You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
INDVsSA: 'या' पाच खेळाडूंच्या कामगिरीवर टीम इंडियाचं भविष्य अवलंबून
- Author, आदेशकुमार गुप्त
- Role, क्रीडा पत्रकार, बीबीसीसाठी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
यावर्षी भारतीय क्रिकेट संघाच्या परदेश दौऱ्याची सुरूवात न्यूझीलंडमधून झाली. न्यूझीलंड विरुद्धचे पाचही टी-20 सामने भारताने जिंकले. त्यानंतर होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांमध्येही न्यूझीलंडचं भारतापुढे काही चालणार नाही, असंच वाटत होतं. पण असं काही झालं नाही.
न्यूझीलंडनं जबरदस्त कमबॅक करत भारताला एकदिवसीय सीरीजमध्ये 3-0 नं हरवलं. नंतर दोन कसोटी सामनेही अगदी आरामात जिंकले.
आता भारत 12 मार्चपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळत आहे. या मालिकेतला पहिला सामना धर्मशाळा इथं खेळला जात आहे. दुसरा सामना 15 मार्चला लखनऊनध्ये आणि तिसरा सामना 18 मार्चला कोलकात्यात होणार आहे.
न्यूझीलंडकडून 3-0 असा एकतर्फी पराभव स्वीकारल्यानंतर या सीरिजमध्ये कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियावर नक्कीच दबाव असेल.
दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेनं क्विंटन डी कॉकच्या नेतृत्वाखाली मायदेशात खेळताना ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला तीन एकदिवसीय सामन्यांच्या सीरिजमध्ये 3-0 असं हरवलं. या विजयामुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा आत्मविश्वास निश्चितच वाढला असेल.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये आतापर्यंत 84 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी 46 सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि 35 सामन्यात भारताचा विजय झाला आहे. तीन सामने 'टाय' झाले होते.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेमध्ये कर्णधार विराट कोहलीसह शिखर धवन, केएल राहुल, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, मनीष पांडेय, शुभमन गिल, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार और नवदीप सैनी 'टीम इंडिया'कडून खेळत आहेत.
शिखर धवन, भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पंड्या दुखापतीतून बाहेर पडत टीममध्ये पुनरागमन करत आहेत.
दक्षिण आफ्रिकेचा धडाका
दक्षिण आफ्रिकेने काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाला एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 3-0 नं हरवलं. या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात हेन्री क्लासेननं नाबाद 123 धावांची खेळी केली होती. अनुभवी डेव्हिड मिलरनं 64 धावा केल्या होत्या.
दक्षिण आफ्रिकेनं पहिला सामना 74 धावांनी जिंकला. दुसऱ्या सामन्यात आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियाला सहा विकेट्सनं हरवलं. दुसऱ्या सामन्यात सलामीवीर जॅनमेन मालाननं नाबाद 129 धावा केल्या, तर क्लासेननं 51 धावा केल्या.
तिसरा सामना दक्षिण आफ्रिकेनं सहा विकेट्सनं जिंकला होता. या सामन्यात क्लासेननं नाबाद 68 आणि स्मूट्सनं 84 रन्स केल्या.
भारताची बाजू
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी कर्णधार विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या आणि भुवनेश्वर कुमार महत्त्वाचे असतील, असं क्रिकेट समीक्षक विजय लोकपल्ली यांनी सांगितलं.
हे पाच खेळाडू का महत्त्वपूर्ण आहेत, हे जाणून घेऊया-
1. विराट कोहली
भारताचा कर्णधार विराट कोहली जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाजांपैकी एक आहे. पण क्रिकेट समीक्षक विजय लोकपल्ली विराटच्या न्यूझीलंडमधल्या कामगिरीवर फारसे खूश नाहीत. गेल्या 11 डावांत विराटनं केवळ एक अर्धशतकी खेळी केली आहे, याकडे लोकपल्ली यांनी लक्ष वेधलं.
