हिंदू-मुस्लीम वादातून दौंड रेल्वे स्टेशनवर तरुणाची हत्या झाली का? - फॅक्ट चेक

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

दोन दिवसांपूर्वी दौंड स्टेशनवर एका तरुणाला काही लोकांनी मारहाण करून त्याला ठार केल्याची घटना घडली.

ही घटना रेल्वेतील सीटवरून वाद होऊन झाल्याचं प्राथमिकदृष्ट्या सांगितलं जात आहे. मात्र आता त्याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न काही सोशल मीडिया पोस्ट्सद्वारे होतो आहेत. नेमकं खरं काय?

PTIवृत्तसंस्थेच्या बातमीनुसार कल्याणचे राहणारे 26 वर्षांचे सागर मारकड हे त्यांची पत्नी, आई आणि दोन वर्षांच्या मुलीला घेऊन कुर्डूवाडी इथे नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारासाठी जात होते.

रात्रीचे सुमारे पाऊण वाजता ते पुणे स्थानकावर मुंबई-बिदर एक्स्प्रेसच्या जनरल कंपार्टमेंटमध्ये चढले. सागर यांच्या पत्नीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, डब्यात गर्दी होती आणि बसायला जागा नव्हती.

सागर यांनी एका महिलेला थोडं सरकून लहान बाळ असलेल्या पत्नीसाठी जागा देण्याची विनंती केली. मात्र त्या महिलेने जागा देण्याऐवजी सागर यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली, असं त्यांच्या पत्नीने म्हटलं आहे. त्यानंतर वादावादी सुरू झाली.

तेव्हा वाद शिगेला पोहोचला आणि 12 जणांनी मिळून सागर यांना मारहाण केली. सागर यांच्या कुटुंबीयांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी दौंड स्टेशन येईपर्यंत मारहाण सुरूच ठेवली.

दौंड स्टेशनात पोहोचल्यावर पोलिसांनी सागर यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, मात्र त्याआधीच त्यांनी प्राण सोडला होता, असं रेल्वे पोलिसांनी स्पष्ट केलं. हा प्रसंग गुरुवारी पहाटे पुणे आणि दौंड रेल्वे स्टेशनांदरम्यान घडल्याचं रेल्वे पोलिसांनी सांगितलं.

सागर यांना जीवे मारहाण केल्याप्रकरणी 12 जणांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात सहा महिलांचा समावेश असून या संशयित आरोपींना पोलिसांनी अटकही केली आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर या प्रकरणाला धार्मिक वळण मिळालं.

12 मुस्लिमांनी एका हिंदू व्यक्तीला मारहाण केली, असे मेसेज सोशल मीडियावर फिरू लागले.

असे ट्वीट फिरू लागल्यावर मध्य रेल्वेने स्पष्ट केलं की हा वाद बसण्याच्या जागेवरून झाला आणि दोन धर्मांमधला तो वाद नाही. "या प्रकरणाला धार्मिक वळण देऊ नका. फेक न्यूज आणि चुकीची माहिती पसरवू नका," असं आवाहन करण्यात आलं.

मध्य रेल्वेने यासंदर्भात सर्व कथित आरोपींची नावं ट्विटर हँडलवरून जाहीर केली आहेत.

तुम्हालाही जर असा खोटा दावा करणाऱ्या पोस्ट कुठे दिसल्या तर आवर्जून ही बातमी तिथे शेअर करा आणि ते फेक पोस्ट रिपोर्ट करा.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)