जामिया CAB आंदोलन: दिल्लीत नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून हिंसाचार, पोलीस विरुद्ध विद्यार्थी संघर्ष - LIVE

फोटो स्रोत, ANI
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरुद्ध आंदोलनाचं लोण आसामनंतर आता राजधानी दिल्लीत पोहोचलं. दिल्लीचं जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ या हिंसाचाराचं केंद्रस्थान बनलंय, जिथे आंदोलक विद्यार्थी विरुद्ध दिल्ली पोलीस असा संघर्ष सुरू आहे.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार -
- मथुरा रोडवरील जामिया नगरशेजारच्या भागात काही दिल्ली ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या बसेस पेटवण्यात आल्या.
- नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरुद्धचं हे आंदोलन जामिया मिलिया विद्यापीठात गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.
- रविवारी संध्याकाळी आंदोलनकर्ते आणि दिल्ली पोलिसांमध्ये संघर्ष उफाळला
- पोलीस विद्यापीठ परिसरात विनापरवानगी घुसल्याचा जामियाच्या चीफ प्रॉक्टरचा दावा
- जामियाच्या विद्यार्थ्यांनी स्वतःला हिंसाचाराचा निषेध केला, दिल्ली पोलीस मुख्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन
- अनेक मेट्रो स्टेशन्स बंद, जामियाभोवतालच्या शाळा-कॉलेजांना उद्या सुटी
- उत्तर प्रदेशच्या अलिगड मुस्लीम विद्यापीठातही पोलिसांची कारवाई, हैदराबादमध्येही तणाव

जामियात नेमकं काय झालं?
रविवारी संध्याकाळी दिल्लीतील मथुरा रोडवर आंदोलकांनी अनेक बसेसना पेटवून दिलं. ती आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाच्या गाड्यांनाही आंदोलकांनी पेटवून दिलं.
ANI वृत्तसंस्थेनुसार दिल्लीच्या कालिंदी कुंज रोडवर जामिया मिलिया इस्लामियाच्या काही विद्यार्थ्यांसह अनेक लोकांनी मोर्चे काढले होते. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात हे आंदोलन सुरू असतानाच हिंसाचार उफाळला. यात जामियाचे काही विद्यार्थी असल्याच्या बातम्या आल्या.
दिल्लीच्या ओखला, कालिंदी कुंज आणि जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ परिसरात जाळपोळ पाहायला मिळाली. मात्र आपलं आंदोलन शांततापूर्ण असून या हिंसाचारासाठी आपण जबाबदार नसल्याचं जामिया मिलियाच्या आंदोलक विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे.

मात्र PTI वृत्तसंस्थेशी बोलताना विद्यापीठाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की या भागांमध्ये स्थानिकांच्या निदर्शनांदरम्यान हिंसाचार उफाळला, विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान नाही.
तर जामियाच्या चीफ प्रॉक्टरनेही पोलीस जबरदस्ती कँपसमध्ये घुसल्याचा दावा केला आहे.

फोटो स्रोत, Twitter
संध्याकाळी ही कारवाई होत असतानाच शेकडो विद्यार्थ्यांनी दिल्ली पोलीस मुख्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यास सुरुवात केली.

फोटो स्रोत, ANI
प्रत्यक्षदर्शीनं सांगितलेला घटनाक्रम
जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात मोर्चा काढला होता.
हा मोर्चा जामिया नगर, भरत नगर, न्यू फ्रेंड्स कॉलनी आणि अपोलो हॉस्पिटलच्या आसपासच्या भागातून काढला जात होता.
यामध्ये विद्यापीठातील विद्यार्थ्यांसोबतच बाटला हाउस आणि आसपासच्या भागात राहणाऱ्या स्थानिकांचीही संख्या मोठ्या प्रमाणावर होती. मोर्चा अतिशय शांततेत सुरू होता.
विद्यार्थ्यांच्या एका गटानं शनिवारी संध्याकाळी म्हटलं गोतं, की या कायद्याच्या विरोधात जे आंदोलन होईल, ते शांततेच्या मार्गानच करण्यात येईल.

मात्र हा मोर्चा न्यू फ्रेंड्स कॉलनीतील कम्युनिटी सेंटरजवळ पोहोचल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना अडविण्याचा प्रयत्न केला. तिथे बॅरिकेड्स लावण्यात आले होते.
तिथेच काही लोकांनी जमिनीवर ठिय्या मांडला. यामध्ये जामियाच्या विद्यार्थ्यांसोबतच विद्यापीठाचे माजी विद्यार्थीही सहभागी झाले होते. पोलिस बंदोबस्त पाहिल्यानंतर गर्दी दुसऱ्या मार्गानं आश्रमकडे जाऊ लागली.
काही वेळानंतर या गर्दीनं आश्रमच्या इथं 'रास्ता रोको' केला. त्यामुळे दिल्ली आणि फरीदाबादला जोडणारा मथुरा रोडही जाम झाला.

पोलिसांनी रस्ता मोकळा करण्यासाठी लाठीचार्ज केला. अश्रूधूराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. यामध्ये अनेक महिलांनाही दुखापत झाली.
याला प्रत्युत्तर देण्यासाठी जमावाकडूनही दगडफेक करण्यात आली. जोरदार घोषणाबाजी केली आणि संघर्ष वाढला.
याआधी 13 डिसेंबरलाही जामियाच्या विद्यार्थ्यांनी मार्च काढण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी तेव्हा त्यांना बॅरिकेड्स लावून अडवलं होतं. तेव्हाही पोलिस आणि विद्यार्थ्यांमध्ये झटापट झाली होती. यामध्ये काही विद्यार्थ्यांना दुखापतही झाली होती.
पोलिस काय म्हणाले?
मात्र, आपण जमावाला पांगवण्यासाठीच, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठीच कारवाई करत असल्याचं दिल्ली पोलीस उपायुक्त (दक्षिण पूर्व) चिन्मय बिस्वाल यांनी सांगितलं. "आम्हाला विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांविरुद्ध नाही," असंही ते म्हणाले.

