वेगळी नाही. इतर रॅपिड डायग्नोस्टिप्रमाणेच यासाठी नमुने घेऊन त्याची चाचणी केली जाते. जिल्हास्तरीय रुग्णालयतही ही चाचणी केली जाऊ शकते, पण त्यासाठी आवश्यक खबरदारी न घेतल्यास व्हायरस आणखी पसरू शकतो. त्यामुळे नमुने घेताना त्यापासून सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक रुग्णालयात याची सोय होणं कठीण आहे.

सुंदररमन यांच्या मते, दक्षिण भारतातील काही राज्य वगळता इतर सर्व राज्यातील जिल्हा रुग्णालयातील परिस्थिती चांगली नाही. भारतातील काही राज्यातील लोकसंख्या तर काही देशांच्या लोकसंख्येच्या तुलनेनेही अधिक आहे. अशात कोरोना व्हायरसची चाचणी होणं गरजेचं असून त्यासाठी विलगीकरण कक्ष, आयसीयू, वेंटीलेटर अशा सगळ्या सुविधा असणं आवश्यक आहे.

पावसाळा सुरू होताच परिस्थिती आणखी खराब होण्याची शक्यता आहे. दरवर्षी जुलै,ऑगस्ट या काळात देशात व्हायरल आजार बळावतात. ज्यामुळे रुग्णांचा मृत्यूही होता. अशात कोरोना व्हायरस आणखी पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामीण भागात कोरोना व्हायरस पसरला तर रुग्णाला त्याची योग्य माहितीही देता येणार नाही. कुणाच्या संपर्कात आल्याची माहितीही देता येणार नाही.

सुंदररमन सांगतात, "जिल्हा रुग्णालयांमध्ये आयसीयू, ब्लड ट्रांसफ्यूजन आणि ऑक्सिजन सप्लायसारख्या सुविधा वाढवायला हव्यात. तेव्हाच या व्हायरसचा सामना मोठ्या प्रमाणावर करणं शक्य होईल. उत्तर प्रदेश, झारखंडसारख्या राज्यांमध्ये जिल्हा रुग्णालयांची स्थिती कशी आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. अशात या भागातून कोरोना व्हायरसची प्रकरणं समोर यायला लागली, तर संपूर्ण आरोग्य विभागाच्या अडचणी वाढतील."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)