राहुल गांधी: आरक्षण हटवण्याचं भाजप आणि संघाचं स्वप्न कधीही पूर्ण होऊ देणार नाही #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

1. आरक्षण हटवण्याचं भाजप आणि संघाचं स्वप्न कधीही पूर्ण होऊ देणार नाही - राहुल गांधी

कोर्टाने आदेश दिल्यास राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण लागू करण्यास बांधील नाही. तसेच पदोन्नतीतील आरक्षण हा मूलभूत हक्क नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. या निर्णयावर राहुल गांधी यांची प्रतिक्रिया आली आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वाटत नाही की अनुसूचित जाती आणि जमातींनी प्रगती करावी. त्यांना या देशाचं संस्थात्मक प्रारूप बदलायचं आहे, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला. एएनआय या वृत्तसंस्थेला त्यांनी हे सांगितलं.

न्यायाधीश एल. नागेश्वर राव आणि हेमंत गुप्ता यांच्या खंडपीठानं उत्तराखंडमधील आरक्षणाबाबतच्या एका याचिकेवर नुकताच हा निकाल दिला. 'आरक्षण लागू करण्याचा कुठलाही आदेश न्यायालय राज्य सरकारांना देऊ शकत नाही,' असंही सर्वोच्च न्यायालयानं निकालात स्पष्ट केलं आहे.

आरक्षणाबाबत घटनेत करण्यात आलेल्या तरतुदीचा संदर्भ देताना सार्वजनिक पदांवरील नियुक्त्या आणि पदोन्नत्यांच्या बाबतीत आरक्षण आवश्यक आहे अथवा अनावश्यक हे ठरवणं राज्य सरकारचं काम आहे, असंही न्यायालयानं म्हटलं आहे.

याबाबत बोलताना राहुल गांधी म्हणाले मी एससी. एसटी आणि ओबीसी या वर्गातील लोकांना सांगू इच्छितो की आम्ही तुमच्यासोबत आहोत. पंतप्रधान मोदींचं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांचं स्वप्न आम्ही कधीही पूर्ण होऊ देणार नाही असं राहुल गांधी म्हणाले.

2. हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी मला पक्षाचा झेंडा बदलावा लागला नाही: उद्धव ठाकरे

"मला माझं हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी पक्षाचा झेंडा बदलावा लागला नाही. एक नेता आणि एक झेंडा हीच आजही शिवसेनेची ओळख आहे," असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

सह्याद्री अतिथीगृहावर शिवसेना आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.

ते म्हणाले, "शिवसेनेला हिंदुत्व नव्यानं सिद्ध करण्याची गरज नाही. शिवसेना ज्या हिंदुत्वाचा पुरस्कार करत आली आहे, ते हिंदुत्व बाळासाहेबांचे असून ते शुद्ध आणि पवित्र आहे. त्यात जराही खोट नाही. एक नेता आणि एक झेंडा हे सूत्र घेऊन शिवसेना वाटचाल करत आली आहे आणि हे सगळ्या जगाला माहीत आहे."

रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशी घुखसोरांविरोधात मुंबईत मोर्चा काढण्यात आला होता.

त्यावेळी राज ठाकरे म्हणाले, "आज आम्ही मोर्चाला मोर्चानं उत्तर दिलं आहे. अजून उन्माद घातलात तर दगडाला दगडाने उत्तर आणि तलवारीला तलवारीने उत्तर मिळेल. एकोप्याने राहा, उगीच ताकद दाखवू नका."

राज यांच्या या वक्तव्यावर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, "देशात लोकशाही आहे. तलवारी वगैरे फार जुन्या झाल्या आहेत. आता नवे शस्त्र आले आहेत."

3. विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअपवर लक्ष ठेवण्याचे आदेश

देशाच्या एकतेला धोका निर्माण होईल, अशा कृत्यांपासून दूर राहण्यासाठी विद्यापीठांतील व्हॉट्सअप ग्रुप्सवर लक्ष ठेवा, यासहित अनेक कार्यक्रमांची नोंद पुण्यात पार पडलेल्या पोलीस महासंचालकांच्या परिषदेत करण्यात आली आहे. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिली आहे.

डिसेंबर महिन्यात पार पडलेल्या या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते.

विद्यापीठातील विद्यार्थ्यांना संवदेनशील विषयांचं व्यवस्थित ज्ञान असावं यासाठी त्यांच्या संपर्कात राहणं गरजेचं आहे. तसंच विद्यापीठात घडणाऱ्या कार्यक्रमांविषयी माहिती असणं, हा यामागचा उद्देश असल्याचं एका पोलीस महासंचालकानी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं आहे.

या परिषदेनंतर देशभरातल्या पोलिसांना यासंबंधीच्या कार्यवाहीच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

4. शेतकऱ्यांना आता एकाच अर्जावर सर्व योजनांचा लाभ : दादा भुसे

येत्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना केवळ एकाच अर्जावर कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ मिळणार आहे. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिली आहे.

"महाडीबीटी पोर्टल'च्या माध्यमातून या योजनांची प्रक्रिया ऑनलाईन राबवण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना विविध योजनांसाठी प्रत्येकवेळी स्वतंत्र अर्ज द्यावा लागणार नाही.

"अर्जावरील कार्यवाहीचे एसएमएस देखील लाभार्थ्याला पाठवले जातील. यामुळे शेतकऱ्याला कृषी विभागाच्या कार्यालयात चकरा माराव्या लागणार नाहीत. सर्वच टप्प्यांवर मानवी हस्तक्षेप कमी होणार असल्याने योजनांमध्ये पारदर्शकता येईल," असं मत कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केलं.

5. तीव्र हवामानामुळे 2 हजार भारतीयांचा मृत्यू

तीव्र हवामानामुळे 2019मध्ये देशातल्या 2,038 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती Centre for Science and Environment's State of India's Environmentच्या अहवालात समोर आली आहे. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिली आहे.

2018मध्ये मृत्यूंची संख्या 1,396 इतकी होती. 2018मध्ये देशात हवामानाशी निगडित 23 घटना घडल्या होत्या, 2019मध्ये ही संख्या 9 इतकी होती.

या घटनांमध्ये दुष्काळ, वणवा, पूर, भूस्खलन, तापमान, धुकं आणि वादळांचा समावेश होता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)