You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरसमुळे जयपूरचं 8 मजली हॉस्पिटल असं झालं रिकामं...
- Author, मोहर सिंह मीना
- Role, बीबीसी हिंदीसाठी, जयपूरहून
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
कोरोना व्हायरसचा संशयित एक रुग्ण जयपूरमधल्या हॉस्पिटलमध्ये पोहोचला आणि सगळ्यांनी हॉस्पिटलमधून बाहेर पडायला सुरुवात केली.
हे प्रकरण जयपूरमधल्या यूनिवर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सचं आहे. कोरोना व्हायरसचे 9 संशयित रुग्ण इथं हॉस्पिटलमध्ये पोहोचले, तेव्हा त्यांना दुसऱ्या मजल्यावरील 286 क्रमांकाच्या मेल वॉर्डमध्ये भरती करण्यात आलं. पण, हळूहळू ही बातमी हॉस्पिटलभर पसरली आणि आधीच तिथं जमा असलेल्या सगळ्या रुग्णांनी हॉस्पिटलबाहेर पडण्यास सुरुवात केली.
आता परिस्थिती अशी आहे की, हॉस्पिटलमधील सगळे वॉर्ड रिकामे आहेत आणि कर्मचाऱ्यांमध्येही भीतीचं वातावरण आहे.
इतकंच नाही तर डॉक्टरसुद्धा या रुग्णांवर उपचार करायला तयार नाहीत. त्यामुळे सगळे संशयित रुग्ण वॉर्डबॉय आणि नर्स यांच्या भरवशावर आहेत.
सगळे संशयित रुग्ण मोठमोठ्यानं ओरडून डॉक्टरांना बोलावत आहेत, पण कोरोना व्हायरसची भीती इतकी आहे की, त्यांचा आवाज डॉक्टरांच्या कानापर्यंत पोहोचत नाहीये.
संशयित रुग्ण हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वी 560 रुग्ण ओपीडीमध्ये उपचार घेत होते, पण या रुग्णांच्या भरतीनंतर म्हणजेच बुधवारी एकही रुग्ण ओपीडीमध्ये आला नाही.
हॉस्पिटल प्रशासन गप्प
बीबीसीनं या हॉस्पिटलचे प्रिन्सिपल डॉ. सुधांशु कक्कड यांना प्रशासकीय सोयीविषयी विचारलं, तेव्हा त्यांनी सांगितलं, "मी मीडियासोबत काहीच बोलणार नाही."
त्यांनी एका हातानं इशारा करत आम्हाला बाहेर जायला सांगितलं.
गाऊन, डोक्यात टोपी, मास्क आणि चष्मा असा वेष परिधान केलेले सफाई कर्मचारी कृष्णा कोरोना व्हायरस संशयित रुग्णांचा वॉर्ड साफ करत होते.
भीतीग्रस्त आवाजात ते सांगतात, "हे कीट देऊन मला कोरोना व्हायरस संशयित रुग्णांच्या वॉर्डमध्ये सफाईसाठी पाठवलं आहे. मलासुद्धा जीव आहे. आता मी पुन्हा तिथं जाणार नाही."
या रुग्णांची देखभाल करणारे कर्मचारी सांगतात, "आम्ही लढण्यासाठी तयार आहोत. पण, आम्हाला त्यासाठी साधनं हवीत. आमच्याजवळ ना कीट आहे, ना आवश्यक साधनं. आम्हालाही जीव आहे, आमचीही कुटुंब आहेत. डॉक्टर तर कोरोना व्हायरस संशयित रुग्णांकडे जात नाहीये. आम्हालाच त्यांच्या वॉर्डमध्ये पाठवलं जात आहे."
कीट नाही, तर ड्यूटीही नाही
हॉस्पिटल प्रशासनाच्या या वर्तनामुळे नर्सिंग कर्मचारी डॉ. सुधांशु कक्कड यांच्या केबिनमध्ये पोहोचले आणि मोठ्या आवाजात कीट न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
"कामावर न आल्यास आम्हाला निलंबित करण्याची धमकी देण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांनी कक्कड यांना स्पष्ट सांगितलं आहे की, कीटसहित सगळ्या सुविधा उपलब्ध न करून दिल्यास 6 मार्चपासून ड्यूटीवर येणार नाही. हवं तर निलंबनाची कारवाई करा."