फोटो स्रोत, ANI
"आंदोलकांचा जमाव फारच आक्रमक झाला, तेव्हा त्यांना पांगवण्याचा आम्ही प्रयत्न केला, मात्र त्यांनी आमच्यावर दगडफेक केली. यात जवळपास सहा पोलीस जखमी झाले. आम्हाला विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांबद्दल काही तक्रार नव्हती. पण आमच्यावर कँपसच्या बाहेरून दगडफेक करण्यात आली. आम्ही विद्यापीठ प्रशासनाला सांगू त्या विद्यार्थ्यांची ओळख करायला," असं बिस्वाल म्हणाले.
आक्रमक जमावाने चार बसेस आणि दोन पोलीस वाहनांसह अनेक गाड्या पेटवून दिल्या. त्यामुळे पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, असं बिस्वाल यांनी सांगितलं.
जामियात उपस्थित बीबीसी हिंदी प्रतिनिधी सलमान रावी यांनी सांगितलं की यानंतर पोलिसांनी परिसराला घेरलं. उद्या परिसरातील सर्व शाळा बंद ठेवण्यात येणार असल्याचं वृत्त येत आहे.
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त
जामिया टीचर असोसिएशनने विद्यार्थ्यांना आवाहन केलंय की त्यांनी स्थानिक नेत्यांच्या "दिशाहीन" आंदोलनांमध्ये सहभागी होऊ नये. तर जामिया मिलिया विद्यापीठाच्या कुलगुरू नझमा अख्तर यांनी PTIला सांगितलं की वाचनालयातून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आलं आहे. त्यांनी पोलीस कारवाईचा निषेध केला आहे.

पोलिसांच्या सल्ल्यावरून दिल्ली मेट्रोचे अनेक स्टेशन्स बंद करण्यात आले आहेत. तर परिसरातील सर्व शाळा-कॉलेजांना उद्या सुटी जाहीर करण्यात आली आहे.

फोटो स्रोत, ANI
दरम्यान, उत्तर प्रदेशच्या अलिगड मुस्लीम विद्यापीठातही आंदोलनामुळे वातावरण तापू लागलं आहे. शनिवारी विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला असताना पोलीस आणि निमलष्करी दलाच्या तुकड्या परिसरात तैनात करण्यात आल्या होत्या.
आंदोलनावरून राजकारण
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शांततापूर्ण आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे. "हिंसाचार करू नका, कुठल्याही प्रकारचा हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही," असं ते म्हणाले.

फोटो स्रोत, Twitter / Arvind Kejriwal
मात्र यावरून दिल्लीत विरोधी पक्ष असलेल्या भाजपचे नेते मनोज तिवारी यांनी केजरीवालांवर निशाणा साधला आहे. केजरीवालांच्या ट्वीटवर ते म्हणाले, "कसले मुख्यमंत्री आहेत अरविंद केजरीवाल! आधी आपल्याच आमदाराकडून जनतेला भडकवतात, जाळपोळ करायला सांगतात, निदर्शनं करायला सांगतात. देशाला हे का नाही सांगत की जर देशातील मुस्लिमांना CABशी काही घेणंदेणंच नाहीये तर मग हे निदर्शनं कशाला? पण तुम्ही स्वतःच्या राजकारणासाठी राजधानीत हिंसाचार पसरू देत आहात. #चिंताजनक "
दिल्लीच्या सत्ताधारी आम आदमी पार्टीने या आंदोलनामागे भाजप असल्याचा स्पष्ट आरोप केला आहे. मनोज तिवारींना उत्तर देताना आम आदमी पार्टीने म्हटलं आहे, "जिथे चिखल असतो, तिथे कमळ असतं. खोटं बोलून लोकांची दिशाभूल करू नका, मनोज तिवारी जी. लोकांना माहितीये असत्य आणि भाजपचं जुनं नातं. अफवा पसरवू नका."
"निवडणुकांच्या तोंडावर दिल्लीत हिंसाचार भडकला आहे. फक्त एकाच पक्षाला दंगलींचा फायदा होता. #BJPburningDelhi," असं ट्वीट आपने केलं आहे.

फोटो स्रोत, Twitter
येत्या दोन महिन्यात म्हणजे साधारण फेब्रुवारी 2020मध्ये दिल्लीत विधानसभा निवडणुका होणार आहेत.
दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुभाष चोपडा यांनी आज झालेल्या हिंसाचाराचा निषेध केला आहे आणि शांततापूर्ण आंदोलन करण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले, "काही व्हीडिओंमध्ये असं दिसतंय की दिल्ली पोलीस विनापरवानगी विद्यापीठात घुसले आहेत. मी गृहमंत्री अमित शाहांना विनंती करतो की या निष्पाप विद्यार्थ्यांची मदत करावी. जामिया विद्यापीठात पोलिसांची कारवाई लोकशाहीविरुद्ध आणि अवैध आहे."
"विद्यार्थ्यांच्या कँपसमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न का केला जातोय? हे खपवून घेतलं जाणार नाही," असंही ते म्हणाले. तसंच त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनाही या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























