शरीरविक्रय करणाऱ्या महिलांच्या मुलांचं आयुष्य कसं असतं?

    • Author, चिंकी सिन्हा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

एका चिमुरडीच्या वहीतल्या एका पानावर पेन्सिलने रेखाटलेलं चित्र आहे. चित्रातल्या दोन मुली एकमेकींचा हात पकडून रडतायत.

कामाठीपुऱ्यातल्या महापालिकेच्या शाळेत तिसरीतली सायमा आता या चित्रातल्या मुलींच्या गालांवर अश्रूंचे तीन थेंब काढते...आणि मग ते अश्रू गडद करते.

लतिका सांगते, "त्यांना त्यांच्या आईची उणीव भासते," यानंतर सायमा पुन्हा पानावर चित्र रेखाटण्यात गुंतून जाते. आता ती एका बर्थडे पार्टीचे चित्र काढते. एक मोठा केक, मेणबत्ती, गिफ्ट्स, पंखा आणि आनंदी मुलांनी भरलेली खोली.

दुसऱ्या एका चिमुरडीनेही तिची वही उघडली. यामध्ये हृदयाचं चित्रं काढलेलं आहे. एका रेषेने या हृदयाचे दोन भाग केलेले आहेत. या मुलांनी काढलेल्या चित्रांमध्ये घर नाही की घराचं अंगण नाही.

रात्रीच्या त्या शेल्टरमध्ये त्या रात्री साधारण 50 मुलं आली होती. मुंबईतल्या कामाठीपुरा भागामध्ये एका बिगर सरकारी संघटनेद्वारे हे शेल्टर चालवलं जातं. सेक्स वर्कर्स म्हणजेच शरीरविक्रय करणाऱ्या महिलांच्या मुलांची इथे रात्रभर राहण्याची सोय करण्यात आली आहे.

या शेल्टरच्या खोल्यांमध्ये आवश्यक त्या सगळ्या गोष्टी आहेत. भिंतींवर ख्रिसमसची सजावट आहे. एक ब्लॅकबोर्ड आहे आणि समुद्र किनाऱ्याचा लहानसा देखावा आहे.

दुसरीकडे चटया आणि बेडशीट्स आहेत. एक लहानसं टॉयलेट आहे. एक स्वयंपाकघर आहे जिथे या मुलांसाठी जेवण बनवलं जातं. सध्या पुरतं हे या मुलांचं घर आहे.

ही मुलं आपलं शाळेचं दप्तर आणि रात्री बदलण्यासाठी कपडे घेऊन आलेली असली तरी त्यांचं बाकीचं सामान दुसरीकडे आहे. त्या खोलीत, जिथे त्यांची आई राहते. ही मुलं या घरी येतात खरी, पण त्यांना इथे फार काळ राहता येत नाही.

जीन्स आणि कुर्ता घातलेली एक तरूण आई गल्लीच्या बाहेर उभी आहे. तिने लाल रंगाची लिपस्टिक लावलीय आणि भरपूर मेकअप केलाय.

साधारण तीन वर्षांचं तिचं मुलं रडतरडत सेंटरमध्ये येतंय. पण मागे वळून ते आईकडे पाहात नाही. कारण आईला कामावर जायचंय.

कामाठीपुऱ्यातल्या नवव्या गल्लीमधल्या या सेंटरच्या सुपरव्हायजर मुग्धा सांगतात, "नवीन मूल आहे. आपल्याला इथे यावं लागणार हे त्याला माहित असूनही त्याला रडू येतंय. हळुहळू होईल अॅडजस्ट. सगळीच मुलं करतात. या कुटुंबांकडे दुसरा पर्यायच नसतो."

कामाठीपुरा हा देशातला सगळ्यांत जुना रेड लाईट एरिया म्हणून ओळखला जातो. इथे आता मिळकत फारशी होत नसली तरी पुनर्विकास योजनांमुळे इथली भाडी वाढलेली आहेत. आणि आता फारसे 'कोठे'ही उरलेले नाहीत.

म्हणून मग शरीरविक्रय करणाऱ्या महिलांना अडचणीतच रहावं लागतं. लहानशा खोल्यांमध्ये त्यांना बेड भाड्याने घ्यावा लागतो. एका खोलीत अगदी 6 बेडही लावलेले असतात. खाली त्या जेवण बनवतात, बेडच्या खाली आपलं सामान ठेवतात.

