You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस: उद्धव ठाकरे यांनी राज्यातील मॉल बंद करण्याचे दिले निर्देश
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शाळा कॉलेजसोबत मॉल्स देखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उप-मुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.
उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत मांडलेले मुद्दे -
1. राज्यातील शाळा, कॉलेज 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. तर मॉल्स पुढचे 15 दिवस बंद असतील.
2.मास्क लावून फिरण्याची आवश्यकता नाही. शिंकताना किंवा खोकताना नाकावर रुमाल धरावा, कारण कोरोनाचा विषाणू त्या शिंतोड्यातून जात असतो.
( उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतला निवडक भाग या ठिकाणी पाहू शकता)
3. हात सातत्यानं स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं.
4. कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी प्रत्येकाची भूमिका महत्त्वाची आहे. सरकारच्या अधिकृत पत्रकांना प्रसिद्धी द्यावी.
5. राज्यातले मॉल बंद राहतील, फक्क किराणा दुकान चालू राहतील.
6. महाविकास आघाडीचा अर्थसंकल्प समाजातल्या सगळ्या घटकांना सामावून घेणारा आहे. या अर्थसंकल्पात सगळ्यांचा विचार करण्यात आला आहे.
या पत्रकार परिषदेपूर्वी महाराष्ट्र सरकारनं शाळा-कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
'सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी'
राज्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. याशिवाय सर्व शैक्षणिक, धार्मिक, क्रीडा आणि राजकीय कार्यक्रमांची परवानगी रद्द करण्यात आली आहे. दहावी, बारावी आणि विद्यापीठातील परीक्षा मात्र ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार आहेत.
राज्यात आतापर्यंत कोरोनाच्या 26 पॉझिटिव्ह केसेसची नोंद झाल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
भारत सरकारकडून कोरोना विषाणू 'अधिसूचित आपत्ती' जाहीर
भारत सरकारनं कोरोना व्हायरसला अधिसूचित आपत्ती जाहीर केलं आहे. कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांना राज्य आपत्ती निवारण निधीतून विशेष मदत करण्यात येणार आहे.
यामध्ये, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारनं 4 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे आणि कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची राज्य सरकारनं निधार्रित केलेल्या पैशांमध्ये उपचार करण्यात येणार आहे.
IIT मुंबईचे क्लास बंद
IIT बॉम्बे मधील सगळे क्लास आणि सेंट्रल लायब्ररी 29 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. तसंच संबंधित प्राध्यापकांना विश्वासात घेऊन घरी जाण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना करण्यात आल्या आहेत.
IIT बॉम्बेचे संचालक सुभाशिष चौधरी यांनी यासंबंधीचं परिपत्रक काढलं आहे.
मनसेचा गुढीपाडवा मेळावा रद्द
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं यंदाचा 'गुढीपाडवा मेळावा' रद्द केला आहे. त्यासंबंधीचं ट्वीट पक्षाच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून करण्यात आलं आहे.
त्यात लिहिलंय, "कोरोनाचं सावट गडद आहे, त्यामुळे ह्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 'गुढीपाडवा मेळावा' रद्द करत आहोत."
"येत्या काही आठवड्यात महापालिकांच्या निवडणूका होणार आहेत. पण एकूण परिस्थिती पाहता सरकारने ह्या निवडणुका किमान सहा महिन्यांसाठी पुढे ढकलाव्यात," अशीही मागणी मनसेनं केलीय.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सभा रद्द
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अखिल भारतीय प्रतिनिधी सभा पुढे ढकलली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून संघाने हा निर्णय घेतला आहे. बंगळुरुमध्ये ही वार्षिक बैठक पार पडणार होती. मात्र ती आता पुढे ढकलण्यात आली आहे.
सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी म्हटलं की, "COVID 19 अर्थात करोना व्हायरसचं गांभीर्य लक्षात घेऊन तसेच केंद्र आणि राज्य सरकारने ज्या सूचना दिल्या आहेत त्या पाळत आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक बैठक स्थगित करत आहोत."
