कोरोना व्हायरस: सेन्सेक्स, निफ्टीची पडझड सुरूच

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

कोरोना व्हायरसच्या जागतिक फैलावामुळे जगभरातले बाजार काळजीत आहेत आणि याचा परिणाम मुंबई शेअरबाजारावर आजही पाहायला मिळाला.

शक्रवारच्या ऐतिहासिक पडझडी आणि चमत्कारिक उभारीनंतर सोमवारी बाजार उघडल्या उघडल्या निर्देशांक कोसळले. पहिल्या तासातच बाँबे स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक सेन्सेक्स 1,851 अंकांनी कोसळला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टीही 524 अंकांनी घसरला.

शुक्रवारीसुद्धा (13 मार्च) सकाळी ट्रेडिंगला सुरुवात झाल्यानंतर निफ्टीमध्ये 10.07 टक्क्यांची घसरण झाल्याने निफ्टीमध्ये लोअर सर्किट लागलं होतं. सर्किट लागल्यानंतर ट्रेडिंग 45 मिनिटं थांबवण्यात आलं.

2008 नंतर पहिल्यांदाच शेअर बाजारात लोअर सर्किट लागलं होतं. ट्रेडिंगच्या सुरुवातीलाच सेन्सेक्समध्ये 3000 पेक्षा जास्त अंकांची घसरण झाली. मात्र त्यानंतर सेन्सेक्स 1500 अंकांनी वधारला.

सेन्सेक्स, निफ्टी आणि बँक निफ्टी हे गेल्या 3 वर्षांतली नीचांकी पातळीवर आले. तर निफ्टी मिडकॅप इंडेक्स 4 वर्षांतल्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता.

त्यापूर्वी गुरुवारी (12 मार्च) सकाळी सगळ्याच आशियाई बाजारपेठांमध्येही घसरण झाली. जपान, हाँगकाँग, चीनमधल्या शेअरबाजाराच्या निर्देशांकातही घसरण पहायला मिळाली.

त्यापूर्वी बुधवारी (11 मार्च) अमेरिकेच्या वॉल स्ट्रीटवर डाऊ जोन्सच्या S&P500मध्ये 1987पासूनची सर्वात मोठी घसरण झाली होती. त्याचेच पडसाद आशियाई बाजारांवर आजही उमटत आहेत.

जागतिक संकट, जागतिक फटका

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने कोरोना व्हायरसला - पँडेमिक म्हणजे जगभर मोठ्या प्रमाणात पसरलेला साथीचा आजार घोषित केल्यानंतर जगभरातल्या शेअरबाजारांवर याचा परिणाम झालेला आहे.

शिवाय अमेरिकेने घातलेल्या प्रवास निर्बंधांचेही हे परिणाम आहेत.

तेल उत्पादक देशांमध्ये समझोता न झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती घसरलेल्या आहेत आणि त्याचा परिणाम जगभरातल्या तेल कंपन्यांच्या शेअर्सवर झालाय.

कोरोना व्हायरसने जगभर घातलेल्या थैमानामुळे गुरुवारी (12 मार्च) पुन्हा एकदा शेअर बाजारावर परिणाम दिसून आला. काल सकाळी कामकाज सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीमध्ये घसरण झाली. गेल्या आठवड्यापासून जगभरातील शेअर बाजारांमध्ये पडझड दिसून आली

गुरुवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रंप यांनी युरोपातून अमेरिकत येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध जाहीर केले.

याचे परिणाम अमेरिकेच्या वॉल स्ट्रीटवर उमटले. डाऊ जोन्समध्ये 1500 अंकांची (5.8%) घसरण झाली.

अमेरिकेतल्या घसरणीचे परिणाम गुरुवारी सकाळी आशियाई बाजारातल्या ट्रेडिंगवर झाला.

जपानचा निक्केई 225 इंडेक्स सकाळच्या ट्रेडिंगमध्ये 4.5%, हाँगकाँगचा हेंगसेंग इंडेक्स 3.8%, चीनचा शांघाय कॉम्पॉझिट इंडेक्स 2% पडला. भारतीय शेअरबाजारात रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर गेल्या महिन्याभरात 20% घसरलेला आहे. गेल्या 10 वर्षांतली रिलायन्सच्या शेअर्समधली सगळ्यांत मोठी घसरण आहे.

जगभरातल्या कच्च्या तेलाच्या किंमतीत सुमारे 30 टक्क्यांची घसरण झाल्याने त्याचा परिणाम तेल उत्पादक कंपन्यांच्या शेअर्सवर झाला होता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)