म्हणूनच या मुलांच्या ड्रॉईंगमध्ये घराचं चित्र नाही. या मुलांना घर नाही. या मुलांच्या आया सेक्स वर्कर म्हणून काम करतात. पण या दलदलीतून मुलांना बाहेर पडता यावं म्हणून त्या आपल्या मुलांना शाळेत नक्की पाठवतात.

अशा कुटुंबांमध्ये आई असते, तिची मुलं आणि फार फार तर या मुलांची काळजी घेणारे एनजीओचे लोक. इथे वडिलांचा उल्लेख होत नाही. या सेक्स वर्कर महिला नेहमी स्वतःच्या हिंमतीवर जगण्याची भाषा करतात आणि त्यांच्या लेखी सगळेच पुरुष वाईट वागणारे, विश्वासघातकी आणि शोषण करणारे असतात.

आयव्हीएफ तंत्रज्ञानाने मूल जन्माला घालून आई होणाऱ्या, मूल दत्तक घेणाऱ्या वा घटस्फोट, मतभेदामुळे एकट्या राहणाऱ्या माताही 'सिंगल मदर' असतात. पण यांच्या तुलनेत सेक्स वर्कर मातांच्या समस्या काही पटींनी जास्त असतात.

पहिली गोष्ट म्हणजे त्यांना रेड लाईट एरियात रहावं लागतं. तिथलं असुरक्षित वातावरण, घर नसणं यासाोबतच त्यांना समाजाची दूषणं झेलावी लागतात.

जगभरातच वेश्या व्यवसाय करणाऱ्यांना पालक म्हणून भेदभावाचा सामना करावा लागतो, वाईट गोष्टी ऐकाव्या लागतात. सरकार आणि समाजाच्या नैतिक दबावामुळे काही देशांमध्ये तर अशा पालकांना आपला मुलांवरचा हक्क सोडावा लागतो.

वेश्या व्यवसाय करणारी व्यक्ती एक चांगली पालक होऊ शकत नाही, असं अनेकदा म्हटलं जातं. किंबहुना तसा समज निर्माण करण्यात आलेला आहे. म्हणूनच त्यांच्या कामाला कोणतंही महत्त्व देण्यात येत नाही आणि त्यांना नैतिकतेच्या गोष्टी सुनावण्यात येतात.

आपल्या खोलीत फक्त एक बेड आणि त्या बेडच्या खाली थोडीशी जागा असल्याचं मिताली (नाव बदलण्यात आलेलं आहे) सांगते. ही इमारत जुनी आहे. पायऱ्याही मोडकळीला आल्या आहेत आणि भिंती जीर्ण झाल्यायत.

मिताली 15 वर्षांपूर्वी कामाठीपुऱ्यात आली होती. पतीच्या मृत्यूनंतर दोन मुलांचं पालनपोषण करता यावं म्हणून ती पश्चिम बंगालमध्ये माहेरी परतली.

मिताली सांगते, "ते इतके गरीब होते की आम्हाला खायलाही मिळत नसे."

केर-लादीचं घरकाम मिळवून देतो असं सांगून तिच्या ओळखीच्या एका इसमाने तिला कामाठीपुऱ्यात आणलं.

कालांतराने ती आपल्या मुलाला आणि मुलीलाही इथे घेऊन आली आणि विविध एनजीओंच्या डे केअरसेंटर आणि महापालिकेच्या शाळेत तिसऱ्या मजल्यावरच्या नाईट केअर सेंटरमध्ये त्यांचं नाव घातलं.

ही मुलं दोनदा आईला भेटू शकतात - पहिल्यांदा सकाळी आणि नाईट शेल्टरमध्ये आंघोळ - नाश्ता करून शाळेत जाण्यापूर्वी दुसऱ्यांदा.

मिताली पहाटे पाच वाजता उठून लेकासाठी डबा बनवते. तिचा मुलगा आता 12 वर्षांचा आहे आणि एका शाळेत शिकतो. नंतर मिताली झोपते आणि दुपारी उठून मुलासाठी जेवण तयार करते. साधारण 4 वाजताच्या सुमारास तो परततो आणि जेवून नाईट शेल्टरला जातो. यानंतर मिताली कामासाठी तयार होते.

ती सांगते, "मला शक्य ते सगळं मी माझ्या मुलासाठी करतेय. मी आई आहे आणि मला माझ्या मुलाला सगळ्या चांगल्या सोयी द्यायची इच्छा आहे."