कोरोनाच्या संशयितांचा हॉस्पिटलमधून पळ
कोरोना व्हायरसच्या संशयित रुग्णांनी हॉस्पिटलमधून पळ काढल्याची घटना नागपुरात घडली. नागपूरच्या मेयो रुग्णालयातून शनिवारी कोरोनाच्या चार संशयित रुग्णांनी पळ काढला.
पोलिसांनी तातडीनं शोध सुरु केला. चारही जण आपापल्या घरी आढळून आले. पोलिसांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये परतण्याची विनंती केलीय.
मेयो रुग्णालयात करोनाची लागण झालेला रुग्ण असल्याची अफवा पसरली आणि रुग्णांमध्ये खळबळ उडाली. त्यानंतर संधी साधून एका मागून एक असे चार रुग्ण वॉर्डातून पसार झाले. यानंतर पोलिसांनी तातडीने या रुग्णांचा शोध सुरु केला.
हे सर्वजण स्वच्छतागृहाला जाण्याच्या बहाण्याने एकापाठोपाठ एक रुग्णालयातून बाहेर पडले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
कालच संध्याकाळी या संशयित रुग्णांना विलगीकरण कक्षात (आयसोलेशन वॉर्ड) ठेवण्यात आले होते. या सर्वांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यापैकी एकाची कोरोना टेस्ट नेगेटिव्ह आली होती. तर उर्वरित चौघांचे रिपोर्ट आज उपलब्ध होणार आहेत.
या चारपैकी तीन रुग्ण नागपुरातील आहेत तर एक रुग्ण चंद्रपूरचा आहे. या पाच संशयितांमध्ये घरकाम करणाऱ्या एका महिलेचा समावेश आहे. कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीच्या घरी ही महिला काम करत होती. तर संबंधित व्यक्तीच्या पत्नी आणि सहकाऱ्याची कोरोना टेस्टही पॉझिटिव्ह आल्याचे समजते. मात्र, या तिघांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
या घटनेनंतर नागपूरच्या शासकीय हॉस्पिटलमधील ज्या वॉर्डात कोरोनाग्रस्त रुग्ण आणि संशयित रुग्ण ठेवण्यात आलेत, त्या वॉर्डबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.
महाराष्ट्रात आणखी दोन रुग्ण आढळले, एकूण संख्या 19 वर
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची लागण झालेले आणखी दोन रुग्ण आढळले आहेत. यातील एकजण अहमदनगरमधील आहे, तर दुसरा रुग्ण मुंबईत आढळलाय. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भातील माहिती दिली.
आणखी दोन रुग्ण आढळल्यानं महाराष्ट्रातल्या रुग्णांची संख्या 19 वर पोहोचली आहे.
याआधी पुणे, मुंबई आणि नागपूर या तीन शहरात कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळले होते. त्यांना वेगळं ठेवण्यात आलं असून, उपचारही सुरू आहेत.
मुंबई, पुणे, ठाण्यात जिम, स्वीमिंग पूल बंद
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील शाळा बंद ठेवण्यात येतील. काही खासगी शाळांनीही तसा निर्णय घेतला आहे. अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल विधानसभेत दिली.
विनाकारण भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी मुंबईमधल्या शाळांबद्दल निर्णय अजून घेतलेला नाही, असं ते म्हणाले.
रेल्वे आणि बस या अत्यावश्यक सेवा असल्यानं बंद ठेवल्या जाणार नाहीत, तसेच पुणे, मुंबई, नवी मुंबई, ठाणे इथलं जिम, स्वीमिंग पूल, व्यायामशाळा तात्पुरत्या बंद ठेवण्यात येत आहेत, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
दरम्यान, कोरोना व्हायरसचा परिणाम सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवरही होऊ शकतो. 16 मार्चपासून सर्वोच्च न्यायालयात केवळ तातडीच्या प्रकरणांवरच सुनावणी होईल. त्यासाठी आवश्यक तेवढीच खंडपीठं काम करतील. एखाद्या खटल्यात बाजू मांडणारे वकील तसंच त्यांच्यासोबत अशील एवढ्याच लोकांना न्यायालयाच्या आवारात प्रवेश देण्यात येईल.
