You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
IND vs PAK U19 World Cup 2020 : यशस्वी जैस्वालच्या शतकी खेळीनं भारताने पाकिस्तानचा उडवला धुव्वा
यशस्वी जैस्वालच्या दिमाखदार शतकाच्या बळावर भारतीय संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा दहा विकेट्सनी धुव्वा उडवत अंतिम फेरी गाठली.
भारताने या विजयासह सातव्यांदा U19 वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत सातव्यांदा धडक मारली आहे. संघाचा U19 वर्ल्ड कप स्पर्धेतला भारतीय संघाचा अकरावा विजय आहे.
टीम इंडियाने पाकिस्तानचा डाव 172 धावांत गुंडाळला. प्रत्युत्तरादाखल खेळताना यशस्वी जैस्वालच्या नाबाद 105 धावांच्या खेळीच्या बळावर भारताने एकही विकेट न गमावता पाकिस्तानला नमवलं. यशस्वीने 8 चौकार आणि 4 षटकारांच्या साह्याने 113 चेंडूत 105 धावांची खेळी केली. यशस्वीलाच मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.
दिव्यांश सक्सेनाने 99 चेंडूत 6 चौकारांसह 59 धावांची खेळी करत यशस्वीला चांगली साथ दिली.
"माझ्यासाठी हे स्वप्नवत आहे. देशासाठी असं प्रदर्शन करता आलं ही भावना सुखावणारी आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत सेमी फायनलच्या लढतीत शतक झळकावणं माझ्यासाठी खास आहे. मी याचं शब्दांत वर्णन करू शकत नाही. विकेटवर स्थिरावून खेळणं आवश्यक असतं. पाकिस्तानने सुरुवातीला चांगली बॉलिंग केली. आम्ही सुरुवातीला सावध पवित्रा घेतला. आम्ही मेहनतीने हा विजय साकारला. सपोर्ट स्टाफ, कोचेस यांचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत. भारतीय चाहत्यांनी आम्हाला भरभरून पाठिंबा दिला", असं यशस्वीने सांगितलं.
पाकिस्तानतर्फे कर्णधार रोहैल नझीरने 62 तर हैदर अलीने 56 धावांची खेळी केली. मात्र आठ फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. अथर्व अंकोलेकरच्या बॉलिंगवर मोहम्मद हॅरिसचा दिव्यांश सक्सेनाने अफलातून झेल टिपला.
भारताकडून सुशांत मिश्राने 3 तर कार्तिक त्यागी आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
आकडेवारीच्या बाबतीत टीम इंडियाचं पारडं जड आहे.
भारत आणि पाकिस्तान U19 संघांमध्ये 23 मॅचेस झाल्या आहेत. यामध्ये टीम इंडियाने 14 तर पाकिस्तानने 8 मॅचेस जिंकल्या आहेत. एका मॅचमध्ये निकाल लागू शकला नाही.
दोन्ही देशातील संबंध ताणलेले असल्याने भारतीय संघ पाकिस्तानात जाऊन खेळत नाही, तसंच पाकिस्तानचा संघ भारतात खेळण्यासाठी येत नाही. मात्र ICCतर्फे आयोजित स्पर्धांमध्ये हे संघ एकमेकांसमोर उभे ठाकतात.
गेल्या वर्षी 50 ओव्हर वर्ल्ड कपमध्ये मँचेस्टर इथं झालेल्या लढतीत भारतीय संघाने पाकिस्तानवर विजय मिळवला होता.
आतापर्यंत टीम इंडियाची कामगिरी
टीम इंडियाने सलामीच्या लढतीत श्रीलंकेला नमवलं होतं. नवख्या जपानचा टीम इंडियाने 41 धावांत खुर्दा उडवला आणि सहजपणे लक्ष्य गाठलं. मॅचनंतर जपानच्या टीमबरोबर फोटो काढत टीम इंडियाने चाहत्यांची मनेही जिंकली होती.
न्यूझीलंडविरुद्ध डकवर्थ लुईसच्या बळावर टीम इंडियाने बाजी मारली. तुल्यबळ ऑस्ट्रेलियावर मात करत टीम इंडियाने सेमी फायनलच्या दिशेने दमदार पाऊल टाकलं.
पाकिस्तानचा संघही स्पर्धेत आतापर्यंत पराभूत झालेला नाही. त्यांनी स्कॉटलंड, अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वे यांना हरवलं आहे तर बांगलादेशविरुद्धची लढत पावसामुळे रद्द झाली होती.
मुंबईकर यशस्वी जैस्वाल सुसाट फॉर्ममध्ये आहे. बॉलिंगमध्ये फिरकीपटू रवी बिश्नोईने अनेकांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवलं आहे.
टीम इंडियाने 2000, 2008, 2012 आणि 2018 मध्ये जेतेपदावर नाव कोरलं आहे तर पाकिस्तानने 2004 आणि 2006 मध्ये जेतेपदाची कमाई केली होती.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)