पण रेडलाईट भागात राहण्याच्याही काही अडचणी आहेत. मुलांना सुरुवातीला वाटतं की इतर आयांप्रमाणेच आपली आईही नोकरी करते. नंतर त्यांना आईच्या कामाविषयी समजतं पण ही परिस्थिती बदलण्याजोगी नसते.

हीच जागा आपलं घर असून मुलंच आपलं कुटुंब असल्याचं मिताली सांगते.

पूर्वी कामाठीपुऱ्यात आणि फॉकलंड रोडवर नाईट शेल्टर्स नव्हती. तेव्हा या माता आपल्या मुलांना पलंगाच्या मागे किंवा कपाटाच्या मागे लपवून ठेवत किंवा मग त्यांना आपल्या कामाविषयी कळू नये म्हणून त्यांना जिन्यावर बसवून ठेवत.

मितालीची मुलगीही या भागात काही वर्षं राहिल्यानंतर तिला तिचे आजी-आजोबा घेऊन गेले. आता तिचं लग्न झालंय.

इथे मुलीला ठेवणं अतिशय कठीण होतं, असं मिताली सांगते. आता वर्षातून एकदा मिताली लेकीला भेटायला गावी जाते. पण तिचा मुलगा तिच्या सोबतच राहतो.

मिताली सांगते, "माझ्याकडे फक्त एक लहानसा बेड आहे आणि तेच माझ्यासाठी माझं घर आहे. लोकांना फुटपाथवर रहावं लागतं. अशात माझ्याकडे किमान हे घर तरी आहे. म्हणूनच मी याला घर म्हणते. आपल्याला दिवस-रात्र शेल्टरमध्ये घालवायचे आहेत हे माझ्या मुलाला माहित आहे. पण मी त्याचं घर आहे याचीही त्याला जाणीव आहे."

हे सांगताना मितालीच्या आवाजातलं दुःख दिसतं. सुरुवातीला ती अगदी सांभाळून बोलत होती. वर्षानुवर्षाच्या विश्वासघाताने तिला प्रत्येक गोष्टीकडे, त्यामागच्या उद्देशाकडे संशयाने पहायला शिकवलंय.

पण नंतर ती तिच्या निराशा, एकटेपणा आणि चिंतांविषयी सांगते. ही इथल्या प्रत्येकीचीच कहाणी आहे. या महिला अशी ठिकाणी राहतात जिथे त्यांच्या मातृत्त्वाविषयी शंका घेतली जाते.

कधी कधी ती मुलाला चौपाटीला घेऊन जाते. मुलाच्या वाढदिवसाला त्याला नवीन कपडे आणि केक घेता यावा, पॉकेटमनी देता यावा म्हणून ती पैसे साठवून ठेवते.

मिताली सांगते, "आम्ही बर्थडे पार्टी करत नाही पण इतकं करणं जमतं मला. माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. पण मुलाला त्याच्या स्वतःच्या बळावर नोकरी मिळावी अशी माझी इच्छा आहे."

इतर सेक्स वर्कर्स प्रमाणे मितालीलाही कोठ्यामध्ये 'पिंजरा' भाड्याने घ्यावा लागतो. एकदा वापरण्यासाठी २० रुपये द्यावे लागतात. पडदा लावलेल्या पलंगाला कामाठीपुऱ्यात पिंजरा म्हटलं जातं.

तिच्या खोलीतल्या बेडवर येण्याची कोण्याची इच्छा नसल्याने पिंजरा भाड्याने घ्यावा लागत असल्याचं मिताली सांगते.

यातल्या बहुतेक महिला विविध कारणांमुळे एकट्या राहतात. कोणाला योग्य जोडीदार मिळत नाही, कोणाला स्वातंत्र्य हवं असतं, कोणी स्वतःची इच्छा म्हणून किंवा मग लग्नामध्ये होणाऱ्या त्रासापासून दूर राहण्यासाठी. कारणं अनेक आहेत.

पण पुरुष आपलं शोषण करतात आणि तिरस्कार करत असल्याचं या महिलांच मत असल्याने त्या एकटं राहणं पसंत करत असल्याचं सेक्स वर्कर्सशी संबंधित आकडेवारी सांगते.

पण सेक्स वर्कर्सच्या कामाबद्दल समाज आपल्याला हवे तसे निर्णय घेतो आणि या वेश्यांच्या मुलांना शाळेमध्ये आणि समाजात वावरताना भेदभावाला सामोरं जावं लागतं ही सत्य परिस्थिती आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)