विराटच्या क्षमतांचा विचार करता ही कामगिरी खूपच खराब आहे, असं लोकपल्लींनी म्हटलं. न्यूझीलंडमधल्या वेगवान आणि उसळत्या खेळपट्ट्यांवर विराटला नक्कीच त्रास झाला असेल. पण ज्या चेंडूवर विराट आउट झाला, ते टाकलेही खूप उत्तम पद्धतीनं होतं.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरीजमध्ये मात्र कानपूरसारख्या पाटा खेळपट्ट्या आहेत. फलंदाजांसाठी अशा खेळपट्ट्या अनुकूल मानल्या जातात. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धला विराटला सूर गवसला तर ते टीमसाठी चांगलंच ठरेल.
2. केएल राहुल
गेल्या काही काळात राहुल टीम इंडियाचा एक विश्वासार्ह खेळाडू बनला आहे. विजय लोकपल्लींच्या मते, तो परिस्थितीनुसार आपल्या खेळात बदल करू शकतो. न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने नाबाद 88 धावा केल्या होत्या आणि तिसऱ्या मॅचमध्ये 112 धावा केल्या होत्या.
त्याच्याकडे उत्तम शैली आहे. काही क्रिकेट समीक्षकांच्या मते राहुल विराट कोहली, रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांच्याप्रमाणेच कसोटी क्रिकेटमधला शैलीदार फलंदाज आहे. पण राहुलला सध्या कसोटी संघात स्थान नाहीये. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केएल राहुलच्या कामगिरीवर सर्वांचंच लक्ष असेल.
3. ऋषभ पंत
विजय लोकपल्ली सांगतात, की एवढ्या संधी मिळूनही जर ऋषभ पंतच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असेल, तर त्यासाठी सर्वस्वी तोच जबाबदार आहे. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धची सीरिज ही ऋषभ पंतसाठी टर्निंग पॉइंट ठरू शकते. निवड समिती पण त्याला किती काळ संधी देत राहणार?
खरं तर त्याच्यासारख्या फलंदाजासाठी एकदिवसीय क्रिकेट हा फॉर्मच उत्तम आहे. त्यामुळे ऋषभ पंतवर चांगली कामगिरी करण्याचा दबाव आहे आणि त्याला आता चांगल्या खेळीची गरज आहे. निवड समितीतल्या दोन नवीन सदस्यांनी जुन्या सदस्यांवर विश्वास ठेवत ऋषभ पंतला संधी दिली तर आहे, पण तो त्याचा किती फायदा घेतोय हे पहायला हवं.
4. हार्दिक पंड्या
दुखापतीतून सावरून हार्दिक पंड्यानं टीममध्ये पुनरागमन केलं आहे. तो अतिशय बिनधास्त खेळाडू आहे. खूप काळानंतर इतक्या बेधडकपणे खेळणारा खेळाडू आपल्याला मिळालाय, असं माजी प्रशिक्षक अनिल कुंबळेंनी सांगितल्याचं विजय लोकपल्लींनी म्हटलं.
स्वतःच्या जोरावर सामना खेचून आणेल अशा खेळाडूची भारतीय संघाला आवश्यकता होती. तो एक उत्तम फिल्डरही आहे. गेल्या वर्षी झालेल्या आयसीसी वर्ल्ड कपनंतर पहिल्यांदाच हार्दिक पंड्या भारतासाठी एकदिवसीय सामना खेळत आहे.
5. भुवनेश्वर कुमार
एकेकाळी भारतीय गोलंदाजांमधलं हे आघाडीचं नाव होतं. त्याचे स्विंग होणारे चेंडू खेळणं हे शेवटच्या काही ओव्हर्समध्ये फलंदाजांना कठीण जायचं. गेले काही महिने तो दुखापतींनी ग्रस्त होता. बरीच विश्रांती आणि उपचार घेऊन तो संघात परतला आहे.
त्याला जुना सूर गवसला तर भारतासाठी तो नक्कीच दिलासा असेल. कारण भारताला याच वर्षी टी-20 वर्ल्ड कपही खेळायचा आहे. चेंडूवर नियंत्रण असलेले त्याच्यासारखे फारच कमी गोलंदाज असतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)