You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Wipro CEO: अबिदाली नीमुचवाला कोण आहेत ज्यांनी नुकताच राजीनामा दिला?
विप्रो या आयटी क्षेत्रातील बलाढ्य कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदावरुन अबिदाली नीमुचवाला हे पायउतार झालेत. विप्रोच्या CEO सह व्यवस्थापकीय संचालकपदाचीही धुरा अबिदाली नीमुचवाला यांच्याकडेच होती.
अबिदाली नीमुचवाला यांनी कौटुंबिक कारणासाठी पदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतल्याचं इकोनॉमिक टाईम्सने म्हटलंय.
25 वर्षांहून अधिक वर्षांचा माहिती तंत्रज्ञान (IT) क्षेत्रातील अनुभव पाठीशी असलेले अबिदाली नीमुचवाला हे गेल्या चार वर्षांपासून विप्रोचे CEO होते.
एक फेब्रुवारी 2016 रोजी त्यांनी पदभार स्वीकारला होता. त्याआधी म्हणजे एप्रिल 2015 ते 1 फेब्रुवारी या काळात अबिदाली हे विप्रोचे समूह अध्यक्ष आणि चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (COO) होते.
"विप्रोमध्ये नीमुचवाला यांनी दिलेल्या योगदानाबद्दल आणि नेतृत्वाबद्दल आम्ही आभारी आहोत. गेल्या चार वर्षात अबिदाली यांनी कंपनीची बांधणी करण्यात मोठी मदत केली. तसंच, विप्रोचा डिजिटल बिझनेस जागतिक स्तरावर नेला. अबिदाली यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप सदिच्छा," असं विप्रोचे अध्यक्ष रिशद प्रेमजी यांनी म्हटलंय.
तर लाईव्ह मिंटच्या वृत्तानुसार, नीमुचवाला यांनी विप्रोतील आपल्या प्रवासाबद्दल म्हटलं, "विप्रोत आम्ही दखल घ्यावी अशी प्रगती केली, तसंच, आमची वितरण व्यवस्था सुधारली आणि ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून सुधारणा केल्या."
TCS मध्ये 23 वर्षे काम
मध्य प्रदेशातील नीमुच हे नीमुचवाला यांचं मूळ गाव. नीमुचसह दिल्ली आणि मुंबईत त्यांची जडणघडण झाली.
भारतीय संगीताचे चाहते असलेल्या नीमुचवाला यांना वाचण्याची, फिरण्याची आणि बुद्धिबळ खेळण्याची आवड आहे.
विप्रोमध्ये पाऊल ठेवण्याआधीही नीमुचवाला यांनी आयटी क्षेत्रातील बलाढ्य मानल्या जाणाऱ्या कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली होती.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेज (TCS) मध्येही ते मोठ्या पदावर कार्यरत होते.
IIT मुंबईमधून औद्योगिक व्यवस्थापन विषयात मास्टर्स पदवी आणि NIIT रायपूरमधून इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनमध्ये पदवी घेतली.
IIT मुंबईतून पदवी मिळवण्यानंतर ते TCS मध्ये रुजू झाले. इथं तब्बल 23 वर्षे त्यांनी काम केलं. त्यानंतर त्यांनी विप्रोमध्ये काम करण्यास सुरुवात केली.
जागतिक स्तरावर अबिदाली यांचा गौरव
नीमुचवाला हे सॉफ्टवेअर क्वालिटी अनॅलिस्ट आणि सिक्स सिग्मान ग्रीन बेल्ट प्रमाणित आहेत. 2010 चे BPO CEO म्हणून त्यांचा गौरव झालाय.
डलास येथील वर्ल्ड अफेअर्स काउन्सिलच्या संचालक मंडळात अबिदाली आहेत. तसेच, टेक्सास इकोनॉमिक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या काऊन्सिलचे ते COO आहेत.
आता विप्रोच्या मुख्याधिकारी पदाची धुरा कुणाकडे येईल याविषयी उद्योग क्षेत्रात चर्चा सुरू आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)