शरद पवार: नरेंद्र मोदी आणि अमित शाह दिल्ली दंगलीसाठी जबाबदार

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

राजधानी दिल्लीत कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. गेल्या आठवड्यात दिल्लीत मोठा हिंसाचार उफाळून आला होता.

या संपूर्ण हिंसाचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहच जबाबदार आहे. असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.

मुंबईत आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते. दिल्लीतील घटनाक्रमावरून त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

"अमेरिकेचे अध्यक्ष भारत दौऱ्यावर असताना राजधानीत दंगली पेटतात. समाजात दुफळी माजते. केंद्रीय मंत्री देश के गद्दारोंको गोली मारो अशी वक्तव्यं करतात.

"हे मंत्री मिळालेली सत्ता समाजाच्या सर्व घटकांचं रक्षण करण्याऐवजी समाजाच्या काही घटकांमध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात यासारखी निंदनीय गोष्ट सध्या कोणतीही नाही. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत यश मिळालं नाही म्हणून दंगलीच्या माध्यमातून समाजात दुफळी माजवण्याचा प्रयत्न केला जात आहे," असा आरोप त्यांनी यावेळी बोलताना केला.

त्यांच्या या टीकेला अद्याप भाजपकडून काही उत्तर आलेलं नाही.

"भाजपच्या काही नेत्यांनीच प्रक्षोभक वक्तव्यं करून वातावरण पेटवण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधानाचं भाषण ऐकलं तर ते लक्षात येतं. पंतप्रधान प्रत्येक समाजाचे असतात. संपूर्ण देशाचं नेतृत्व करणारी व्यक्ती धार्मिक विसंवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते चिंताजनक आहे. अनेक राज्यात ध्रुवीकरण्याच्या माध्यमातून वातावरण बिघडवलं जात आहे. अशा शक्तींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे," असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)