You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महिला दिन: जेव्हा मी एका दिवसासाठी कलेक्टर झाले...
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
"3 मार्च 2020 हा दिवस मी आयुष्यभर विसरणार नाही. भविष्यात मी कलेक्टर होणारच आहे, पण नववीत असतानाच मला कलेक्टर व्हायची संधी मिळाली, हे मी कधीच विसरणार नाही."
योगिता मगर बुलडाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर पडली, त्यावेळी तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. भविष्यात कलेक्टर व्हायचं स्वप्न बघणाऱ्या योगिताला हा योग इतक्या लवकर जुळून येईल, असं स्वप्नातही वाटलं नसेल. पण, तिला वयाच्या 14व्या वर्षी एका दिवसासाठी कलेक्टर व्हायला मिळालं. तिचा अनुभव तिच्याच शब्दांत.
3 मार्चला आमच्या शाळेला ऑर्डर आली होती की, एका मुलीला एका दिवसासाठी कलेक्टर बनवायचं आहे. त्यामुळे मग शिक्षक मला कलेक्टर ऑफिसला घेऊन गेले. आमच्या शाळेतून मी आणि शेजारच्या गावातील दोन मुली तिथं गेलो. कलेक्टर मॅडमनं आम्हाला बसायला सांगितलं आणि काही प्रश्न विचारले. नाव, स्वत:ची माहिती आणि भविष्यात काय बनायचं आहे, हे त्यांनी विचारलं. त्यावर आम्ही तिघींनी कलेक्टर बनायचं असं सांगितलं.
मग त्यांनी कलेक्टरच का व्हायचं, असा प्रश्न विचारला. आम्ही तिघींनी उत्तर दिलं. त्यानंतर मग मॅडमनं मला कलेक्टर म्हणून सिलेक्ट केलं आणि त्या दोघींनी सीईओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) ऑफिसमध्ये पाठवलं.
त्यानंतर मॅडमनं मला एक प्रमाणपत्र दिलं. तुम्हाला आज एक दिवसाचा जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार सोपवण्यात येत आहे, असं त्यात लिहिलं होतं. त्यानंतर त्यांनी मला कलेक्टरच्या खुर्चीत बसवलं आणि त्या स्वत: बाजूच्या खुर्चीत बसल्या.
त्यानंतर एक मीटिंग सुरू झाली.
त्यातली पहिली मीटिंग सध्या सुरू असलेल्या कर्जमाफी योजनेबद्दल होती. पूर्ण बुलडाण्यातून काही शेतकरी असे आहेत, ज्यांचं कर्ज माफ होत नाहीये. कारण, काहींच्या अकाऊंट नंबरमध्ये, तर काहींच्या आधार नंबरमध्ये मिस्टेक आहेत. बुलडाणा जिल्ह्यातल्या सगळ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजरची ती मीटिंग होती. पुढच्या 2 तासांत सगळ्या दुरुस्त्या करून झाल्या पाहिजेत, असं मॅडमनी त्या सगळ्यांना सांगितलं.
त्यानंतर रस्ते सुरक्षेविषयी मीटिंग होती. मी ज्या कोणत्या रस्त्यानं जाते, तो व्यवस्थित नसतो, असं मॅडमनं त्या मीटिंगमध्ये म्हटलं. मग या मीटिंगमध्ये मॅडमनं मलाही विचारलं की, तुला रस्त्यांच्या समस्यांवर काय वाटतं?
मी म्हटलं, प्रत्येक वेळी रस्ते बांधले जातात, पण त्यांचं काम व्यवस्थित होत नाही आणि वेळेतही होत नाही. त्यामुळे अपघात होतात.
बाई शिकली की आदर मिळतो...
यापूर्वी मी कधीच कलेक्टर ऑफिसला गेले नव्हते. त्यादिवशी सकाळी साडेनऊ ते दुपारी 2 वाजेपर्यंत मी कलेक्टर होते. या वेळेत मी 2 बैठकांमध्ये सहभागी झाले.
