मुंबई मॅरेथॉन: सुधा सिंग, श्रिनू बुगथा भारतीय धावपटूंमध्ये अव्वल

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया

1. मुंबई मॅरेथॉन स्पर्धेला उत्साहात सुरुवात

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत मॅरेथॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई मॅरेथॉनला सुरुवात झाली आहे. लोकमतने ही बातमी दिली आहे. या मॅरेथॉनमध्ये देशाविदेशातील व्यावसायिक धावपटूंबरोबरच हौशी धावपटू तसंच आबालवृद्ध मुंबईकर सहभागी होत आहेत. या स्पर्धेच्या एलिट गटामध्ये इथिओपिया आणि केनिया या आफ्रिकन देशातील धावपटूंमध्ये मुख्य स्पर्धा होणार आहे.

हंगामी निकालानुसार, भारतीय महिला धावपटूंमध्ये सुधा सिंगने अव्वल स्थान पटकावलं. तिने 2 तास 45 मिनिटं 30 सेकंदात शर्यत पूर्ण केली. ज्योती गवतेने दुसरा तर श्यामली सिंगने तृतीय क्रमांक पटकावला. ज्योतीने शर्यत 2 तास 49 मिनिटं 14 सेकंदात पूर्ण केली तर श्यामलीने 2 तास 58 मिनिटं 44 सेकंदात अंतिम रेषा पार केली.

भारतीय पुरुषांमध्ये श्रिनू बुगथाने 2 तास 18 मिनिटं 45 सेकंदात शर्यत पूर्ण करत अव्वल स्थान मिळवले. शेर सिंगने 2 तास 24 मिनिटात शर्यत पूर्ण करत दुसरा तर दुर्गा बहादूर बुधाने 2 तास 24 मिनिटं 3 सेकंदात अंतिम रेषा पार करत तिसरा क्रमांक पटकावला.

आंतरराष्ट्रीय महिलांमध्ये अमाने बेरिसोने 42 किलोमीटरचं अंतर 2 तास 24 मिनिटं 51 सेकंदात शर्यत पूर्ण करत अव्वल स्थान पटकावले. पुरुषांमध्ये डेरा ह्युरिसाने 2 तास 8 मिनिटं आणि 9 सेकंदात शर्यत पूर्ण करत अंतिम रेषा पार केली आणि अव्वल स्थान पटकावलं.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून फुल मॅरेथॉनला तर वरळी डेअरी येथून अर्धमॅरेथॉनला सुरुवात झाली आहे. यंदा या स्पर्धेचं 17 वं वर्षं असून या प्रतिष्ठेच्या शर्यतीत 55,322 धावपटूंनी सहभाग घेतला आहे. मुख्य स्पर्धेतील विजेत्याला 45 हजार, 25 हजार आणि 17 हजार डॉलरचे बक्षीस मिळेल तर अव्वल तीन भारतीय धावपटूंना अनुक्रमे 5 , 4 आणि 3 लाख रुपयाचं पारितोषिक मिळेल.

2. नागरिकत्वात अधिकारांबरोबर कर्तव्यंही येतात- सरन्यायाधीश बोबडे

नागरिकत्व केवळ लोकांच्या अधिकारांपुरतं मर्यादित नसून समाजाप्रति असलेल्या कर्तव्यांचाही त्यात अंतर्भाव होतो असं मत भारताचे सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे यांनी व्यक्त केलं आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या 107 व्या दीक्षांत समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. देशात सध्या नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून आंदोलनं सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांचं हे वक्तव्य महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी दिली आहे.

सरन्यायाधीशांनी यावेळी शिक्षणक्षेत्राच्या स्थितीवरही भाष्य केलं. गेल्या काही वर्षांत शिक्षणाचं बाजारीकरण झालं आहे. त्याचा अनुभव मीही घेतला आहे. असं ते म्हणाले. विद्यापीठ ही केवळ दगड-मातीची इमारत नव्हे, तसंच एखादं उत्पादन निर्माण करणारा कारखाना देखील ठरु नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

3. केंद्रीय मंत्र्यांच्या काश्मीर दौऱ्याला सुरुवात

केंद्रीय मंत्रिमंडळाचे 36 मंत्री सहा दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर आहेत. विविध कार्यक्रमांना हजेरी, विविध योजनांची उद्घाटनं, अशा प्रकारच्या कार्यक्रमासाठी हे मंत्री जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. 5 ऑगस्टला जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यावर पहिल्यांदाच मंत्री अशा प्रकारच्या दौऱ्यावर असल्याची बातमी द हिंदूने दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण उपक्रम राबवण्यात येत असून हे मंत्री लोकांना 370 कलम हटवण्याच्या तरतुदींबाबत आणि राज्यातील विकास योजनांबाबत माहिती देतील. आता दाखल झालेल्या मंत्र्यामध्ये पीएमओचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह, संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जून राम मेघवाल आणि आरोग्य राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांचा समावेश आहे.

4. डी.एस. कुलकर्णी आता मुंबई पोलिसांच्या ताब्यात

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी आणि त्यांची पत्नी यांचा ताबा आता मुंबई पोलिसांनी घेतला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे. काही मुंबईकरांना 3.5 कोटीचा गंडा घातल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. मुंबईतील कोर्टाने वॉरंट जारी केल्यानंतर शिवाजी पार्क पोलीस ठाण्याने त्यांना अटक केली.

5. कोणतंही राज्य सीएएला नकार देऊ शकत नाही- कपिल सिब्बल

नागरिकत्व सुधारणा कायदा संसदेनं संमत केला आहे. त्यामुळे कोणतंच राज्य हा कायदा लागू करायला नकार देऊ शकत नाही असं वक्तव्य ज्येष्ठ विधिज्ञ आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी केलं आहे. इंडियन एक्सप्रेसने ही बातमी दिली आहे.

पंजाब आणि केरळ विधानसभेने या कायद्याची अंमलबजावणी करणार नसल्याचं विधेयक संमत केलं होतं. तुम्ही या कायद्याचा विरोध करू शकता, केंद्र सरकारचा विरोध करू शकता मात्र या कायद्याची अंमलबजावणीच करणार नाही असं म्हणणं घटनात्मकदृष्ट्या योग्य नाही असं ते म्हणाले. सध्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात अनेक शहरांत आंदोलनं सुरू आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)