दिल्लीत कोरोना व्हायरसचा दुसरा बळी
कोरोना व्हायरसचा दुसरा बळी राजधानी दिल्लीत नोंदला गेला. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिल्ली सरकार आणि आरोग्य मंत्रालयाच्या दाखल्याने दिलेल्या बातमीनुसार पश्चिम दिल्लीत 68 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
दिल्लीतील आरएमएमल हॉस्पिटल अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. कोव्हिड19 विषाणूचा संसर्ग तसंच अन्य आजारांमुळे या महिलेचा मृत्यू झाला. या महिलेला डायबेटिस तसंच हायपरटेन्शन हे आजार होते.
या महिलेचा मुलगा 5 ते 22 फेब्रुवारी या कालावधीत परदेशात होता. 23 फेब्रुवारी तो स्वित्झर्लंड आणि इटलीहून भारतात परतला. परतल्यानंतर एक दिवस मुलाची तब्येत व्यवस्थित होती. दुसऱ्या दिवशी त्यांना ताप आणि खोकल्याची लक्षणं दिसू लागली. 7 मार्चला त्याला राम मनोहर लोहिया हॉस्पिटलात भरती करण्यात आलं.
नियमांनुसार, त्यांच्या घरातील सगळ्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. 8 मार्चला त्यांच्या आईची कोरोना चाचणी झाली. टेस्टचे रिझल्ट पॉझिटिव्ह आले.
9 मार्चला या महिलेत न्यूमोनियाची लक्षणं दिसू लागली. त्यांना श्वास घेतानाही त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्यांना आरएमएल हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं.
13 मार्चला त्यांचा मृत्यू झाला. या महिलेच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींची कोरोना चाचणी केली जाणार आहे. संबंधित व्यक्तींना स्वतंत्रपणे ठेवण्यात येईल.
भारत-बांगलादेश वाहतूक बंद
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भाव लक्षात घेऊन भारत आणि बांगलादेश यांच्यादरम्यान चालणारी रेल्वे आणि बससेवा एका महिन्यासाठी बंद करण्यात आली आहे.
15 मार्च ते 15 एप्रिल या कालावधीत या दोन देशांदरम्यानची रेल्वे आणि बससेवा पूर्णत: बंद राहील. मैत्री एक्स्प्रेस आणि बंधन एक्स्प्रेस या दोन ट्रेन चालवल्या जातात.
पंतप्रधान मोदींचे 'सार्क' देशांना आवाहन
भारतात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या 81 झाली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्क देशातील नेत्यांना कोरोनाविरोधात लढण्याचं आवाहन केलं आहे.
कोरोना विषाणूविरोधात लढा देण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन रणनीती आखायला हवी असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
आपण व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करून एक योजना आखून जगासमोर एक आदर्श ठेऊत असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका सामने रद्द
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेतील उर्वरित दोन सामनेही कोरोनामुळे रद्द करण्यात आले आहेत. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना 15 मार्चला लखनौ इथं होणार होता तर तिसरा सामना 18 मार्चला कोलकात्यामध्ये होणार होता.
या मालिकेतला पहिला सामना 12 मार्चला धरमशाला इथं खेळविण्यात येणार होता, पण हा सामना पावसामुळे रद्द झाला.
IPL चे सामने 15 एप्रिलपर्यंत लांबणीवर
आयपीएलचे सामने 15 एप्रिलनंतर होतील असं बीसीसीआयने सांगितलं आहे.
सर्व खेळाडू, चाहते आणि सर्वच जनतेच्या आरोग्याचा विचार करून IPL सामने 15 एप्रिलपर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला.
