You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दिल्ली: परदेशी दूतावासाच्या परिसरात 5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार #5मोठ्याबातम्या
वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1) दिल्लीत 5 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार
दिल्लीत चाणक्यपुरीत पाच वर्षांच्या मुलीवर 25 वर्षांच्या तरुणानं बलात्कार केल्याची घटना घडलीय. परदेशी दूतावासात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत ही घटना घडलीय. हिंदूस्तान टाइम्सनं ही बातमी दिलीय.
जखमी अवस्थेत घरी परतलेल्या चिमुकलीनं पालकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पीडित चिमुकलीच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्याच दिवशी पोलिसांनी परदेशी दूतावासाच्या कर्मचारी वसाहतीतून आरोपीला अटक केली.
पाच वर्षांची पीडित चिमुकली घडलेली घटना घरी सांगणार नाही, अशा आशा आरोपीला होती, असं पोलिसांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितलं.
या घटनेतील आरोपी परदेशी दूतावासात ड्रायव्हर म्हणून काम करत होता. त्याचे वडीलही दूतावासातील सपोर्ट स्टाफमध्ये काम करतात. पीडित चिमुकलीही या वसाहतीत राहत होती. तिचे पालक सुद्धा सपोर्ट स्टाफमध्ये काम करतात.
दरम्यान, आरोपीवर पोक्सोअंतर्गत चाणक्यपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
2) वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटला 51 हेक्टर जमीन देण्याचा निर्णय वादात
महाराष्ट्र सरकारनं वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटला जालना जिल्ह्यात 51 हेक्टर जमीन दिलीय. शरद पवार हे या इन्स्टिट्युटचे विश्वस्त आहेत. शरद पवारांमुळेच सर्व नियम डावलून जमीन देण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी केलाय. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिली.
"वसंतदादा शुगर इन्स्ट्युट संस्थेला जमीन देण्याचा प्रस्ताव गेल्या 7 वर्षांपासून प्रलंबित आहे. याआधी महसूल, विधी आणि न्याय विभागानं यावर आक्षेप घेतला होता. हे आक्षेप धुडकावत सरकारनं निर्णय घेतला," असा आरोप भंडारींचा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपचा हा आरोप फेटाळला आहे.
"वसंतदादा इन्स्टिट्युटला भाडेतत्वावर जमीन देण्यात आलीय, शरद पवारांना नाही. साखर उत्पादक शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी ही संस्था काम करते. याचं राजकारण केलं जाऊ नये," असं राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक म्हणाले.
3) ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्तींवर PSA अन्वये गुन्हा
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांच्यावक सार्वजनिक सुरक्षा कायद्यान्वये (PSA) गुन्हा दाखल करण्यात आलाय. द हिंदूनं ही बातमी दिलीय.
कोणत्याही ट्रायलशिवाय तीन महिने कोठडी देण्याची तरतूद PSA कायद्यात आहेत. याआधी ओमर अब्दुल्ला यांचे वडील आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनाही याच कायद्याखाली कैद करण्यात आलीय.
अब्दुल्ला आणि मुफ्तींसह आणखी तीन नेत्यांविरोधात PSA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. यात मोहम्मद सागर, बशीर अहमद विरी आणि सरताज मदनी यांचा समावेश आहे.
जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं 370 कलम रद्द करण्यात आल्यानंतर ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती, फारुख अब्दुल्ला यांसह अनेक नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलंय.
4) फडणवीस दिल्लीत गेल्यास महाराष्ट्राला उपयोगच होईल - खडसे
"देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत गेले, तर आनंदच होईल, स्वागत करेन. शिवाय ते दिल्लीत गेल्यास महाराष्ट्राला अधिक उपयोग होईल," असं भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे म्हणाले. एबीपी माझानं बातमी दिलीय.
"दिल्लीत येणं, न येणं हे फडणवीसांच्या मर्जीवर नाही, तर वरिष्ठ नेत्यांनी तसा निर्णय ठरवल्यास होऊ शकतो," असंही खडसेंनी म्हटलं.
देवेंद्र फडणवीस गेल्या आठ दिवसांपासून दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचारासाठी आले होते. महाराष्ट्रात परतण्याआधी त्यांनी अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर फडणवीस केंद्रात येणार का, यावरुन चर्चा सुरु झाली होती. त्या पार्श्वभूमीवर खडसेंनी प्रतिक्रिया देताना फडणवीसांना टोला लगावला.
5) एअर इंडियाचे 822 कोटी सरकारनं थकवले
अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या हवाई प्रवासासाठी (VVIP चार्टर फ्लाइट्स) खर्च झालेले 822 कोटी रुपये एअर इंडियाला अद्याप मिळालेले नाहीत. माहिती अधिकारांतर्गत मागवलेल्या माहितीतून ही बाब उघड झालीय. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिलीय.
एअर इंडियाला कुणाकडून किती रुपये येणं बाकी आहे, याबाबतची माहिती निवृत्त कमांडर लोकेश बत्रा यांनी आरटीआयच्या माध्यमातून मागवली होती.
त्यानुसार, 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत VVIP व्यक्तींनी केलेल्या हवाई प्रवसापोटी 822 कोटींची रक्कम थकीत आहे. ती अद्याप वसूल झालेली नाहीय.
दरम्यान, केंद्र सरकारच्या निर्गुंतवणूक धोरणानुसार एअर इंडियामधून सरकारी हिस्सा पूर्णपणे काढून घेण्यात येणार आहे. या सरकारी विमान कंपनीच्या तोट्याचा आकडा 8 हजार 556 कोटी रुपयांवर पोहोचलाय.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)