पुस्तकं वाचा आणि दाढीच्या बिलात सूट मिळवा

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

रविवारी किंवा कधीही तुम्ही केस कापायला, दाढी करायला सलूनमध्ये गेलात तर तुमचा नंबर येईपर्यंत जुने सिनेमे पाहाण्याशिवाय पर्याय नसतो. कधीकधी एखादा सिनेमाही पाहून होण्याची शक्यता असते. तिथं ठेवलेले दोनचार पेपरही वाचून होतात. पण तुतिकोरीनचं एक सलून मात्र वेगळं आहे.

तुतिकोरिनच्या या सलूनमालकानं आपल्या केशकर्तनालयातच लायब्ररी सुरू केली आहे. वाचनसंस्कृती व्हावी यासाठी यांनी पोन मरिअप्पन यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे.

ही पुस्तकं वाचली जावीत आणि वाचनाची गोडी लागावी म्हणून या नव्या वर्षापासून एक ऑफरही सुरु करण्यात आली आहे. जे लोक पुस्तकं वाचतील त्यांना दाढी आणि केस कापण्याच्या पैशात सूट दिली जाईल अशी ऑफर त्यांनी जाहीर केली आहे.

याबद्दल बोलताना मरिअप्पन म्हणतात, सध्याच्या काळामध्ये वाचन झपाट्यानं कमी झालं आहे. मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळं वाचनावर परिणाम झाला आहे. या नव्या वर्षात मी केस-दाढीचे दर वाढवणार आहे मात्र दुकानात पुस्तकं वाचणाऱ्यांना सूट देणार आहे.

वाचनामुळं माणसाचं एकूणच व्यक्तिमत्व सुधारतं असं ते म्हणतात. द बेटर इंडियाशी बोलताना पोन मरिअप्पन म्हणाले, "एक सुशिक्षित व्यक्ती होणं अत्यंत महत्त्वाचं आहे असं मला नेहमीच वाटायचं. कार्पोरेट ऑफिसमध्ये काम करण्याचं ध्येय होतं. पण आर्थिक अडचणींमुळं मला शाळा सोडावी लागली आणि ही स्वप्नंही सोडून द्यावी लागली. सलून सुरु केल्यानंतर मी माझ्या शिक्षणाची आवड याच्याशी जोडायचं ठरवलं आणि ही कल्पना डोक्यात आली."

सहा वर्षांपूर्वी त्यांनी दुकानांमधून आणि जुन्या पुस्तकांच्या दुकंनातून पुस्तकं विकत घ्यायला सुरुवात केली. प्रत्येक महिन्यात थोडे पैसे बाजूला काढून ते ही पुस्तकं विकत घेतात. आता त्यांच्याकडे 900 पुस्तकं आहेत. त्यात आत्मचरित्रं, कादंबऱ्या आणि सेल्फहेल्प पद्धतीची पुस्तकं आहेत. त्यात तमिळ अणि इंग्रजी दोन्ही भाषेतली पुस्तकं आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)