मला त्यादिवशी कळालं की, जेवढं मोठं पद, तेवढ्या मोठ्या जबाबदाऱ्या असतात. अभ्यास करून कलेक्टर व्हायचं आणि मग झालं सगळं, असा विचार केला जातो, पण तसं काही नसतं हे त्या दिवशी मला समजलं.
तसंच एका बाईला ऑर्डर देताना मी त्यादिवशी पहिल्यांदाच पाहत होते. मुलीला शिकवलं तर ती मोठ्या पदावर जाऊ शकते, तिला कुटुंब आणि समाजात आदर मिळतो, हेसुद्धा त्यादिवशी जाणवलं.
कलेक्टर बनायचं कारण...
त्या दिवसापूर्वी मी कधीच कलेक्टर ऑफिसला गेले नसले, तरी मी कलेक्टरबद्दल ऐकलं होतं. मला स्वत:लाही कलेक्टर बनायचं आहे, माझं स्वप्नच आहे ते. जिल्ह्याचा अधिकारी बनून जिल्ह्यासाठी काहीतरी करायचं आहे.
जिल्ह्यातल्या अंधश्रद्धा दूर करायच्या आहेत. आज शेतकऱ्यांचे किती प्रॉब्लेम आहे. त्यांच्या मालाला भाव मिळत नाही. शेतात जाण्यासाठी योग्य रस्ते नाहीत. काही गावांमध्ये पाण्याची समस्या आहे.
या समस्या कोर्टात गेल्या की त्या सोडवायला खूप दिवस लागतात. त्यामुळे मग कलेक्टर होऊन या समस्या तत्काळ सोडवायच्या आहेत.
दुपारी 2 वाजता कलेक्टर मॅडम त्यांच्या फिल्ड व्हिजिटसाठी बाहेर पडल्या आणि मी घरी परतले. मला पाहून ममी-पप्पा खूश झाले होते. तुलाही कलेक्टर बनायचं आहे, असं ते म्हणत होते.
योगिता नितीन मगर बुलडाणा जिल्ह्यातल्या मंगरुळ नवघरे येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये नववीत शिकते. तिचे आई-वडील शेती करतात.
उपक्रम काय आणि कशासाठी?
बुलडाणा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी (कलेक्टर) सुमन रावत चंद्रा यांनी महिला दिनाचं औचित्य साधून एक उपक्रम हाती घेतला आहे. त्याबद्दल त्यांनी ट्वीट करून सांगितलं, "जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही जिल्हा परिषद शाळांमधील काही गुणवंत विद्यार्थीनींना एका दिवसासाठी कलेक्टर होण्याची संधी देत आहोत."
2 मार्च ते 8 मार्च 2020 दरम्यान हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
या उपक्रमाविषयी अधिक विचारल्यावर चंद्रा यांनी बीबीसीला सांगितलं, "मुलींच्या स्वप्नाचं क्षितीज व्यापक व्हावं, हा या उपक्रमामागचा हेतू आहे."
"ग्रामीण भागात कलेक्टर या पदाशी सगळेच रिलेट करू शकतात. समाजातल्या सगळ्या स्तरातल्या लोकांना कलेक्टर त्यांचा प्रतिनिधी वाटतो. या पदाबद्दल सर्वसामान्यांमध्ये एक विश्वासाची भावना असते. त्यामुळे मग कलेक्टरनं याप्रकारचा उपक्रम राबवल्यास उद्या आमचीही मुलगी कलेक्टर होऊ शकेल, अशी भावना सर्वसामान्य पालकांमध्ये निर्माण होईल आणि मुलींमधील स्वत:ची स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा बळकट होईल, हा उद्देश समोर ठेवून हा उपक्रम हाती घेण्यात आला," त्या पुढे म्हणाल्या.
"या उपक्रमाला सगळीकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आम्ही हा उपक्रम सुरू केल्यानंतर जिल्ह्यातील पोलीस विभाग, जिल्हा परिषद विभाग यांनीही तो उचलून धरला. सगळीकडे या उपक्रमाचं कौतुक होत आहे," असंही त्यांनी सांगितलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)