You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस: '..आयपीएलचं स्वागत रेड कार्पेट घालून करू' - राजेश टोपे
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 19 वर पोहोचलीय. मुंबई, पुणे, नागपूर आणि अहमदनगरमध्ये कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळले आहेत.
याच पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी प्राजक्ता पोळ यांनी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी बातचीत केली.
कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं काय पावलं उचलली आहेत, राज्यात सद्यस्थिती काय आहे, अशा विविध प्रश्नांची उत्तरं राजेश टोपे यांनी दिली.
"कोरोना व्हायरसच्या उंबरठ्यावर आहे, आत आला नाहीय. उंबरठ्यावरुनही कोरोना व्हायरसला परतवता येईल. त्यासाठी लोकांची खंबीर साथ हवीय. लोकांचं खूप चांगल्या पद्धतीनं सहकार्य सरकारला हवंय. एकत्रित प्रयत्नांची गरज आहे," असं राजेश टोपे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले.
राजेश टोपे यांच्यासोबतची बातचीत प्रश्न-उत्तरांच्या रुपात खालीलप्रमाणे :
प्र- महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची सद्यस्थिती काय आहे?
उत्तर: महाराष्ट्रात या क्षणापर्यंत (14 मार्च 2020) कोरोना व्हायरसचे 19 रुग्ण आढळले आहेत. हा आकडा महाराष्ट्रासाठी मोठाच आहे. 19 रुग्णांपैकी 11 ते 12 जण वीणा टूर्सचे आहेत. मग या रुग्णांमुळं पुढे संसर्ग झालेले एक-दोन आहेत. तसंच, अमेरिका, फ्रान्सहून थेट आलेले काही लोक या रुग्णांमध्ये आहेत.
मुंबई, पुणे, नागपूर आणि अहमदनगरमध्ये कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळले. अहमदनगरमध्ये काल (13 मार्च) एक आढळलाय.
यातील एकजण वयोवृद्ध असल्यानं त्यांना ICU ची गरज पडलीय. बाकीच्यांची परिस्थिती ठीक आहे.
प्र - कोरोना व्हायरस रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं काय खबरदारी घेतलीय?
उत्तर: सर्वसामान्य लोकांना या कोरोना व्हायरसबद्दल माहिती असावी म्हणून एवढंच सांगेन की, कुठल्याही व्हायरसवर आपल्या शरीरातील रोगप्रतिकार शक्तीनं मात करता येते. म्हणून आपल्या रोगप्रतिकार शक्ती वाढवणं हे सर्वात महत्त्वाचं आहे.
गर्दीच्या ठिकाणी या व्हायरसचा संसर्ग वाढू शकतो, म्हणून राज्य सरकारनं महत्त्वाचे निर्णय घेतलेत. राजकीय सभा, शासकीय कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम या सगळ्या गोष्टींना बंदी आणलीय. जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलंय की, अशा कार्यक्रमांना परवानगी देऊ नका आणि दिली असेल तर रद्द करा. खेळांचे कार्यक्रमही रद्द करण्याचे आदेश दिलेत.
ज्या ठिकाणी कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळले आहेत, अशा ठिकाणच्या शाळा, कॉलेजना बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. फक्त दहावी आणि बारावीच्या परीक्षा वगळता इतरांना सुट्ट्या दिल्यात.
टूर आणि ट्रॅव्हलसच्या लोकांना सांगितलंय की, कुठल्याही जिल्ह्यातील लोकांना बाहेर पाठवू नका आणि बाहेरुन येणाऱ्यांवर लक्ष ठेवा. त्यांच्या याद्या प्रशासनाला कळवा. म्हणजे बारकाईनं लक्ष ठेवता येईल.
संशयित रुग्णांना किंवा लागण झालेल्या रुग्णांना वेगळं ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये तशी व्यवस्था करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्यात.
ज्या देशांमध्ये कोरोना व्हायरसचा मोठ्या प्रमाणात प्रसार झालाय, त्या देशातून परतणाऱ्या प्रवाशांची कसून तपासणी केली जातेय. त्यांना विमानतळावरच वेगळं ठेवण्याच्या सूचना केंद्र सरकारकडून देण्यात आल्या आहेत. या सूचनांचं पालन राज्य सरकार तंतोतंतपणे करतंय.