गुगलच्या कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्यास परवानगी
गुगलच्या बंगळुरू येथील ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांना एक दिवस घरातून काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
गुगलने म्हटलं आहे, "आमच्या बंगळुरू येथील कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला COVID-19 विषाणूचा संसर्ग झाला आहे. आजाराची लक्षणं दिसण्यापूर्वी ते काही तास कार्यालयात होते. तेव्हापासून कर्मचाऱ्याला वेगळं करण्यात आलं आहे. संसर्गबाधित कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या इतर कर्मचाऱ्यांनीही स्वतःला वेगळं करून प्रकृतीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना आम्ही केल्या आहेत."
"आमच्यासाठी प्रत्येकाची प्रकृती आणि सुरक्षा सर्वतोपरी महत्त्वाची असल्याने सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही खबरदारी घेतली आहे आणि यापुढे घेत राहू," असं गुगलने स्पष्ट केलं आहे.
कोरोनामुळे शेअर बाजारात घसरण आणि नंतर स्थिर
कोरोना व्हायरसच्या जागतिक फैलावामुळे जगभरातले बाजार काळजीत आहेत आणि याचा परिणाम आजही मुंबई शेअर बाजारावर झालाय.
ट्रेडिंगला सुरुवात झाल्यानंतर निफ्टीमध्ये 10.07 टक्क्यांची - घसरण झाल्याने निफ्टीला सर्किट लागलं. सर्किट लागल्यानंतर निफ्टीचं ट्रेडिंग 45 मिनिटं थांबवण्यात येतं. काही काळानंतर बाजाराची स्थिती सुधारली.
2008नंतर पहिल्यांदाच शेअरबाजारात लोअर सर्किट लागलेलं आहे झालंय. ट्रेडिंगच्या सुरुवातीलाच सेन्सेक्समध्ये 3000 पेक्षा जास्त अंकांची घसरण झाली.
सेन्सेक्स, निफ्टी आणि बँक निफ्टी हे गेल्या 3 वर्षांतली निचांकी पातळीवर आहेत. तर निफ्टी मिडकॅप इंडेक्स 4 वर्षांतल्या निचांकी पातळीवर आहे.
आज सकाळी सगळ्याच आशियाई बाजारपेठांमध्येही घसरण झालेली आहे. जपान, हाँगकाँग, चीनमधल्या शेअरबाजारांत घसरण झालीय.
कर्नाटकातील वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू
कोरोना विषाणुमुळे कर्नाटकातील कलबुर्गी येथे 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याचं राज्य सरकारने सांगितलं आहे. कोरोना विषाणुमुळे झालेला हा देशातला पहिला मृत्यू आहे.
श्वसनाचा त्रास होतोय अशी तक्रार घेऊन आलेल्या वृद्धाचा मृत्यू झाला. ते कोव्हिड-19 चे संशयित होते. ते कोरोना विषाणूनेच दगावल्याचे कर्नाटकचे आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ. श्रीनिवास यांनी सांगितलं.
हे गृहस्थ तेलंगणामध्ये एका रुग्णालयात उपचारासाठी गेले होते. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची कोरोनाची चाचणी घ्यावी असे कर्नाटक सरकारने तेलंगणा सरकारला सांगितलं आहे.
देशात कोरोनाचा संसर्ग झालेल्या लोकांची संख्या 73 वर गेल्याचं केंद्र सरकारने सांगितलं आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता खबरदारीचा उपाय म्हणून दिल्लीतील चित्रपटगृहं 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय दिल्ली सरकारनं घेतला आहे.
कोरोना व्हायरसने जगभर घातलेल्या थैमानामुळे पुन्हा एकदा शेअर बाजारावर परिणाम दिसून आला. सकाळी कामकाज सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीमध्ये घसरण झाली. गेल्या आठवड्यापासून जगभरातील शेअर बाजारांमध्ये पडझड दिसून आली.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स सकाळीच 2500 पेक्षा जास्त अंकांनी खाली असल्याचं दिसून आलं तर निफ्टीही 700 अंकांनी कोसळला. 2017 नंतर निफ्टी पहिल्यांदाच 10,000 च्या पातळीखाली आला.
कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची महाराष्ट्रात संख्या 14 झाली आहे अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
हेही नक्की वाचा -
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)