You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
CAA-NRC विरोधातील आंदोलकांना देशद्रोही म्हणता येणार नाही- मुंबई उच्च न्यायालय #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. CAAविरोधातले आंदोलक देशद्रोही नाही - मुंबई हायकोर्ट
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांना देशद्रोही म्हणता येणार नाही, असं मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं म्हटलं आहे. दिव्य मराठीनं ही बातमी दिलीय.
इफ्तिकार शेख यांच्या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर हा निकाल देण्यात आला. CAA आणि NRC विरोधात शांततापूर्ण आंदोलन करण्यासाठी इफ्तिकार जखी शेख यांनी परवानगी मागितली होती. माजलगावातील जुन्या ईदगाह मैदानावर हे आंदोलन केले जाणार होते.
मात्र तत्पूर्वी कायदा-सुव्यवस्थेचे कारण देऊन बीड जिल्ह्यातील अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडून त्यांना परवानगी नाकारण्यात आली होती. त्याचाच आधार घेऊन माजलगाव शहर पोलिसांनी देखील निदर्शनांना परवानगी नाकारली होती.
आंदोलनासाठी परवानगी नाकारण्यात आल्यानंतर शेख यांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. यावेळी न्यायालयाने दंडाधिकारी आणि पोलिसांचा हा आदेश चुकीचा ठरवला आहे.
"फक्त एखाद्या कायद्याला विरोध केला म्हणून कुणी गद्दार किंवा देशद्रोही ठरत नाही. निदर्शनांमुळे कायद्यातील कोणत्याही तरतुदींचा भंग होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. शांततापूर्ण आंदोलनाच्या मागणीचा न्यायालयाला विचार करावाच लागेल," असं खंडपीठानं म्हटलं आहे.
दरम्यान, मतभेदाला 'देशविरोधी' किंवा 'लोकशाहीविरोधी' ठरवल्यामुळे लोकशाहीच्या गाभ्यावरच आघात होतो, असं मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड व्यक्त केलं. अहमदाबादमधील गुजरात उच्च न्यायालयाच्या सभागृहात पंधरावे पी. डी. स्मृती व्याख्यान देताना ते बोलत होते.
ते म्हणाले, "विद्यमान कायद्यांविरोधात निदर्शनं करणे आणि मतभिन्नता व्यक्त करणं, याबरोबरच मते मांडण्याचा अधिकार नागरिक वापरताहेत की नाहीत, याची खातरजमा उदारमतवादी लोकशाही व्यवस्था करतात. अशा प्रकारच्या मतभेदाला 'देशविरोधी' किंवा 'लोकशाहीविरोधी' म्हटल्यामुळे; घटनात्मक मूल्यांचे संरक्षण आणि चर्चात्मक लोकशाहीचे संवर्धन याबाबतच्या आपल्या बांधिलकीवरच आघात होतो."
2. नाशिकमध्ये महिलेला जिवंत पेटवलं
नाशिकमधील लासलगाव येथील एसटी स्टँडवर प्रेमप्रकरणाच्या वादातून विधवा महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रकार घडला आहे. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय.
या हल्ल्यात पीडित महिला 50 टक्के भाजली असून तिच्यावर नाशिकमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
लासलगावजवळ असलेल्या पिंपळगाव येथील विधवा महिलेचे तिच्या पतीच्या निधनानंतर रामेश्वरसोबत प्रेम संबंध होते. ज्या मुलासोबत प्रेमसंबंध झाले होते, त्या युवकाचा साखरपुडा झाला. यानंतर रागाच्या भरात येऊन पीडितेने त्या तरुणाचा साखरपुडा मोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. त्यामुळे तरुणाने थेट एसटी स्टँडवर येऊन विधवा महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळले.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी रामेश्वर भागवतला ताब्यात घेतले असून त्याची अधिक चौकशी सुरु आहे.
3. उद्धव ठाकरे - 'सरकार पाडून दाखवा'
"आमचं सरकार मजबूत आहे. आम्ही एकत्र आहोत. तुमच्यात हिंमत असेल तर आमचं सरकार पाडून दाखवा," असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिलीय.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरातील शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
ते म्हणाले, "एप्रिलनंतर 'ऑपरेशन लोटस' नावाची मोहीम भाजप हाती घेणार आहे. मात्र, त्याचा काही उपयोग होणार नाही. महाराष्ट्रातल्या जनतेने तुम्हाला बाजूला लोटले ना. आता पुन्हा जनता तुम्हाला परत दूर लोटल्याशिवाय राहणार नाही. महाविकास आघाडीचे सरकार 5 वर्षं पूर्ण करेल. हिंमत असेल तर उद्या कशाला आज नाही तर आत्ताच सरकार पाडून दाखवा.
"शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हा केवळ प्रथोमपचार आहे. यातून शेतकऱ्यांना कायमचा दिलासा मिळावा आणि शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी सरकार सुरुवात करत आहे. मूळ आजारातून शेतकºयांना बाहेर काढायचे आहे," ते पुढे म्हणाले.
4. अनिल देशमुख - राज्यात 8 हजार जागांवर पोलीस भरती
राज्यात 8 हजार पोलिसांच्या आणि 7 हजार सिक्युरिटी गार्डच्या जागा भरणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय.
"मागील सरकारनं गेल्या 5 वर्षात पोलीस भरती केली नाही. मात्र आम्ही पोलिसांच्या 8 हजार जागा आणि 7 हजार सिक्युरिटी गार्डच्या जागा भरणार आहोत," असं ते म्हणाले.
यासोबतच, "आंध्र प्रदेश सरकारनं बलात्कार गुन्ह्यांबाबत केलेल्या कायद्याचाही आम्ही अभ्यास करणार आहोत. त्यासाठी 20 फेब्रुवारीला मी स्वतः आंध्र प्रदेशमध्ये जाणार आहे. हिंगणघाटसारख्या घटना रोखता याव्यात यासाठी आंध्रप्रदेशमधील कायदा महाराष्ट्रात राबवण्याचा प्रयत्न करणार आहे," असं देशमुखांनी सांगितलं.
दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 50 हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून देणार, अशी घोषणा केली आहे. "मी 50 हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं म्हणालो होतो. तो रोजगार उपलब्ध होणारच. त्यादृष्टीनं प्रयत्न सुरू आहेत.
"सध्या एकट्या मिहान प्रकल्पामध्ये 33 हजार लोकांना रोजगार मिळालेला आहे. कुणाकुणाला रोजगार मिळ्राला याची एक लिस्टच आपण जाहीर करू," असं गडकरी म्हणाले.
5. संस्कृतच्या प्रसारासाठी 643 कोटी रुपये खर्च
गेल्या 3 वर्षांत संस्कृतच्या प्रचारासाठी केंद्र सरकारनं 643 कोटी रुपये खर्च केले आहेत. सरकारच्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे. हिंदुस्तान टाईम्सनं ही बातमी दिली आहे.
तामिळ, तेलुगू, कन्नडा, मल्यालळम आणि ओदिशा या भारतीय भाषांवर एकूण 29 कोटी रुपये खर्च करण्यात आलेत. त्याहून संस्कृतच्या प्रसारासाठी खर्च करण्यात आलेली रक्कम 22 पटींनी अधिक आहे.
शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी लोकसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नानंतर सरकारनं ही आकडेवारी दिली होती.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)