महाराष्ट्र सरकारनं एपिडेमिक डिसीज अॅक्ट सरकारनं लागू केलंय. मोठा संसर्ग होऊ नये म्हणून या कायद्यावर आम्ही काल सही केलीय. या कायद्यान्वये राज्य सरकारला काही अतिरिक्त अधिकार मिळतात. संशयित रुग्णांना हॉस्पिटलमध्ये आणता येतं.
खासगी आणि सार्वजनिक रुग्णालयांमध्ये आयसोलेशनची सुविधा तयार करण्यात आलीय.
कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी सर्व गोष्टी पुरवण्यासाठी सरकार तयार आहे. निधी अडचण नाहीय, साधनांची अडचण नाहीय. सगळ्या आवश्यक गोष्टी तातडीनं केल्या जातायत.
प्र. लोकांनी काय काळजी घ्यायला हवी?
उत्तर: जरी कोरोना व्हायरस नवीन असला, तरी याचं स्वरुप 80 टक्के सर्वसाधारण असतं. व्यवस्थित उपचार झाले नाहीत, तरच मृत्यू होतो. मृत्यूचं प्रमाण दोन ते अडीच टक्के एवढेच मर्यादित आहे.
मात्र, संसर्ग झपाट्यानं होणं, हाच या व्हायरसचा गुणधर्म आहे. त्यामुळं संसर्ग होऊ नये याची खबरदारी घेणं आवश्यक आहे.
गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं. त्यासाठी काही कठोर निर्णय घेतले गेलेत.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर अशा बाधित जिल्ह्यात सिनेमागृह, नाट्यगृह, स्वीमिंग टँक आणि जिम या चार ठिकाणांना सध्या बंद करण्यात आलंय.
मॉल आणि रेस्टॉरंट बंद करण्यात आले नसले, तरी तिथं गर्दी करणं टाळावं, अशाही सूचना देण्यात आल्यात.
प्र. मुंबईतील शाळा बंद करणार का?
उत्तर:मुंबईच्या शाळा बंद करण्याची पालकांची मागणी असल्याचं समोर येतंय. सरकार त्या मागणीबाबत गंभीरपणे विचारही करत आहे. साधारण एप्रिलच्या मध्यावर सुट्टी लागते. त्यामुळं थोडं आधी परीक्षा घेऊन सुट्टी देता येईल का, याबद्दल शालेय शिक्षण, उच्च शिक्षण विभागाशी चर्चा सुरू आहे. शिवाय, या निर्णयामुळं शिक्षणावर काही परिणाम होणार नसेल, तर हा निर्णय घेतला जाईल.
बऱ्याचदा आवश्यकता नसल्यास असा निर्णय घेतला, तर लोकांमध्ये भीतीची स्थिती निर्माण होण्याची शक्यता असे. म्हणून दोन्ही बाजूंचा विचार करुनच निर्णय घ्यावा लागतो.
प्र. अफवा रोखण्यासाठी काही केलं जातंय का?
उत्तर: लोकांना नीट माहिती दिली, तर अफवांवर मात करता येते, असा स्वत:चा विश्वास आहे. त्यामुळं लोकांना नीट माहिती देण्याचा प्रयत्न सुरू आहे. लोकांना नीट माहिती मिळाली, शिक्षण मिळालं, तर भीतीचं कारण राहणार नाही.
राज्य सरकारच्या अधिकृत व्यक्तीच्या सांगण्यावरच विश्वास ठेवावा, जेणेकरुन अफवांना बळी पडून काही अनर्थ होणार नाही.
प्र. आयपीएल पूर्णपणे का रद्द करण्यात आली नाही?
उत्तर:आयपीएल म्हणजे 80 ते 90 हजार लोकांची गर्दी त्या ठिकाणी होईल. त्यामुळं गर्दी होऊ नये म्हणून राज्य सरकारनं स्पष्ट भूमिका घेतली की, परवानगी दिली जाणार नाही.
आयपीएलच्या स्पर्धा बीसीसीआयनं 15 दिवस ढकललीय. 15 दिवसात स्थिती निवळली तर रेड कार्पेटनं आयपीएलचं स्वागत करू. कुठल्याही क्रीडाप्रेमींचा भ्रमनिरास करण्याचा हेतू नाहीय. जनतेच्या हिताचे काही निर्णय घ्यावे लागतात. त्यासाठी हा निर्णय घेतला गेलाय.
हेही नक्की वाचा -
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)