ऑनर किलिंगः दलित जावयाची हत्या, सासऱ्याची आत्महत्या, हैदराबादमधील प्रकरणाने देश हादरला होता तेव्हा

मारुती राव

फोटो स्रोत, AMRUTHA.PRANAY/FACEBOOK

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या हैदराबाद ऑनर किलिंग प्रकरणाने एक वेगळं वळण घेतलं. दलित मुलाशी लग्न केल्याचा राग मनात ठेवून पेरुमल प्रणय याची हत्या केल्याचा आरोप असणाऱ्या तिरुगर मारुती राव यांनी आत्महत्या केली होती.

प्रणयची 14 सप्टेंबर 2018 रोजी हत्या करण्यात आली होती. मारुती राव याची मुलगी अमृता आणि प्रणय यांचा विवाह झाला होता. मारुती राव यांना सहा महिन्यांनंतर जामीन मिळाला होता. पोलिसांनी या मृत्यूची नोंद संशयास्पद मृत्यू अशी केली आहे.

मारुती राव याचं गाव नलगोंडा जिल्ह्यात आहे. शनिवारी रात्री मारुती राव खैरताबाद इथे आर्य व्यास भवन येथे एका खोलीत उतरले होते.

रविवारी सकाळी त्यांच्या पत्नीने आणि नंतर आर्य व्यास भवनाने फोन करुनही प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांना बोलवण्यात आले. तेव्हा ते मृतावस्थेत सापडले. मारुती राव यांचा मृतदेह उस्मानिया हॉस्पिटलमध्ये विच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता.

मारुती राव यांच्या मृत्यूवर त्यांची मुलगी अमृता यांची प्रतिक्रिया बीबीसी तेलुगुने घेतली. त्यांनी सांगितलं की प्रणयच्या हत्येनंतर मी माझ्या वडिलांबरोबर बोलणं सोडलं होतं. प्रणयच्या हत्येचा कदाचित त्यांना पश्चाताप झाला असावा असं अमृता यांनी सांगितलं होतं.

काय आहे प्रकरण?

तेलंगणच्या नलगोंडाच्या जिल्ह्यात ऑनर किलिंगचं हे प्रकरण समोर आलं होतं. जिल्ह्यातील मिर्यालगुडा शहराच्या बाहेर 24 वर्षीय पेरुमल्ला प्रणय या युवकाची त्याच्या गरोदर पत्नीसमोर निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.

प्रणय अमृता

फोटो स्रोत, AMRUTHA.PRANAY.3/FACEBOOK

डॉक्टरकडून पत्नीची तपासणी करून ते दोघं हॉस्पिटलमधून बाहेर पडले होते. तेव्हा दोन अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्रांनी प्रणयच्या मानेवर जोरदार प्रहार केले. त्यात प्रणयचा जागच्या जागीच मृत्यू झाला.

प्रणय आणि अमृता यांचं यावर्षी 31 जानेवारीला लग्न झालं होतं. त्यांचा प्रेमविवाह होता आणि त्यामुळेच दोघांचे कुटुंबीय त्यांच्यावर नाराज होते. दरम्यान प्रणयच्या घरच्यांनी अमृताला स्वीकारलं होतं. अमृताच्या घरचे मात्र नाराज होते.

प्रणय दलित समाजाचा तर अमृता आर्य वैश्य समुदायाची होती. पोलिसांना अमृताच्या वडिलांवर हत्या केल्याचा संशय होता. कारण दोघांनी कुटुंबीयांच्या मर्जीविरुद्ध लग्न केलं होतं.

त्या दोघांची मैत्री झाली तेव्हा प्रणय 10वीत आणि अमृता 9वीत शिकत होती. दोघांचं शिक्षण बी.टेक.पर्यंत झालं आहे. दोघांनी आपल्या कुटुंबीयांकडे लग्नाची परवानगी मागितली होती. अमृताचे वडील मारुती राव यांनी लग्नाला ठाम नकार दिला होता.

त्यानंतर दोघांनी हैद्राबादमध्ये जाऊन आर्य समाजाच्या विधींनुसार लग्न केलं. दोघं परत आले आणि प्रणयच्या घरात राहू लागले.

लग्नानंतर मारुती राव यांनी मुलीला परत बोलावण्याचा प्रयत्न केला मात्र तिने याला नकार दिला.

प्रणयच्या लग्नानंतर दोनच महिन्यात त्यांना प्रणयची हत्या करायची होती आणि त्यामुळे प्रणयसुद्धा काळजीत होता, असं सांगण्यात येतं.

त्यातच अमृता गरोदर राहिली.

प्रणय आणि त्याची आई अमृताला घेऊन मिरयालागुडाच्या खासगी इस्पितळात तपासणीसाठी घेऊन गेली आणि तिथेच ही घटना घडली.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)