कोरोना व्हायरसची भीती घालवण्यासाठी कोल्हापुरात 50 रुपयांमध्ये भरपेट चिकन

    • Author, स्वाती पाटील
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 2 मिनिटे

कोरोना व्हायरसच्या अफवेमुळे चिकन पोल्ट्री व्यवसायावर परिणाम झाल्याने कोल्हापुरात एका चिकन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.

या चिकन महोत्सवात लोकांना खास चिकनपासून बनणाऱ्या पदार्थांची चव चाखता येणार आहे.

कोल्हापूर जिल्हा ब्रॉयलर, ब्रीडर वेल्फेअर असोसिएशन, पोल्ट्री फार्मधारक शेतकरी, उद्योजक, कर्मचारी यांनी हा महोत्सव आयोजित केला आहे.

अशा महोत्सवाच्या माध्यमातून चिकन बाबतीत गैरसमज दूर व्हावेत हा हेतू असल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे लोकांमध्ये असलेला गैरसमज दूर होऊन चिकनच्या मागणीत वाढ होईल तसंच हा व्यवसाय पूर्ववत होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

कोरोना व्हायरसमुळे लोकांमध्ये चिंता

चीनसह अनेक देशात वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसने अनेकांना चिंतेत टाकलं आहे. याचा मोठा परिणाम चिकन व्यवसायावर झाला आहे. चिकनचा खप पूर्वीपेक्षा 50 टक्यांनी कमी झाला आहे. त्यामुळं पोल्ट्री फार्मधारक तसंच चिकन विक्रेते काळजीत आहेत.

कोल्हापूर हे चिकन, मटण चवीनं खाणाऱ्या खवय्याचे शहर म्हणून ओळखले जातं. पण चिकन खाल्ल्याने कोरोना विषाणूची लागण होते, असा आशय असेलेले मेसेज सोशल मीडियावर फिरत आहेत.

त्याचा धसका घेत अनेकांनी चिकन न खाणं पसंत केलं आहे. सावधानता म्हणून लोकांनी चिकन खाण्याचं प्रमाण कमी केले आहे. त्याचा चिकन व्यवसायावर परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे.

खरं तर प्रोटीनचा सर्वांत स्वस्त स्त्रोत म्हणून चिकनला जास्त पसंती होती. मात्र कोरोना व्हयरसच्या अफवेमुळे चिकनच्या मागणीमध्ये मोठी घट झाली आहे.

चिकन व्यावसायिक तौहिद बारस्कर यांचं कोल्हापूर शहरातील मटण मार्केटमध्ये चिकनचं दुकान आहे. चिकन व्यवसायावर आलेल्या संकटाबाबत त्यांनी माहिती दिली.

"कोरोना व्हायरसच्या अफवेमुळे व्यवसायावर परिणाम झाला आहे. मागणीमध्ये 25 ते 50 टक्क्यांनी घट आली आहे. त्यामुळ शेतकरी वर्ग, पोल्ट्रीफार्मधारक, चायनीज फूड विक्रेते, हॉटेल व्यवासायिक यांना नुकसान सहन करावं लागत आहे. हातावर पोट असणाऱ्या वर्गावर परिणाम होत असल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या अफवा रोखण्यासाठी पोलिसांना निवेदन दिलं आहे," असं बारस्कर यांनी सांगितलं.

मागणी कमी झाल्याने चिकनच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आधी 180 ते 200 रुपये किलो या दराने मिळणारे चिकन आता 80 ते 100 रुपये किलो इतक्या कमी दराने मिळत आहे, असं त्यांनी सांगितलं.

चिकनचा खप कमी झाल्याने या व्यवसायातील कामगारांवर बेकारीची वेळ येऊन ठेपली आहे.

चिकनमधून कोरोनो व्हायरसची लागण होते ही निव्वळ अफवा आहे. हा लोकांचा गैरसमज आहे, असं संदीप चव्हाण यांनी सांगितलं.

चव्हाण यांचे कोल्हापूरच्या जरगनगर भागात चायनीज पदार्थांचे हॉटेल आहे. चिकनपासून बनणाऱ्या पदार्थांना मोठी मागणी होती. मात्र कोरोनो व्हायरसच्या भीतीने ही मागणी कमी झाल्याचं चव्हाण यांनी सांगितलं.

चिकनच्या बाबतीत योग्य ती काळजी घेतली जात असल्याने लोकांनी घाबरण्याचं कारण नाही, असंही ते सांगतात.

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये असं आवाहनही ते करतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)