जयपूरचे ज्येष्ठ चिकित्सक डॉ. राजवेंद्र सिंग चौधरी सांगतात, "कोरोना व्हायरसचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होणार आहे. त्यामुळे या रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांकडे जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार कीट असणं आवश्यक आहे."
जेव्हा कोरोनाव्हायरसचे संशयित रुग्ण आले...
हॉस्पिटलच्या रेसिडेंट हॉस्टेलमध्ये राहाणारे 30 वर्षिय डॉ. वसीम 3 मार्च पर्यंत त्याच हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. त्याच रात्री कोरोनाव्हायरसच्या संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले.
डॉ. वसिम म्हणतात, "कोरोना व्हायरसचे संशयित रुग्ण हॉस्पिटलमध्ये आल्याची बातमी आधीपासून दाखल झालेल्या रुग्णांमध्ये पसरू लागली."
"उपचार घेणाऱ्या लोकांमध्ये घबराट पसरली. वॉर्डमधील नर्सिंग कर्मचारीसुद्धा कोरोनाव्हायरसच्या संशयित रुग्णांवर चर्चा करत होते. बघताबघता त्या रात्री रुग्ण निघून जाऊ लागले. सर्वात आधी महिला वॉर्ड रिकामा झाला."
डॉ. वसिमसुद्धा रुग्णालयातून बाहेर पडले आहेत आणि आरयूएचएस हॉस्पिटलच्या परिसरामध्ये रेसिडेंट हॉस्टेलमध्ये आराम करत आहेत. हॉस्टेलमधील काही डॉक्टरही सुट्टीवर गेल्याचं ते सांगतात.
याच हॉस्पिटलमध्ये मंगळवारपर्यंत लक्ष्मीनारायणही उपचार घेत होते. कोरोनाव्हायरसचे संशयित रुग्ण आल्यानंतर त्याच रात्री त्यांना जयपुरिया रुग्णालयात पाठवण्यात आले.
हॉस्पिटलच्या समोर चहा विकणारे सीताराम शर्मा सांगतात, आज दुकान बंद ठेवायचा विचार करत होतो. रोज पाच लीटरपर्यंत दूध लागायचं. पण कोरोना व्हायरसचे संशयित रुग्ण आल्यानंतर एक लीटर दूधही लागत नाही.
कोरोनाव्हायरसचे 9 संशयित रुग्ण कुठून आले होते?
इटलीतून 20 पर्यटक 21 ते 29 फेब्रुवारी या काळात राजस्थान फिरण्यासाठी आले होते. ते उदयपूर, जोधपूर, झुंझुनू आणि बिकानेर असा प्रवास करत 29 तारखेस जयपूरला आले.
हे पर्यटक जयपूरमधील राजापार्क येथिल रमाडा हॉटेलमध्ये उतरले होते. एंड्री कार्ली नावाच्या 69 वर्षिय रुग्णाला आजारी पडल्यावर जयपूरच्या एसएमएस हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. दुसऱ्या दिवशी त्यांचे कोरोना व्हायरसच्या चाचणीचे रिझल्ट्स पॉझिटिव्ह आले. दोनवेळा चाचणी केल्यानंतरही तेच निष्पन्न झाले.
आतापर्यंत सरकारनं काय केलं?
खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने 3 मार्च रोजी कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णाबरोबर आलेल्या सर्व लोकांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. तसेच हे लोक जिथं उतरले होते त्या हॉटेललाही सील करण्यात आले. जयपूरच्या आरयूएचएस हॉस्पिटलचा ताबा सरकारने घेतला आणि इथं कोरोना व्हायरसची लागण झालेल्या संशयितांना भरती करण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयामुळे नाराज झालेल्या आरयूएचएस हॉस्पिटलच्या डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफने सेवा बजावण्यास नकार दिला. त्य़ाच रात्री सरकारने एसएमएस हॉस्पिटलच्या जवळपास 12 डॉक्टर आणि 30 जणांच्या नर्सिग स्टाफला आरयूएचएस हॉस्पिटलला पाठवण्याचे आदेश दिले. मात्र अद्याप एकही डॉक्टर किंवा नर्सिंग स्टाफ कर्मचारी हॉस्पिटलमध्ये आले नसल्याचं समजत आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)