दिल्ली हिंसाचार : 11 दिवसांपूर्वी लग्न झालेल्या अशफाकवर दंगेखोरांनी झाडल्या 5 गोळ्या

ईशान्य दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचारात 30 पेक्षा अधिक बळी गेले आहेत. शनिवार 23 फेब्रुवारीच्या रात्रीपासून भडकलेला हिंसाचार आता शांत होत असल्याचं वाटत असलं तरी या भागामध्ये अजूनही तणाव आहे.
अनेक घरं या चार दिवसांमध्ये उद्ध्वस्त झाली आहेत.
मरणाऱ्यांमध्ये हिंदूही आहेत आणि मुसलमानही. बळी गेलेल्या बहुतेकांचं वय तिशीच्या आसपास आहे. बहुतेकजण घरातले एकटे कमावणारे होते, लग्न झालेले होते आणि काहींना लहान मुलंही आहेत.
कोणी दोनच दिवसांपूर्वी लग्नाचा वाढदिवस साजरा केला होता, तर एकजण असाही होता ज्याचा पुढच्याच दिवशी वाढदिवस होता.
याच पीडित कुटुंबांपैकी एक कुटुंब त्या व्यक्तीचं आहे ज्याचं अगदी 10 दिवसांपूर्वीच लग्न झालं होतं.

फोटो स्रोत, AFP
अशफाक हुसैन यांचा निकाह होऊन जेमतेम 10-12 दिवस होत नाहीत तोच या दंगलींमध्ये या तरुणाचा जीव गेला.
त्यांच्या छातीवर पाच गोळ्या झाडण्यात आल्याचा नातेवाईकांचा दावा आहे.
अशफाक समोर उभा होता आणि दंगेखोरांनी त्याच्या छातीवर गोळ्या झाडल्याचं अशफाकच्या नातेवाईक हाजरा सांगतात.
हाजरा म्हणाल्या, "त्या लोकांनी माझ्या मुलाच्या छातीवर 5 गोळ्या झाडल्या. त्याने कोणाचं काय बिघडवलं होतं की त्याला अशाप्रकारे मारून टाकलं? तो गेल्यानंतर आता आमच्यासाठी फक्त आणि फक्त अडचणी राहिल्यात. आम्ही आमच्या मुलांना लहानाचं मोठं करतो आणि ते लोक येऊन काही क्षणांत आमच्या मुलांना मारून टाकतात. त्यांना दया येत नाही का."
याच वर्षी 14 फेब्रुवारीला अशफाकचं लग्न झालं होतं.
रडतरडत हाजरा सांगतात, "त्याची 11 दिवसांची बायको काय करेल आता...तुम्हीच सांगा. कुठे जाईल ती."

अशफाकच्या छातीवर पाच गोळ्या झाडण्यात आली आणि तलवारीने त्यांच्या मानेवरही वार करण्यात आल्याचं नातेवाईकांचं म्हणणं आहे.
अशफाक त्या दिवशी कामावर गेला होता आणि ही घटना घडली तेव्हा तो कामावरून परतत होता असं नातेवाईक सांगतात.
दिल्ली हिंसाचार प्रकरणाविषयीची दिल्ली हायकोर्टातली पुढची सुनावणी आता 13 एप्रिलला होणार आहे.
याप्रकरणी कोर्टाने केंद्र सरकारला पक्षकार बनवत शपथपत्र दाखल करण्यास सांगितलं आहे.
एफआयआर दाखल केल्याने दिल्लीमध्ये पुन्हा शांतता प्रस्थापित करायला त्याची मदत होणार नाही, म्हणूनच प्रक्षोभक भाषण दिल्याबद्दल सध्या कोणाच्याही विरोधात एफआयआर दाखल न करण्याचा निर्णय जाणीवपूर्वक घेण्यात आल्याचं दिल्ली पोलिसांनी हायकोर्टाला सांगितलंय.
ईशान्य दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचाराविषयी 48 एफआयआर दाखल झाल्याचं दिल्ली पोलिसांनी मुख्य न्यायाधीश डी. एन. पटेल आणि न्यायमूर्ती हरी शंकर यांच्या खंडपीठाला सांगितलंय.

फोटो स्रोत, AFP
तर हिंसाचारामध्ये आतापर्यंत गेलेल्या बळींची संख्या 32 वर गेल्याचं पीटीआय वृत्तसंस्थेने आरोग्य विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याचा दाखला देत म्हटलंय.
गेल्या चार दिवसांत ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचारत शेकडो लोक जखमी झालेले आहेत.
दिल्लीच्या गुरु तेगबहाद्दूर हॉस्पिटल (जीटीबी हॉस्पिटल)मध्ये 30 मृत्यू झाले आहेत तर लोकनायक जयप्रकाश नारायण हॉस्पिटल (LNJP हॉस्पिटल)मध्ये 2 मृत्यू झाले आहेत.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी बुधवारी या हिसांचारग्रस्त भागांना भेट देत लोकांशी चर्चा केली होती.

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























