You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अयोध्या : राम मंदिर ट्रस्ट घोषणेच्या टायमिंगमागे राजकारण?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राम मंदिराच्या निर्माणासाठी 'श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्ट' स्थापन करत असल्याची घोषणा संसदेत केली आहे.
या ट्रस्टमध्ये 15 सदस्य असतील त्यातला एक सदस्य कायम अनुसूचित जातींमधील असेल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. हे ट्रस्ट पूर्णपणे स्वायत्त असेल.
बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर
9 नोव्हेंबर 2019 ला सुप्रीम कोर्टाने ही वादग्रस्त २.७७ एकर जागा रामलल्लाच्या मालकीची असल्याचं म्हटलं. वादग्रस्त जागेवर शिया वक्फ बोर्ड आणि निर्मोही आखाड्यानेही दावा केला होता. पण त्यांचा दावा कोर्टाने फेटाळून लावला.
हिंदूंची धारणा आणि पुरातत्व विभागाचे दावे यावेळी न्यायालयाने ग्राह्य धरल्याचं न्या. गोगोईंनी यावेळी सांगितलं.
कोर्टाने केंद्र सरकारला आदेश दिला की एका ट्रस्टची स्थापना केली जावी आणि त्या ट्रस्टकडे या महत्त्वाच्या जमिनीची मालकी हस्तांतरित करावी. सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्या शहरात 5 एकर जागा द्यावी, असंही कोर्टाने म्हटलं होतं.
त्यानुसार आता ही घोषणा करण्यात आली आहे.
मोदींच्या घोषणेचं टायमिंग
कोर्टाचा निकाल आल्यानंतर 3 महिन्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या ट्रस्टच्या स्थापनेची घोषणा संसदेत केली.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान 3 दिवसांवर आलं असताना ही घोषणा झाल्यामुळे यात राजकारण आहे, असा आरोप विरोधकांनी केला.
पण खरंच दिल्ली विधानसभा निवडणुकीवर याचा परिणाम होईल का? आम्ही लोकसत्ताचे दिल्लीतले प्रतिनिधी महेश सरलष्कर यांना विचारलं.
ते म्हणाले,"ही घोषणा भाजपच्या ध्रुवीकरणाच्या धोरणाचाच पुढचा भाग आहे. शेवटच्या क्षणी केलेल्या घोषणा कुंपणावरच्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी कामात येऊ शकतात. या ट्रस्टमध्ये एक दलित सदस्य असेल अशीही घोषणा आहे. त्यानिमित्ताने ते दलित समाजालाही आकर्षित करू पाहतायत. एकाच घोषणेतून समाजातल्या अनेक स्तरांना आपल्याकडे वळवण्याचा हा प्रयत्न आहे."
केजरीवालांविषयी महेश सरलष्कर म्हणाले, "आम आदमी पार्टीची भूमिका सॉफ्ट हिंदुत्वाची आहे. केजरीवालांनी हनुमान चालीसा म्हणून दाखवणं, शाहीन बागकडे न फिरकणं हे सगळं त्याचाच भाग आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावर ते थेट उत्तर देणार नाहीत."
शिवसेनाही आक्रमक का?
अयोध्येच्या राजकारणाचा महाराष्ट्रावरही परिणाम होतो. कारण शिवसेनेने आक्रमकपणे अयोध्येचं श्रेय घेण्याचा सुरुवातीपासून प्रयत्न केला आहे.
भाजपसोबत युती तोडून शिवसेना आता काँग्रेसबोत गेली आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी मतदार दूर होईल, अशी शिवसेनेला चिंता आहे. त्यामुळे स्वतःचं हिंदुत्व अधोरिखित करण्यासाठी उद्धव ठाकरे पुन्हा 7 मार्चला अयोध्येला जाणार आहेत.
शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी यानी या घोषणेचं स्वागत केलं आहे, पण ही घोषणा कोर्टाच्या आदेशानुसारच होत असल्याचं त्यांनी म्हटलंय.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या घोषणेचं स्वागत केलं आहे. त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचं अभिनंदन केलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)