You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रजनीकांत: CAAला पाठिंबा पण भारतीय मुस्लिमांना त्रास झाल्यास त्यांच्या बाजूने उभा - #5मोठयाबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. CAAमुळे नागरिकांवर परिणाम होणार नाही - रजनीकांत
"नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा आपल्या देशातील कोणत्याही नागरिकावर परिणाम होणार नाही," असं वक्तव्य अभिनेते रजनीकांत केलं आहे. इकॉनॉमिक टाइम्सनं ही बातमी दिली आहे.
ते म्हणाले, "CAAमुळे मुस्लिमांवर परिणाम होणार असेल, तर मी पहिली व्यक्ती असेल जी त्यांच्यासाठी उभी राहील. देशाबाहेरच्या नागरिकांबाबत माहिती मिळवण्यासाठी NPR आवश्यक आहे. NRCबाबत स्पष्ट करण्यात आलं आहे की, आतापर्यंत ते तयार करण्यात आलेलं नाही," असं रजनीकांत यांनी माध्यमांना सांगितलं होतं.
काँग्रेस नेते कार्ती पी. चिदंबरम यांनी मात्र रजनीकांत यांच्यावर निशाणा साधला आहे.
त्यांनी ट्वीट करत म्हटलंय, "रजनीकांत भाजपाचे पोपट आहेत. आपल्या मालकानं दिलेली पटकथा ते वाचत आहेत."
2. चिन्मयानंद यांचे जामिनानंतर जल्लोषात स्वागत
लैंगिक शोषणप्रकरणी अटकेत असलेल्या स्वामी चिन्मयानंद यांना अलाहाबाद उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला. जामीन मिळाल्यानंतर चिन्मयानंद यांच्या समर्थकांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं आहे. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिलीय.
चिन्मयानंद यांना सप्टेंबर महिन्यात अटक करण्यात आली होती.
कायद्याच्या विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण केल्याच्या आरोप चिन्मयानंद यांच्यावर आहे. पाठलाग करणे (354-D), चुकीच्या पद्धतीने डांबून ठेवणे (342) तसंच धमकावण्यासाठी (506) हे आरोप चिन्मयानंद यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.
3. दोन लाखांची कर्जमाफी म्हणजे बुजगावणं - बच्चू कडू
दोन लाखांची कर्जमाफी हे बुजगावणं आहे, असं वक्तव्य राज्य मंत्री बच्चू कडू यांनी केलं आहे. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.
आत्तापर्यंत शेतकऱ्यांना किती लुटलं गेलं याचा हिशोब सरकारनं दिला, तर सरकारकडेच शेतकऱ्यांचे पैसे निघतील, असंही त्यांनी म्हटलंय.
पुण्याच्या आळंदी येथे वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. तेव्हा ते पत्रकारांशी बोलत होते.
दरम्यान, 2014मध्ये केंद्रातील सत्ता बदलानंतर शेतकरी आत्महत्यांच्या प्रमाणात 3.7 पटीनं वाढ झाली आहे. 2001 ते 2013 या कालावधीत म्हणजे 12 वर्षांच्या काळात 1141 आत्महत्या झाल्याच्या नोंदी होत्या. तर 2014 ते 2019 पर्यंतची आकडेवारी 5 हजार 635 एवढी असल्याच्या नोंदी आहेत.
4. देशातील बेरोजगारीचा दर 6.1 टक्के
2017-18मध्ये देशातील बेरोजगारीचा दर 6.1 टक्के होता, अशी माहिती कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी संसदेत दिली आहे. बिझनेस टुडेनं ही बातमी दिली आहे.
संसदेत बेरोजगारीवर उपस्थित प्रश्नांवर संतोष गंगवार बोलत होते.
"देशातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आणि व्यावसायिक सुलभीकरणासाठी आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत. त्यामुळे जगभरात भारताच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे. 2019मध्ये भारताचा जगात 63वा क्रमांक राहिला, 2018मध्ये भारत 196व्या क्रमांकावर होता," असंही गंगवार यांनी सांगितलं आहे.
5. गणेश आचार्यविरोधात लैंगिक शोषणप्रकरणी गुन्हा दाखल
लैंगिक छळ प्रकरणी नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्यविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, लोकमतनं ही बातमी दिली आहे.
33 वर्षांच्या नृत्यदिग्दर्शिकेनं अंबोली पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर लैंगिक छळ केल्याप्रकरणी अंबोली पोलीस ठाण्यात कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्यासह दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दोन महिलांनी 26 जानेवारीला फिल्म अँड टेलिव्हिजन कोरिओग्राफर्स असोसिएशनच्या कार्यक्रमात पीडितेला मारहाण केल्याचा आरोप आहे. तसंच, गणेश आचार्य यांनी बळजबरीनं पॉर्न व्हिडीओ दाखवल्याचाही आरोप आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)