हिंदू महासभेचे नेते रणजीत बच्चन यांची उत्तर प्रदेशात गोळी घालून हत्या

    • Author, समिरात्मज मिश्र
    • Role, लखनौहून, बीबीसी हिंदीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 1 मिनिटे

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे आखिल भारतीय हिंदू महासभेचे प्रदेशाध्यक्ष रणजीत बच्चन यांची सकाळी गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

आपल्या भावासोबत ते मॉर्निंग वॉकला गेले होते. त्यावेळी मोटरसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. बच्चन यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना वाचवण्यासाठी समोर आलेल्या त्यांच्या भावालाही गोळी लागली.

त्यांचा भाऊ जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

लखनौतील उच्चभ्रू वसती हजरतगंजमध्ये ही घटना घडली. हजरतगंज हा भाग अतिशय संवेदनशील मानला जातो. या भागात विधानसभा, सचिवालय आणि इतर अनेक सरकारी कार्यालय आहेत. मंत्री तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निवासही या भागात आहेत.

या हत्येचं कारण काय याचा तपास पोलीस घेत आहेत अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त नवीन अरोरा यांनी दिली. क्राइम ब्रांचची एकूण आठ पथकं या हत्येचा तपास करण्यासाठी तैनात करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. रणजीत बच्चन यांच्या कुटुंबीयांशी अद्याप संपर्क होऊ शकला नाही असं अरोरा म्हणाले.

रणजीत बच्चन यांचा ओसीआर बिल्डिंगमध्ये फ्लॅट होता. समाजवादी पार्टी सत्तेत असताना त्यांना राज्य मंत्र्याचा दर्जा देण्यात आला होता.

रणजीत बच्चन यांनी विश्व हिंदू महासभेची स्थापना केली होती. अरोरा सांगतात की रणजीत बच्चन हे समाजवादी पार्टीशी संलग्नित होते. त्यांचं मूळ गाव हे गोरखपूर आहे. 2002 ते 2009 मध्ये समाजवादी पक्षातर्फे काढण्यात आलेल्या सायकल यात्रेत त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती.

समाजवादी पार्टीने या हत्येचा निषेध केला आहे.

या भागातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

गेल्या वर्षी हिंदू समाज पार्टीचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांचीही हत्या करण्यात आली होती.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)