'नरेंद्र मोदी तुम्ही भारताचे पंतप्रधान आहात की पाकिस्तानचे राजदूत': ममता बॅनर्जी #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1) 'मोदीजी, तुम्ही भारताचे पंतप्रधान की पाकिस्तानचे राजदूत?' - ममता बॅनर्जी
तुम्ही भारताचे पंतप्रधान आहात की पाकिस्तानचे राजदूत? असा सवाल करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधलाय. एनडीटीव्हीनं ही बातमी दिलीय.
पश्चिम बंगालमधील सिलिगुडी इथं नागरिकत्व कायद्याविरोधातल्या सभेत ममता बॅनर्जी यांनी भाषण केलं. त्यावेळी त्या म्हणाल्या, "स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरही नागरिकांना आपलं नागरिकत्व सिद्ध करावं लागणं अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे."

फोटो स्रोत, Getty Images
"दीर्घ परंपरा आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला असा हा भारत देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार पाकिस्तानशी का तुलना करतात? तुम्ही भारताचे पंतप्रधान आहात की पाकिस्तानचे राजदूत?" असा सवाल ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला.
वारंवार पाकिस्तानचा संदर्भ का देता, असं विचारत त्या पुढे म्हणाल्या, "तुम्ही हिंदूस्तानबद्दल का बोलत नाही? आम्हाला पाकिस्तान नकोय. आमचं हिंदूस्तानावर प्रेम आहे."
ढासळलेली अर्थव्यवस्था आणि बेरोजगारीवरुन लक्ष विचलित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचा पक्ष वारंवार पाकिस्तानचा मुद्दा काढत असल्याचंही ममता बॅनर्जी म्हणाल्या.
2) 1700 किमीचा प्रवास करून वाघोबा आता बुलडाणा मुक्कामी
गेल्या अनेक दिवसांपासून वृत्तपत्रांच्या बातम्यांचा मथळा बनलेला 'T1C1' वाघ आता बुलडाण्यातल्या ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्यात मुक्कामी राहण्याची शक्यता आहे. हिंदूस्तान टाइम्सनं ही बातमी दिलीय.
सुमारे 1700 किलोमीटरचा प्रवास केल्यानं तीन वर्षांचा 'T1C1' वाघ चर्चेत आला होता. या वाघाच्या हालचालीवर जवळपास 11 महिने रेडिओ कॉलरद्वारे नजर ठेवण्यात आली होती.

फोटो स्रोत, Getty Images
दिल्ली ते मुंबई असा 1416 किलोमीटरचा प्रवास 190 दिवसात या वाघानं केला होता. हा प्रवास भारतातील एखाद्या वाघानं पहिल्यांदाच केला होता.
'T1C1' वाघ मूळचा यवतमाळमधील टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यातला आहे. 26 जून 2019 रोजी त्यानं अभयारण्य सोडलं आणि त्यानंतर 1700 किमीचा प्रवास त्यानं केलं. आठ जिल्हे आणि चार वन्यजीव अभयारण्य हा वाघ फिरला.
3) 'सर्जिकल स्ट्राईक'मधून पाकिस्तानला योग्य संदेश गेलाय - लष्करप्रमुख नरवणे
अण्वस्त्र मर्यादा न ओलांडता पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी अनेक व्यवहार्य आणि प्रभावी मार्ग आहेत, जसं की सप्टेंबर 2016 साली करण्यात आलेलं सर्जिकल स्ट्राईक असेल किंवा बालाकोट एअरस्ट्राईक असेल, असं भारताचे लष्करप्रमुख मनोज नरवणे म्हणाले. टाईम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिलीय.

फोटो स्रोत, ANI
"भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनं महत्त्वाची कामगिरी बजावली. सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून पाकिस्तानला स्पष्ट संदेश गेला की, काहीही केलेलं खपवून घेतलं जाणार नाही", असं लष्करप्रमुख नरवणे म्हणाले.
दरम्यान, यावेळी नरवणे यांनी जम्मू-काश्मीरमधील सद्यस्थितीबाबतही बातचीत केली. ते म्हणाले, "कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील हिंसा मोठ्या प्रमाणात कमी झालीय. कायदा व सुव्यवस्था चोखपणे बजावली जाईल."
4) CAA च्या मुद्द्यावर भाजप एक इंचही मागे हटणार नाही - अमित शाह
नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरुन (CAA) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेससह इतर विरोधकांवर निशाणा साधलाय. CAA च्या मुद्द्यावर भाजप एक इंचही मागे हटणार नाही, असं अमित शाह म्हणाले. इंडिया टुडेनं ही बातमी दिलीय.
जोधपूरमध्ये CAA च्या समर्थनार्थ सभा आयोजित करण्यात आली होती. तिथं अमित शाह बोलत होते.

फोटो स्रोत, Getty Images
"सर्व पक्ष जरी एकत्र आले तरी भाजप CAA च्या मुद्द्यावर एक इंचही मागे हटणार नाही. तुम्हाला हवा तितका गैरसमज तुम्ही पसरवा," असं आव्हान अमित शाह यांनी विरोधकांना दिलं.
दुसरीकडे, केरळ विधानसभेनं नागरिकत्व दुरुस्ती विधेयक नाकारल्यानंतर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी भाजपेतर 11 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय. केरळ विधानसभेनं जसं पाऊल उचललं, तशी भूमिका घेण्याचं आवाहन विजयन यांनी पत्राद्वारे केलंय. लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता टिकवण्यासाठी एकत्र यावं, असंही ते पत्रातून म्हणालेत.
5) मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेची भगव्याशी तडजोड - नितीन गडकरी
महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद मिळावं म्हणून शिवसेनेनं भगव्याशी तडजोड केल्याची टीका केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांनी केली. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

फोटो स्रोत, Twitter
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक एकत्र लढलेले भाजप आणि शिवसेना निकालानंतर वेगळे झाले. मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवरुन दोन्ही पक्षात ताटातूट झाली. त्यानंतर शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. या सर्व घडामोडींवर नितीन गडकरींनी आपली भूमिका मांडत शिवसेनेवर निशाणा साधला.
"शिवसेनेनं त्यांच्या विचारधारेशी तडजोड केली. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना सत्तेसाठी एकत्र आले. शिवसेनेनं याआधी भगवा फडकवण्याची भाषा केली होती. मात्र आता काँग्रेसच्या रंगात शिवसेना मिसळलीय," असं गडकरी म्हणाले.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























